अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर आता ‘श्री विजयपुरम’ म्हणून ओळखले जाईल, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये जाहीर केले. गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून देशाला मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने हा निर्णय प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले. अमित शाह म्हणाले, “आधीच्या नावाला वसाहतवादी वारसा होता. ‘श्री विजयपुरम’ नाव हे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान आणि निकोबार बेटांच्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे.” शहराचे नामकारण करण्यामागील केंद्राचा उद्देश काय? या शहराला पोर्ट ब्लेअर हे नाव कसे मिळाले? त्यामागील इतिहास काय? त्याविषयी जाणून घेऊ.
पोर्ट ब्लेअर हे नाव आले कुठून?
पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांचे प्रवेश केंद्र आहे. बॉम्बे मरीनमधील नौदल सर्वेक्षक आणि लेफ्टनंट आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. ब्लेअर हे अंदमान बेटांचे सखोल सर्वेक्षण करणारे पहिले अधिकारी होते. ११७१ मध्ये बॉम्बे मरीनमध्ये सामील झाल्यानंतर, ब्लेअर त्याच्या पुढील वर्षी भारत, इराण आणि अरेबियाच्या किनारपट्टीवर सर्वेक्षण मोहिमेवर निघाले. १७८० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी चागोस द्वीपसमूह, कलकत्त्याच्या दक्षिणेकडील डायमंड हार्बर आणि हुगळी नदीकाठी असलेल्या अनेक सर्वेक्षण मोहिमांमध्ये भाग घेतला होता. डिसेंबर १७७८ मध्ये, ब्लेअर एलिझाबेथ आणि वाइपर या दोन जहाजांसह कलकत्त्याहून अंदमानच्या पहिल्या सर्वेक्षणासाठी रवाना झाले.
हेही वाचा : ‘कौमार्य चाचणी’ आणि ‘समलैंगिकता’ विषयाबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमात एकाच महिन्यात दोनदा बदल; कारण काय?
एप्रिल १७७९ पर्यंत चाललेल्या या मोहिमेदरम्यान पूर्वेकडील किनाऱ्याने उत्तरेकडे जाताना ते एका नैसर्गिक बंदरावर पोहोचले; ज्याला त्यांनी सुरुवातीला पोर्ट कॉर्नवॉलिस असे नाव दिले (ब्रिटीश भारतीय सैन्याचे कमांडर-इन-चीफ कमोडोर विल्यम कॉर्नवॉलिस यांच्या नावावरून). त्यानंतर या बेटाचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले. ब्लेअर यांना त्यांच्या शोधाचे महत्त्व लगेचच कळले आणि त्यांनी त्यांच्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल लिहिला. या अहवालाला ईस्ट इंडिया कंपनीतील (ईआयसी) अधिकाऱ्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यानंतर, ‘ईआयसी’ने बेटांवर वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुख्यत: मलयांच्या चाचेगिरीवर लक्ष ठेवणे इथून सहज शक्य होते. जहाज बुडालेल्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इतर शक्तींशी शत्रुत्व झाल्यास त्यांचे अधिकारी आश्रय घेऊ शकतील अशी जागा म्हणून हे स्थान तयार करण्यात येणार होते. डिसेंबर १७९२ मध्ये धोरणात्मक कारणांसाठी संपूर्ण वसाहत अंदमानच्या उत्तर-पूर्व भागात नव्याने स्थापन झालेल्या पोर्ट कॉर्नवॉलिसमध्ये हलविण्यात आली. परंतु, गंभीर आजार आणि मृत्यूमुळे नवीन वसाहत फार काळ टिकू शकली नाही.
१८५७ च्या उठावामुळे ब्रिटिशांना मोठ्या संख्येने लोकांना कैद करायचे होते, त्यामुळे पोर्ट ब्लेअरचे त्वरित नूतनीकरण आणि दंड वसाहत म्हणून पुनर्वसन करण्यात आले. बहुतेक कैद्यांना पोर्ट ब्लेअर येथे जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यापैकी अनेकांना फाशी देण्यात आली, तर अनेकांचा रोगामुळे आणि प्रदेशातील खराब परिस्थितीमुळे मृत्यू झाला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या बळकटीकरणासह, १९०६ पर्यंत येथे एका मोठ्या सेल्युलर तुरुंगाची स्थापना करण्यात आली. ‘काला पानी’ (काळे पाणी तुरुंग) या ओळखल्या जाणाऱ्या या तुरुंगात वीर दामोदर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कैद करून ठेवण्यात आले होते.
पोर्ट ब्लेअरचा चोल राजाशी आणि श्री विजयाशी असणारा संबंध
काही ऐतिहासिक नोंदी असे दर्शवितात की, अंदमान बेटांचा उपयोग ११ व्या शतकातील चोल राजघराण्याचा सम्राट राजेंद्र प्रथम याने श्रीविजयवर हल्ला करण्यासाठी केला होता. आजच्या इंडोनेशियाला तेव्हा श्रीविजय म्हणून ओळखले जायचे. तंजावर येथे इसवी सन १०५० मधील सापडलेल्या शिलालेखानुसार, चोल सैन्याने बेटाचा उल्लेख ‘मा-नक्कावरम जमीन’ (मोठी मोकळी जागा) म्हणून केला. त्यामुळेच कदाचित ब्रिटिशांच्या काळात याला ‘निकोबार’ असे आधुनिक नाव पडले. इतिहासकार हर्मन कुलके यांनी त्यांच्या सह-संपादित पुस्तक ‘नागपट्टिनम टू सुवर्णद्वीपा: रिफ्लेक्शन ऑन द चोला इनव्हेझन टू साऊथईस्ट एशिया (२०१०)’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, श्री विजयवरील चोल आक्रमण ही भारताच्या इतिहासातील एक अनोखी घटना होती. या घटनेने दक्षिणपूर्व आशियातील राज्यांशी असणारे शांततापूर्ण संबंध भारताच्या मजबूत सांस्कृतिक प्रभावाखाली आले होते.
अनेक विद्वानांनी श्रीविजयवरील हल्ल्याच्या कारणाविषयी काही अनुमान काढले. नीलकांत शास्त्री यांनी सांगितले, “चोल यांच्या पूर्वेकडील व्यापाराच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी श्रीविजयकडून काही प्रयत्न झाले असावेत, त्यामुळे चोल सम्राटाने हल्ला केला. तसेच, सम्राट राजेंद्रला समुद्राच्या पलीकडील देशांपर्यंत आपले शासन पोहोचवण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी हा हल्ला केला असावा,” असाही त्यांचा अंदाज होता. अमेरिकन इतिहासकार जी. डब्ल्यू. स्पेन्सरसारख्या इतरांनी श्रीविजय मोहिमेचा अर्थ चोल विस्तारवादाचा भाग म्हणून केला आहे. हा विस्तारवाद दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या इतर साम्राज्यांबरोबरच्या युद्धांमध्ये अनेक दशकांपासून सुरू होता. शिलालेखाच्या नोंदीनुसार, श्रीविजयवर हल्ला केल्यानंतर राजेंद्र प्रथम याने राजा संग्राम विजयोत्तुंगवर्मन याला ताब्यात घेतले आणि बौद्ध साम्राज्यातून मोठ्या प्रमाणात खजिना लुटला; ज्यात विद्यादर तोरणा आणि श्रीविजयाचे रत्नजडित युद्ध द्वार होते.