Post-surgery recovery and early mobilization importance for patients: शस्त्रक्रिया (Operation) झाल्यानंतर “आता पूर्ण बेडरेस्ट घ्या” हा जुना सल्ला आता मागे पडला आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार, शस्त्रक्रियेनंतर जितक्या लवकर सुरक्षित हालचाल सुरू होईल, तितक्या वेगाने रुग्ण बरा होतो. शस्त्रक्रियेनंतर जास्त हालचाल केली तर टाके सुटतील, जखम बिघडेल, वेदना वाढतील अशी भीती अनेकांच्या मनात असते. त्यामुळे रुग्णांचा कल हालचाल टाळण्याकडे असतो. पण आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि फिजिओथेरेपी याचं स्पष्ट मत आहे की, योग्य मार्गदर्शनाखाली लवकर हालचाल करणं हेच लवकर बरे होण्याचं गुपित आहे.

बेडरेस्टची कल्पना कशी तयार झाली?

पूर्वीच्या काळात शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका जास्त असायचा. भूलतंत्र, औषधं आणि शस्त्रक्रिया पद्धती आजच्या इतक्या प्रगत नव्हत्या. त्यामुळे रुग्णाला पूर्ण विश्रांती देणं हा सुरक्षित पर्याय मानला जायचा. पण आज परिस्थिती बदलली आहे. बहुतेक शस्त्रक्रिया या सोप्या पद्धतीने म्हणजेच मिनिमली इनवेसिव पद्धतीने होत आहेत. अतिशय सुरक्षित पद्धतीने रुग्णाला भूल दिली जाते आणि वेदना नियंत्रणासाठी अनेक आधुनिक साधनं देखील उपलब्ध आहेत. तरीही शस्त्रक्रियेनंतर बेड रेस्ट हा बरं होण्याचा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे असा समज अजून अनेकांच्या मनात आहे. हा समज बदलण्याची गरज आहे.

शरीराला हालचाल का आवश्यक आहे?

आपलं शरीर हालचालीसाठी तयार झालेलं आहे. शरीरातील विविध अवयव आणि प्रणाली जसं की हृदय, फुफ्फुसे, स्नायू, सांधे हालचालीवर अवलंबून असतात. शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बेडरेस्ट घेतल्यास काही गंभीर परिणाम होऊ शकतात:
  • स्नायूंची ताकद झपाट्याने कमी होते (मसल एट्रोफी) (Muscle atrophy)
  • रक्तप्रवाह मंदावणे, रक्तात गुठळ्या (डीप व्हेनेस थ्रॉमबोसीस) (DVT) होण्याचा धोका वाढणे
  • फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, छातीत कफ साचणे
  • बद्धकोष्ठता वाढणे
  • मानसिक अस्थिरता, भीती आणि नैराश्य वाढणे

केवळ ४८– ७२ तास झोपून राहिलं तरी स्नायूंची शक्ती लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये हा परिणाम अधिक तीव्र असतो.

‘लवकर हालचाल’ म्हणजे नेमकं काय?

लवकर हालचाल म्हणजे शस्त्रक्रियेनंतर लगेच सगळ्याच हालचाली किंवा क्रिया करणे असं नव्हे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर आणि फिजिओथेरेपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित, टप्प्याटप्प्याने हालचाल सुरू करणं हे महत्वाचं आहे. पहिल्या दिवशीच रुग्णाला पलंगावर बसवणं, पाय हलवायला सांगणं, श्वसनाचे व्यायाम शिकवणं ही सुरुवात असते. त्यानंतर हळूहळू उभं राहणं, काही पावलं चालणं, आणि पुढे दैनंदिन हालचालींमध्ये परतणं हा क्रम असतो. या प्रक्रियेला ‘अर्ली मोबीलायझेशन’ (Early Mobilization) असं म्हणतात आणि आज ही जगभरात स्वीकारलेली पुनर्वसनाची महत्त्वाची पद्धत आहे.

वेदना वाढतील का?

अनेक रुग्णांच्या मनात हा प्रश्न असतो किंवा ही भीती असते, की “हालचाल केली तर वेदना वाढतील का?”
शस्त्रक्रिये नंतरच्या सुरुवातीच्या एक- दोन दिवसात हालचाल करणे थोडं त्रासदायक असू शकतं. पण योग्य पद्धतीने, नियंत्रणाखाली हालचाल केली तर वेदना कमी होतात. योग्य हालचालींमुळे रक्तप्रवाह सुधारतो, सूज कमी होते आणि स्नायू पुन्हा सक्रिय होतात. या हालचाली झाल्या नाही तर अतिविश्रांतीमुळे स्नायूंची कार्यक्षमता कमी होते, काही स्नायू कडक होतात आणि हालचाल पुन्हा सुरू करताना जास्त त्रास होतो.

जखम बिघडण्याची भीती योग्य आहे का?

शस्त्रक्रियेनंतरची जखम टाके आणि ड्रेसिंगने सुरक्षित ठेवलेली असते. फिजिओथेरेपिस्ट जखमेवर ताण येणार नाही याची काळजी घेत योग्य ते व्यायाम योग्य प्रमाणात करवून घेतात. शास्त्रशुद्ध आणि फिजियोथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्याने जखम बिघडण्याची शक्यता संपते. प्रत्यक्षात, हलक्या हालचालींमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि जखम भरून येण्याची प्रक्रिया अधिक चांगली होते.

कोणत्या शस्त्रक्रियांमध्ये हे महत्त्वाचं?

गुडघा बदलणे (Knee Replacement), खुबा बदलणे (Hip Replacement), हृदयशस्त्रक्रिया अशा अनेक प्रक्रियांमध्ये शस्त्रक्रियेनंतर पहिल्याच दिवशी हालचाल सुरू केली जाते.
नी रिप्लेसमेंट झालेल्या रुग्णाला दुसऱ्या दिवशी चालायला लावणं आता सामान्य गोष्ट आहे. यामुळे रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो आणि दैनंदिन क्रिया सुरू करू शकतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम
बेडरेस्टमुळे रुग्णाला “मी आजारी आहे” ही भावना सतत जाणवते. हालचाल सुरू केल्यावर मात्र आत्मविश्वास वाढतो. हा पुनर्वसनाचा महत्त्वाचा भाग असतो.

मग पूर्ण बेडरेस्ट कधी आवश्यक?

काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, जसं की गंभीर फ्रॅक्चर्स किंवा वैद्यकीय गुंतागुंत, तात्पुरती बेडरेस्ट आवश्यक असू शकतो. पण हा निर्णय तज्ज्ञ डॉक्टर घेतात. सर्वसाधारणपणे, पूर्ण निष्क्रियता हा उपाय नसतो.

आराम आणि हालचाल यांचा समतोल

शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बेडरेस्ट घेणं हे सर्वतोपरी फायदेशीर ठरत नाही; उलट ते पुनर्वसनाची गती कमी करू शकतं. फिजियोथेरेपिस्टच्या योग्य मार्गदर्शनाखाली, टप्प्याटप्प्याने आणि सुरक्षित हालचाल करणं हाच लवकर बरे होण्याचा मार्ग आहे.
“आराम करा” याचा अर्थ “अजिबात हलू नका” असा नसतो.
आराम आणि हालचाल यांचा योग्य समतोल हाच शस्त्रक्रियेनंतरच्या यशस्वी पुनर्वसनाचा पाया आहे.