सिमरत कथुरिया
बाळाला जन्म दिल्यानंतर ३४ वर्षीय मनी बेहेल यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. वेगाने वजन वाढणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठता (पोट साफ न होण्याची स्थिती) आणि तीव्र थकवा यांचा त्यांना त्रास होऊ लागला. नव्याने आई झालेल्या इतर अनेक मातांप्रमाणेच अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या. अवेळी अति आहार घेण्याचे किंवा मानसिक तणावामुळे जास्त खाण्याचे त्यांचे प्रमाण वाढले. प्रसूतीनंतर वजन वाढणे त्यांना सामान्य वाटत होते, परंतु रक्त चाचण्या केल्यानंतर त्यात ‘फॅटी लिव्हर’ची अर्थात यकृतातील चरबी वाढल्याची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली.

फॅटी लिव्हरमुळे कोणते गंभीर आजार होतात?

फॅटी लिव्हर हा आजार यकृतामध्ये केवळ चरबी साठण्याच्या एका सामान्य समस्येपासून सुरू होऊन त्याचे रूपांतर पुढे यकृताला सूज येण्यात होऊ शकते. त्यानंतर पुढे यकृतावर व्रण किंवा डाग पडतात. याचे सर्वात गंभीर परिणाम म्हणजे यकृताचे कायमचे नुकसान होणे किंवा ते कडक होणे (सिरोसिस), यकृत निकामी होणे (लिव्हर फेल्युअर) आणि यकृताचा कर्करोग (लिव्हर कॅन्सर) हे असू शकतात.

भारतात शहरी भागातील अनेक महिलांमध्ये बाळंतपणानंतर उद्भवणारी ही एक आरोग्यविषयक समस्या आहे. प्रसूतीनंतर शरीरातील चयापचय क्रियेत होणारे बदल ओळखणे कठीण असते. कारण थकवा आणि पोट फुगणे या बाळंतपणानंतरच्या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत. त्यामुळे अनेक महिला ‘आई होण्याचा हा एक भागच आहे’ असे समजून याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही त्यांच्या आहारात विशेषत: मधल्या वेळेच्या खाण्याच्या (स्नॅक्स) बाबतीत काही शाश्वत आणि आरोग्यदायी बदल सुचवले. त्यांच्याकडून होणारे प्रक्रिया केलेले अन्न, चहासोबत खाल्ले जाणारे गोड पदार्थ आणि पॅकबंद उत्पादने यांचे सेवन पूर्णपणे बंद केले. त्याऐवजी त्यांच्या आहारात पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश केला. त्यामुळे त्यांना त्यांचे वजन आणि यकृताचे कार्य नियंत्रित ठेवण्यास मदत झाली. आम्ही त्यांच्या आहारात ज्या घटकांचा प्रामुख्याने समावेश केला, ते खालीलप्रमाणे आहेत:

अक्रोड आणि बदाम

मनी बेहेल यांना दुपारच्या वेळी जेव्हा भूक लागायची किंवा काहीतरी खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा त्या मूठभर सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) खायच्या. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि निरोगी चरबी (हेल्थी फॅट्स) असते, जे चयापचय क्रिया (मेटाबोलिज्म) निरोगी ठेवण्यास मदत करते असे मानले जाते. तसेच, अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् असतात, जे यकृताची सूज कमी करण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात सुकामेवा खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही म्हणूनच आहारतज्ज्ञांचा हा एक आवडता पर्याय आहे.

भाजलेले चणे

मनी बेहेल यांनी कार्बोहायड्रेट्सने भरलेली आणि आरोग्याला हानिकारक असलेली अत्यंत रिफाइंड स्नॅक्सची पाकिटे खाणे बंद केले. त्याऐवजी, त्यांच्यासाठी उच्च प्रथिने (प्रोटीन) आणि फायबर असलेला भाजलेला चणा हा एक सोपा आणि पोट भरवणारा उत्तम पर्याय बनला. याव्यतिरिक्त, चण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि पर्यायाने वजन कमी करण्यास व ते नियंत्रित ठेवण्यास मदत होते. फायबर शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास आणि फॅटी लिव्हरच्या समस्येतून बरे होण्यासही मदत करते.

सीड्ससह ग्रीक योगर्ट

कोणत्याही आहार योजनेत तुमच्या आतड्यांचे आरोग्य हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. विनासाखरेचे ग्रीक योगर्ट (घट्ट दही), चिया सीड्स आणि जवस हा त्यांचा संध्याकाळचा नियमित स्नॅक होता. प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ पचनासाठी फायदेशीर ठरू शकतात, चयापचय क्रियेला चालना देतात आणि शरीरातील सूज कमी करतात.

पॅकबंद गोड पदार्थांऐवजी ताजी फळे

मनी बेहेल यांनी दुपारच्या जेवणानंतर जंक फूड खाण्याची आपली सवय बदलून त्याऐवजी नैसर्गिक गोडवा असलेल्या सफरचंद, बेरी आणि पेरू यांसारख्या फळांचा आहारात समावेश केला. वेफर्स/चिप्स खाण्याची तीव्र इच्छा बाजूला सारून, आता त्या जेवणानंतर सफरचंद, बेरी आणि पेरू यांसारखी पोषक तत्वांनी भरपूर असलेली फळे खातात. फळांमधील अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि पॉलिफेनॉल्स हे असे फायदेशीर घटक आहेत, जे फॅटी लिव्हरच्या समस्येशी संबंधित असलेला ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ (oxidative stress – पेशींचे होणारे नुकसान) कमी करण्यास मदत करू शकतात.

हमस (Hummus)

इतर व्यावहारिक बदलांमध्ये, चिप्स आणि प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी काकडी, गाजर आणि ढोबळी मिरचीच्या फोडी ‘हमस’सोबत बुडवून खाण्याचा समावेश होता. हा पर्याय म्हणजे फायबर, पाणी, वनस्पती-आधारित प्रथिने (plant protein) आणि निरोगी चरबी यांचे उत्तम मिश्रण आहे. विशेष म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन एकत्र खाल्ल्याने वाढणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजशिवाय हे फायदे मिळतात. ऑलिव्ह ऑइल आणि हरभऱ्यांपासून बनवलेले हमस चयापचय आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.

मखाना आणि ग्रीन टी

मनी बेहेल यांच्यासाठी रात्रीच्या वेळी अचानक लागणारी भूक ही एक सर्वात मोठी समस्या होती. भाजलेल्या मखान्यामुळे अतिरिक्त फॅट आणि साखरेचे प्रमाण शरीरात न जाता त्यांची भूक शांत होण्यास मदत झाली. या स्नॅकसोबत ग्रीन टी घेतल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील वाढले. ग्रीन टीमध्ये ‘कॅटेचिन्स’ असतात. जे यकृतातील एन्झाइम्सची पातळी कमी करण्यासाठी आणि फॅट साठवून ठेवण्याचे प्रमाण घटवण्यासाठी उपयुक्त ठरतात का, यावर संशोधन केले गेले आहे.

नट बटरसोबत ओट्स

जेव्हा त्यांना काहीतरी थोडे जास्त आणि पोट भरेल असे खाण्याची गरज असायची, तेव्हा थोड्या नैसर्गिक पिनट बटरसोबत बनवलेले ओट्स हा एक आरोग्यदायी स्नॅक म्हणून उत्तम पर्याय ठरायचा. ओट्समध्ये विरघळणारे फायबर मोठ्या प्रमाणात असते, विशेषतः ‘बीटा-ग्लुकन’, जे रक्तातील साखर, इन्सुलिनची संवेदनशीलता आणि पचनक्रिया नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या सर्व गोष्टी फॅटी लिव्हरची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. काही महिन्यांतच मनी बेहेल यांचे वजन हळूहळू कमी होऊ लागले आणि त्यांच्या यकृताच्या आरोग्यामध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येऊ लागल्या. त्यांची ही यशोगाथा एका महत्त्वपूर्ण वास्तवाची आठवण करून देते. फॅटी लिव्हर हा आजार अनेकदा केवळ एका चुकीच्या आहार पद्धतीमुळे होत नसून, तो जीवनशैलीतील विविध सवयींशी जोडलेला असतो. त्यामुळे कोणत्याही टोकाच्या आहाराचे पालन करण्यापेक्षा नियमित व्यायाम, शाश्वत आहार पद्धतीचे नियोजन, पुरेशी झोप आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे अधिक चांगले पर्याय आहेत.
(सिमरत कथुरिया या एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ (celebrity nutritionist) आहेत.)