scorecardresearch

विश्लेषण : १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार बूस्टर डोस! पण कोणती लस देणार? अपॉइंटमेंट कशी बुक करायची? वाचा सविस्तर!

लसीच्या तिसऱ्या डोसला रविवारपासून सुरुवात होत आहे. यासाठीच्या बुकिंगपासून शुल्कापर्यंत अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं!

precautionary dose booster how to book appointment on cowin
करोनाच्या तिसऱ्या डोसला केंद्राकडून मंजुरी!

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ देशात ठाण मांडून बसलेल्या करोनाचा प्रभावा काही महिन्यांपासून कमी झाल्याचं दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. महाराष्ट्रात तर निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस अर्थात लसीचा तिसरा डोस देण्यात येत होता. आता येत्या रविवारपासून अर्थात १० एप्रिलपासून देशातील सर्व १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस द्यायचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पण यासाठी कोणते नियम पाळावे लागतील? बूस्टर डोससाठी कोणती लस दिली जाईल? ही लस घेण्यासाठी अपॉइंटमेंट कशी बुक करायची? पाहुयात…!

तुम्ही बूस्टर डोस कधी घेऊ शकता?

वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवड्यांचा कालावधी लोटला असावा.

बूस्टर डोस मोफत मिळणार आहे का?

नाही. १८ वर्षांवरील नागरिकांसाठी खासगी लसीकरण केंद्रांवर हा बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जी व्यक्ती बूस्टर डोस घेणार आहे, त्यांना त्यासाठीची किंमत द्यावी लागणार आहे. यासंदर्भात खासगी लसीकरण केंद्र लवकरच अधिकृत घोषणा करतील. त्यासंदर्भात कोविन अॅपवर देखील माहिती देण्यात येईल. मात्र, लसीच्या किमतीव्यतिरिक्त सर्व्हिस चार्ज म्हणून जास्तीत जास्त १५० रुपये खासगी लसीकरण केंद्रांना आकारता येतील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विश्लेषण: आधारमधल्या त्रुटींवर कॅगनंही ठेवलं बोट! काय आहेत सर्वांना सतावणाऱ्या समस्या?

बूस्टर डोस कुणाला मोफत मिळेल?

दरम्यान, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर तिसरा डोस मोफत मिळणार आहे.

उपलब्ध डोसची माहिती कशी मिळेल?

आपल्याकडील उपलब्ध करोना लसीच्या डोसची माहिती कोविन अॅपवर अद्ययावत करणं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खासगी लसीकरण केंद्रांना बंधनकारक केलं आहे. शिवाय, त्यांना प्रतिडोस किंमत देखील जाहीर करावी लागणार आहे.

विश्लेषण: अवघे जग घेते दूषित श्वास! काय सांगतो आरोग्य संघटनेचा अहवाल?

बूस्टर डोससाठी कोणती लस दिली जाईल?

संबंधित व्यक्तीने लसीचा पहिली आणि दुसरा डोस ज्या कंपनीचा घेतला आहे, त्याच कंपनीचा तिसरा डोस दिला जाईल. उदा. एखाद्या व्यक्तीने पहिला आणि दुसरा डोस कोविशिल्डचा घेतला असेल, तर त्या व्यक्तीला बूस्टर डोस देखील कोविशिल्डचाच दिला जाईल. ज्या व्यक्तीने कोवॅक्सिनचे दोन डोस घेतले असतील, त्या व्यक्तीला तिसरा डोस देखील कोवॅक्सिनचाच दिला जाईल.

तिसऱ्या डोससाठी पात्र आहोत की नाही कसं कळेल?

आधीच्या दोन डोसची माहिती आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती तिसऱ्या डोससाठी पात्र झाली, की त्या व्यक्तीला मोबाईलवर तशी माहिती दिली जाईल.

अपॉइंटमेंट न घेताच डोस घेण्यासाठी जाता येईल का?

होय. लसीच्या बूस्टर डोससाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्थात कोविन पोर्टलवरून आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील अपॉइंटमेंट बुक करता येऊ शकेल. खासगी लसीकरण केंद्रांवर अशा प्रकारे अपॉइंटमेंट बुक करता येईल.

विश्लेषण : निम्म्या भारतीयांना निद्रानाश? का उग्र बनतेय ही समस्या?

तिसऱ्या डोसनंतर नवीन लसीकरण प्रमाणपत्र मिळेल का?

होय. तिसरा डोस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोविन अॅपच्या माध्यमातून तिसऱ्या डोसबाबत कन्फर्मेशन एसएमएस येईल. असा एसएमएस मिळाला आहे किंवा नाही, हे लस देणाऱ्या केंद्रानं तपासायला हवं. यानंतर लस देणाऱ्या केंद्रामार्फतच नवीन प्रमाणपत्र तयार करण्यात येईल. लस घेणाऱ्या व्यक्ती कोविन मोबाईल अॅपवरून देखील तिसऱ्या लसीनंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात किंवा आरोग्यसेतू अॅपवरून देखील प्रमाणपत्र डाऊनलोड करता येऊ शकेल.

आत्तापर्यंत भारतात किती बूस्टर डोस देण्यात आले आहेत?

आत्तापर्यंत भारतात एकूण ४५ लाख १५ हजार आरोग्य कर्मचारी, ६९ लाख ७७ हजार फ्रंटलाईन वर्कर्स आणि १ कोटी २५ लाख ६० वर्षांवरील ज्येष्ट नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Precautionary covid dose booster for all adults how to book appointment pmw

ताज्या बातम्या