मुंबई महानगर प्रदेशात होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे येत्या काळात येथे मोठ्या संख्येने पाण्याची गरज वाढणार आहे. नवी मुंबईचे स्वतःचे धरण आहे. मात्र नव्या लोकसंख्येला पाणी हवे आहे. तर पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांसाठी स्रोतांची उपलब्धता ही भविष्याची गरज आहे. त्यासाठी पोशीर आणि शिलार ही धरणे महत्त्वाची आहेत.

धरणाची नेमकी गरजी कशी ?

मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या ही वेगाने वाढते आहे. २०३० वर्षात अपेक्षित पाण्याची मागणी २०२० वर्षातच होऊ लागली. परिणामी पाण्याचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. शहरी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे काही भागात लोकसंख्या वाढीचा वेग कमालीचा आहे. त्यात नवी मुंबई, पनवेल, नवीन पनवेल शहर, कळंबोली या शहरांची वाढ वेगाने होते आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असलेले मोरबे धरण त्यांचा पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. तर पनवेल महापालिका देहरंग धरणावरच पाण्यासाठी अवलंबून आहे.

पनवेलचा विस्तार पाहता त्यांच्यासाठी नवा स्रोताची गरज आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. जवाहरलाल नेहरू बंदर न्यास ते बडोदे द्रुतगती महामार्गामुळे बदलापूर पनवेल, नवी मुंबई अंतर आणि समृद्धी महामार्ग अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. त्यामुळे येथे लोकसंख्येचा वेग झपाट्याने वाढला आहे. शेजारच्या उल्हासनगर शहरही सध्या फक्त बारवी धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे या शहरांना हक्काचा पाण्याचा स्रोत निर्माण करण्याची गरज आहे.

पोशीर आणि शिलार महत्त्वाची कशी?

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर धरण उभारणे प्रस्तावित आहे. १२.३४४ टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता असणार आहे. पोशीर नदी उल्हास नदीची उपनदी आहे. भीमाशंकरच्या डोंगरांवर पडणारा पाऊस पोशीर नदीला येऊन मिळतो. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. उल्हास खोऱ्यात उल्हास नदीवर धरण उभारणीसाठी भौगोलिक अनुकूलता नाही. त्यामुळे या पोशीर नदीचे पाणी उल्हास नदीत मिसळून पुढे खाडीमार्गे समुद्राला जाऊन मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या या पावसाच्या पाण्याला अडवल्यास वर्षभर पुरेल इतके पाणी मिळेल, अशी संकल्पना होती. त्यामुळे कुरूंग गावाजवळ असलेल्या डोंगरभागात पोशीर धरण प्रस्तावीत करण्यात आले. कर्जतच्या शिलारजवळ धरणाची उभारणी केली जाणार आहे. हा भागही चांगल्या पावसाचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्याचे पाणीही उल्हास नदीच्या माध्यमातून थेट समुद्रात जाऊन वाया जाते. त्यामुळे येथे धरण उभारणीचा प्रस्ताव आहे.

कोणत्या धरणातून किती पाणी?

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून शिलार आणि पोशीर धरणांच्या उभारणीचे काम केले जाणार आहे. यात सुरुवातीची निधीची अडचण, ज्या शहराला जितके पाणी तितका निधीचा वाटा या तत्त्वावर सोडवण्यात आली. त्यानुसार पोशीर धरणाच्या उभारणीसाठी २ हजार १३५ कोटी ९७ लाखांची गरज असून त्यातून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ३३.९६ टक्के अर्थात २ हजार १७१ कोटींचा वाटा उचलणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका ४३.५३ टक्के म्हणजे २ हजार ७८३.३७ कोटी, तर उल्हासनगर महानगरपालिका ९.५६ टक्के ६११.२८ कोटी, अंबरनाथ नगर परिषद ७.०७ टक्के, ४५२.०६ कोटी, कुळगाव बदलापूर नगर परिषद ५.८८ टक्के ३७५.९७ कोटी असा वाटा उचलणार आहे.

शिलार धरणाच्या उभारणीत सर्वाधिक वाटा हा पनवेल महापालिकेचा असणार आहे. शिलार प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ९.५१ टक्के अर्थात ७३४.३५ कोटी, पनवेल महानगरपालिका ७५.४२ टक्के ३,६७२.७५ कोटी आणि नवी मुंबई महानगरपालिकेसाठी १५.०७ टक्के अर्थात ४६२.६२ कोटी असा खर्च वाटून देण्यात आला आहे.

आणखी काय फायदा होणार?

गेल्या काही वर्षात उल्हास नदीला सातत्याने पूर येत असे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर तसेच अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर या तालुक्यांतील अनेक गावांना त्याचा मोठा फटका बसत असतो. पाऊस पडताच नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. गाळासह मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. त्यामुळे उल्हास नदीच्या उपनद्या असलेल्या पोशीर आणि चिल्हार नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवते. धरणांच्या उभारणीमुळे पूरस्थितीवरही नियंत्रण मिळवता येईल. त्यामुळे होणारी लाखो रुपयांची हानी टाळता येणार आहे.

धरणासमोर आव्हाने काय?

ठाणे जिल्ह्यात सध्या काळू धरणाच्या उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. मात्र या कामात स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे. गेल्या १४ वर्षांपासून काळू धरणाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात काही वर्षांपूर्वी प्रशासकीय पातळीवर झालेले गैरप्रकार आणि इतर गोष्टींमुळे स्थानिकांमध्ये संताप आहे. पोशीर आणि शिलार धरणांच्या बाबत खासगी भूसंपादन असल्यास त्यात संवादातून भूसंपादनाची गरज आहे. अन्यथा प्रकल्प रखडण्याची भीती अधिक आहे.