Pomegranates Benefits: वयानुसार गुडघे दुखणे, जिना चढ-उतार करताना तीव्र वेदना होणे, सकाळी उठल्यावर सांधे कमालीचे आखडणे किंवा चालताना गुडघ्यांतून कटकट असा आवाज येणे… या तक्रारी आजच्या काळात नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे ‘वय झाले की हे व्हायचचं असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या नेहमीच्या वाटणाऱ्या वेदनांमागे अनेकदा ऑस्टिओआर्थरायटिस हा सांध्यांचा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि दीर्घकालीन विकार असण्याची शक्यता असते. प्रसिद्ध अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. अशोक राजगोपाल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले होते की, सांध्यांवर कमीत कमी ताण पडणाऱ्या व्यायामांबरोबर आहारात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स (अक्रोड, जवस, ऑलिव्ह ऑइल) आणि व्हिटॅमिन D समाविष्ट करा (Are you at risk of developing arthritis?, Indian Express 2020)
ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?
सखोल संशोधनापूर्वी ऑस्टिओआर्थरायटिसकडे केवळ ‘वयोमानपरत्वे होणारी सांध्यांची झीज’ या एकाच दृष्टिकोनातून पाहिले जात होते. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये केवळ दोन हाडांमधील कास्थि (कार्टिलेज – मऊ कूर्चा) घासली जाऊन त्यांची झीज होत नाही; तर कार्टिलेज, हाडे, सांध्यातील द्रवयुक्त आवरण (सायनोव्हिअम), सांध्याभोवतीचे स्नायू आणि शरीरातील दाहक संकेत प्रणाली (इन्फ्लेमेटरी सिग्नलिंग पाथवे) यांच्यातील संपूर्ण जैविक समतोल बिघडतो.
ऑस्टिओआर्थरायटिसवरील संशोधन
म्हणूनच गेल्या दोन दशकांत डाळिंब (प्युनिका ग्रॅनाटम) या फळातील पॉलिकाफेनॉल्स, अँथॉसयानिन्स, एलागीटॅनिन्स आणि विशेषतः प्युनिकॅलॅजिन्स यांसारख्या शक्तिशाली जैव-सक्रिय (बायोॲक्टिव्ह) घटकांचा ऑस्टिओआर्थरायटिसवरील संभाव्य प्रभाव संशोधकांद्वारे अत्यंत गांभीर्याने अभ्यासला जात आहे. २०१६ साली शास्त्रज्ञ झाफर रशीद यांच्या ‘Intake of Pomegranate Prevents the Onset of Osteoarthritis: Molecular Evidences’ या शोध निबंधाने जगभरातील वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रयोगशाळांमधील निष्कर्षांच्या आधारे, डाळिंबातील अर्क कार्टिलेज नष्ट करणाऱ्या विशिष्ट रेण्वीय मार्गांवर नियंत्रण मिळवू शकतो आणि सांध्यांचा प्रदाह (सूज व दाह) कमी करू शकतो, असे त्यात सप्रमाण मांडण्यात आले होते.
मुख्य प्रश्न
या सर्व परिस्थितीत मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे प्रयोगशाळेतील पेट्री डिश किंवा प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये दिसणारा हा सकारात्मक परिणाम आपल्या रोजच्या आहारात डाळिंब खाल्ल्याने मानवी शरीराला तसाच मिळतो का? आणि त्यामुळे खरोखर ऑस्टिओआर्थरायटिस टाळणे किंवा झालेला विकार पूर्ण बरा करणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही एवढे साधे-सरळ नसून, त्यामागील विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे.
ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे केवळ कार्टिलेज घासले जाणे नव्हे
आपल्या शरीरातील विविध हाडांच्या सांध्यांच्या टोकांवर कार्टिलेज नावाचा एक अतिशय गुळगुळीत, निसरडा आणि लवचिक थर असतो. हा थर दोन हाडांना एकमेकांवर थेट घासण्यापासून वाचवतो, सांध्याची हालचाल सुलभ ठेवतो आणि चालताना किंवा उडी मारताना शरीरावर येणारा अचानक भार शोषून घेणारा ‘शॉक ॲब्जॉर्बर’ म्हणून काम करतो.
ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये या कार्टिलेजच्या रचनेचे जैविक संतुलन बिघडते.
कार्टिलेजची निर्मिती करणाऱ्या, त्याची सतत देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या पेशींना काँड्रोसाइट्स म्हणतात. निरोगी सांध्यांमध्ये या पेशी कोलॅजन आणि प्रोटीओग्लायकॅन्स यांसारख्या आवश्यक घटकांची निर्मिती करणे आणि जुन्या घटकांचे नैसर्गिक विघटन करणे, या दोन्ही प्रक्रियांत सुयोग्य समतोल राखतात. परंतु, ऑस्टिओआर्थरायटिसच्या स्थितीत सांध्यांमध्ये शरीरातील दाहक घटक म्हणजेच इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यापैकी इंटरल्यूकिन-१ बीटा (IL-1β) हा घटक प्रयोगशाळेतील ऑस्टिओआर्थरायटिसच्या संशोधनात सर्वाधिक अभ्यासला गेला आहे. IL-1β च्या प्रभावामुळे काँड्रोसाइट पेशींमधील काही विशिष्ट अंतर्गत मार्ग असामान्यपणे सक्रिय होतात. परिणामी, निरोगी कार्टिलेज तयार होण्याऐवजी सांध्याची वेगाने धूप करणारे विकर (एन्झाईम्स) तयार होऊ लागतात.
डाळिंब सांध्यांच्या पातळीवर नेमके कसे काम करते?
डाळिंब हे केवळ एक चविष्ट फळ नसून ते नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सचा आणि दाहकविरोधी घटकांचा एक मोठा स्रोत आहे. डाळिंबामध्ये असणारे प्युनिकॅलॅजिन हे अँटीऑक्सिडंट पचनक्रियेदरम्यान विघटित होऊन एलाजिक ॲसिड आणि युरोलिथिन्समध्ये रूपांतरित होते. हे घटक रक्ताभिसरणाद्वारे सांध्यांपर्यंत पोहोचतात.
वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार, डाळिंबातील हे घटक खालील तीन मुख्य पातळ्यांवर कार्य करतात:
१. दाहक घटकांना आळा घालणे: डाळिंबातील अर्क IL-1β मुळे निर्माण होणाऱ्या दाहक प्रक्रियेला रोखतो. यामुळे सांध्यांमधील सूज, लालसरपणा आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
२. कार्टिलेज नष्ट करणाऱ्या एन्झाईम्सना रोखणे: सांध्यातील कास्थि (कार्टिलेज) नष्ट करण्यासाठी मॅट्रिक्स मेटलॉप्रोटीनेसेस (MMPs) आणि ADAMTS ही विशिष्ट विकरे कारणीभूत असतात. डाळिंबातील जैव-सक्रिय घटक या विकरांच्या निर्मितीला आळा घालतात, परिणामी, कार्टिलेजची होणारी वेगाने झीज मंदावू शकते.
३. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणे: ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सांध्यांच्या पेशींमध्ये मुक्त रॅडिकल्स वाढतात, जे पेशींना हानी पोहोचवतात. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स या मुक्त रॅडिकल्सचा नाश करून काँड्रोसाइट पेशींचे रक्षण करतात.
प्रयोगशाळेतील संशोधन विरुद्ध प्रत्यक्ष मानवी वास्तव
येथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. प्रयोगशाळेत पेशींवर थेट डाळिंबाचा उच्च सांद्रता असलेला अर्क टाकून मिळणारे परिणाम आणि प्रत्यक्ष माणसाने डाळिंब खाल्ल्यानंतर मिळणारे परिणाम यांत मोठा फरक असतो.
जैव-उपलब्धता (बायोॲव्हेलेबिलिटी): आपण जेव्हा डाळिंब खातो किंवा त्याचा रस पितो, तेव्हा त्यातील सर्व घटक जसेच्या तसे सांध्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आपले पचनतंत्र, आतड्यांतील सूक्ष्मजीव (गट मायक्रोबायोटा) आणि यकृत या घटकांवर प्रक्रिया करतात. त्यामुळे सांध्यांपर्यंत पोहोचणाऱ्या घटकांचे प्रमाण मर्यादित असते.
औषध की आहार?: डाळिंब हा एक अत्यंत पौष्टिक आहार आहे, परंतु ते ऑस्टिओआर्थरायटिसवरील थेट ‘औषध’ किंवा ‘पर्यायी उपचार’ ठरू शकत नाही. वैद्यकीय चाचण्यांमध्ये डाळिंबामुळे सांध्यांच्या वेदनांमध्ये काही प्रमाणात आराम मिळाल्याचे दिसले असले, तरी डाळिंब खाल्ल्याने पूर्णपणे गेलेले कार्टिलेज पुन्हा नव्याने तयार होते, असा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.
ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांसाठी व्यावहारिक आणि संतुलित दृष्टिकोन
ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास असल्यास डाळिंबाचा आहारात समावेश करता येऊ शकतो.
नियमित आहाराचा भाग बनवा: रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वाटी ताजे डाळिंबाचे दाणे खाणे किंवा घरगुती काढलेला ताजा रस पिणे हे संपूर्ण आरोग्यासाठी, हृदयासाठी आणि सांध्यांसाठी नक्कीच फायदेशीर आहे.
साखरेचे प्रमाण सांभाळा: बाजारात मिळणारे पॅकबंद डाळिंबाचे रस पिणे टाळावे, कारण त्यात अतिरिक्त साखर आणि टिकवणारे पदार्थ (प्रिझर्व्हेटिव्ह्ज) असतात, ही घटक शरीरातील सूज आणि वजन दोन्ही वाढवू शकतात.
वजन नियंत्रण आणि व्यायाम: सांध्यांची झीज रोखण्यासाठी केवळ डाळिंब खाऊन चालणार नाही. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे (कारण अतिरिक्त वजनाचा थेट ताण गुडघ्यांवर येतो) आणि फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने हलके व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही: डॉक्टरांनी दिलेल्या वेदनाशामक, कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी किंवा इतर औषधांना डाळिंब हा पर्याय असू शकत नाही. डाळिंब हे पूरक आहार (सपोर्टिव्ह थेरपी) म्हणून उत्तम काम करते.
थोडक्यात सांगायचे तर, डाळिंब हे ऑस्टिओआर्थरायटिसवरील कोणताही चमत्कारिक किंवा जादूचा उपाय नाही; परंतु त्यातील दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ते सांध्यांचे आरोग्य जपण्यासाठी एक अत्यंत प्रभावी ‘सुपरफूड’ नक्कीच ठरते. प्रयोगशाळेतील पुरावे हे दर्शवतात की, डाळिंब सांध्यांची झीज घडवून आणणाऱ्या जैविक प्रक्रियेचा वेग मंदावू शकते. त्यामुळे, योग्य वैद्यकीय उपचारांबरोबर, वजनावर नियंत्रण आणि नियमित व्यायामाची जोड देऊन डाळिंबाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास, सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास नक्कीच मोठी मदत होऊ शकते.
