Can pregnancy occur before first period? मुलीच्या आयुष्यात पहिली मासिक पाळी येणे हा पौगंडावस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मासिक पाळी सुरू झाली की, तिच्या शरीरात प्रजननाशी संबंधित बदल सुरू झाले, अशी साधारण समजूत आहे. यावरून असाही एक गैरसमज पसरतो की, जोपर्यंत पहिली पाळी येत नाही, तोपर्यंत गर्भधारणा होऊ शकत नाही. वरकरणी हे तर्कशुद्ध वाटत असले, तरी स्त्रीच्या शरीरातील प्रजननचक्र (रिप्रॉडक्टिव्ह सायकल) समजून घेतल्यास या समजुतीतील त्रुटी स्पष्ट होतात.

मासिक पाळी हा प्रजननचक्राचा पहिला संकेत नसून, शरीरात त्याआधी घडलेल्या संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रक्रियेचा दिसणारा परिणाम असतो. महत्त्वाचे म्हणजे, पहिला मासिक रक्तस्राव होण्याआधीच ओव्ह्युलेशन (अंडोत्सर्ग – अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडणे) होऊ शकते. त्यामुळे एखाद्या किशोरवयीन मुलीच्या आयुष्यातील पहिलाच अंडोत्सर्ग पहिल्या पाळीपूर्वी झाला आणि त्याच काळात असुरक्षित लैंगिक संबंध झाले, तर गर्भधारणेची जैविक शक्यता निर्माण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) तांत्रिक अहवालातही ही शक्यता स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळेच पहिली पाळी आणि प्रजननक्षमता यांचा नेमका संबंध काय आहे? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

पहिली पाळी म्हणजे शरीरात नेमकं काय बदलतं?

पहिल्या मासिक पाळीला वैद्यकीय भाषेत ‘मेनार की’ (Menarche) म्हटले जाते. ही अचानक सुरू झालेली स्वतंत्र प्रक्रिया नसते, तर त्याआधी काही वर्षांपासून शरीरात पौगंडावस्थेतील बदल सुरू झालेले असतात. मेंदूतील हायपोथॅलॅमस (Hypothalamus), पिट्युटरी ग्लँड (Pituitary gland) आणि ओव्हरीज (Ovaries – अंडाशय) यांच्यातील संप्रेरक यंत्रणा सक्रिय होऊ लागते. यालाच ‘हायपोथॅलॅमिक-पिट्युटरी-ओव्हेरियन ॲक्सिस’ (HPO Axis) म्हणतात.

हार्मोन्सची भूमिका महत्त्वाची

या प्रक्रियेत जीएनआरएच (GnRH), एफएसएच (FSH), एलएच (LH), इस्ट्रोजन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) अशा विविध हार्मोन्सची महत्त्वाची भूमिका असते. स्तनांचा विकास, शरीरावरील केसांची वाढ आणि प्रजनन अवयवांतील बदल हे याच व्यापक प्रक्रियेचा भाग आहेत. म्हणूनच पहिली पाळी आली म्हणजे शरीरात प्रजननाची प्रक्रिया त्याच दिवशी पहिल्यांदा सुरू झाली, असा त्याचा अर्थ होत नाही.

आधी अंडोत्सर्ग की आधी पाळी?

हा या संपूर्ण विषयातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रौढ स्त्रीचे सामान्य ओव्ह्युलेटरी मेन्स्ट्रुअल सायकल समजून घेतले, तर अंडाशयात फॉलिकल (Follicle) विकसित होते. संप्रेरकांमधील बदलानंतर त्यातून परिपक्व अंडे बाहेर पडते; या घटनेला अंडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) म्हणतात. अंडोत्सर्गानंतर अंड्याचे फलन (Fertilization) झाले नाही आणि गर्भधारणा राहिली नाही, तर संप्रेरकांची पातळी घटते आणि गर्भाशयाचे तयार झालेले आतील अस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम (Endometrium) गळून पडते. यातूनच मासिक रक्तस्राव होतो. याचा अर्थ असा की, ओव्ह्युलेटरी सायकलमध्ये दिसणाऱ्या पाळीच्या आधीच ओव्ह्युलेशन झालेले असते. ‘डब्लूएचओ’च्या मेन्स्ट्रुअल हेल्थ मार्गदर्शक तत्त्वांमध्येही स्पष्ट करण्यात आले आहे की, ओव्ह्युलेशन झाल्यानंतर गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयाचे अस्तर मेन्स्ट्रुअल ब्लड (पाळीचे रक्त) म्हणून बाहेर पडते.

मग पहिल्या पाळीपूर्वी गर्भधारणा कशी शक्य आहे?

शरीरशास्त्रामध्ये या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. समजा एखाद्या किशोरवयीन मुलीच्या शरीरातील हार्मोनल यंत्रणा अशा टप्प्यावर पोहोचली की, तिचा आयुष्यातील पहिला अंडोत्सर्ग झाला. तिची पहिली पाळी अद्याप आलेली नसल्यामुळे तिला किंवा तिच्या कुटुंबाला या अंडोत्सर्गाची कोणतीही बाह्य खूण दिसणार नाही.

याच काळात असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास शुक्राणू आणि अंडे यांचा संयोग होऊ शकतो. ब्रिटनच्या ‘एनएचएस’ने (NHS) दिलेल्या माहितीनुसार, स्त्रीच्या रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये (प्रजनन मार्ग) शुक्राणू ३ ते ५ दिवस जिवंत राहू शकतात. त्यामुळे ओव्ह्युलेशनच्या काही दिवस आधी आलेले असुरक्षित संबंधदेखील गर्भधारणेस कारणीभूत ठरू शकतात. जर पहिल्याच अंडोत्सर्गात गर्भधारणा झाली, तर त्यानंतर होणारा पहिलं मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग (रक्तस्राव) होणारच नाही. म्हणजेच, मुलगी पहिली पाळी अनुभवण्यापूर्वीच गरोदर राहण्याची जैविक शक्यता असते. डब्लूएचओ (WHO) टेक्निकल रिपोर्ट सिरीजमध्येही पहिल्या पाळीपूर्वी ओव्ह्युलेशन आणि प्रेग्नन्सी शक्य असल्याचे नमूद केले आहे.

याचा अर्थ प्रत्येक मुलीमध्ये पहिल्या पाळीपूर्वी अंडोत्सर्ग होतो का?

नाही, आणि येथेच या विषयातील महत्त्वाचा वैज्ञानिक बारकावा लक्षात घेणे आवश्यक आहे. “पहिल्या पाळीपूर्वी गर्भधारणा होऊ शकते” आणि “प्रत्येक मुलीमध्ये पहिल्या पाळीपूर्वी अंडोत्सर्ग होतोच” ही दोन वेगवेगळी विधाने आहेत. पौगंडावस्थेत एचपीओ ॲक्सिस अजून परिपक्व होत असतो. त्यामुळे मासिक पाळी सुरू झाल्यानंतरही काही काळ प्रत्येक सायकलमध्ये अंडोत्सर्ग होईलच असे नाही. अशा सायकल्सना ‘ॲनओव्ह्युलेटरी सायकल’ (Anovulatory cycle) म्हणतात.

अंडोत्सग न होणारी पाळी

रिचर्ड रोझनफिल्ड (Richard Rosenfield) यांच्या ‘ॲडोलेसंट ॲनओव्ह्युलेशन’ या अभ्यासानुसार, पहिल्या पाळीनंतरच्या सुरुवातीच्या दोन वर्षांत जवळपास निम्म्या पाळ्या या ॲनओव्ह्युलेटरी (अंडोत्सर्ग न होणाऱ्या) असू शकतात. म्हणूनच पहिल्या पाळीपूर्वी गर्भधारणा होणे ही जैविकदृष्ट्या शक्यता आहे; प्रत्येकाच्या बाबतीत घडणारी अनिवार्य गोष्ट नाही.

पाळी सुरू झाली, पण ओव्ह्युलेशन होत नसेल तर?

या मुद्द्यामुळे आणखी एक गैरसमज दूर होतो. मासिक रक्तस्राव झाला म्हणजे त्या प्रत्येक पाळीच्या चक्रात अंडोत्सर्ग झालाच होता असे म्हणता येत नाही. लॉरा कार्लसन (Laura Carlson) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, पहिल्या पाळीनंतर नियमित ओव्ह्युलेटरी सायकल्स विकसित होण्याचा कालावधी प्रत्येक मुलीमध्ये वेगवेगळा असतो. सुरुवातीच्या काळातील अनियमित आणि ॲनओव्ह्युलेटरी सायकल्स ही एक सामान्य बाब आहे. वयानुसार आणि ‘मेनार की’नंतरचा काळ जसा वाढतो, तसतसे प्रजननचक्र अधिक परिपक्व होत जाते (जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम). त्यामुळे शरीरात रक्तस्राव, अंडोत्सर्ग आणि प्रजननक्षमता यांचा संबंध सरळ ‘पाळी आली किंवा नाही’ एवढ्यापुरता मर्यादित करता येत नाही.

पहिली पाळी म्हणजे सेक्ससाठी शरीर ‘तयार’ झाल्याचा संकेत आहे का?

हा आणखी एक मोठा गैरसमज आहे. मेनार की (पहिली पाळी) हे शरीरातील प्रजननाची परिपक्वता दर्शवणारे एक चिन्ह असले, तरी त्याला लैंगिक संबंधांसाठी शारीरिक किंवा मानसिक तयारीचे प्रमाणपत्र मानता येत नाही. पौगंडावस्थेत शरीराची वाढ, संप्रेरकांची परिपक्वता आणि भावनिक व मानसिक विकास या प्रक्रिया वेगवेगळ्या वेगाने होत असतात. त्यामुळे पाळी सुरू झाली म्हणजे शरीर आणि मन सेक्ससाठी पूर्ण तयार झाले असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, पाळी अजून आलेली नाही, म्हणून गर्भनिरोधकाची गरज नाही हा विचारही तितकाच धोकादायक आहे.

गर्भधारणा हा एकमेव धोका नाही

अंडोत्सर्ग झाला आहे की नाही किंवा मासिक पाळी सुरू झाली आहे की नाही, याचा एसटीआय (Sexually Transmitted Infections – लैंगिक संसर्ग) होण्याच्या धोक्याशी काहीही संबंध नसतो. असुरक्षित लैंगिक संपर्कातून संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे काँट्रासेप्शन (गर्भनिरोधन) आणि एसटीआय प्रोटेक्शन (संसर्गापासून सुरक्षा) हे दोन वेगळे विषय आहेत. गर्भनिरोधक गोळ्या किंवा साधने गर्भधारणा रोखतात; मात्र एसटीआयपासून संरक्षणासाठी कंडोमचा वापर अत्यंत आवश्यक आहे.

पाळी हे शरीराचे ‘कॅलेंडर’ आहे; गर्भधारणेचा ऑन-ऑफ स्विच नाही

या सर्व संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे स्त्रीची प्रजननक्षमता एखाद्या दिवशी अचानक बटण दाबल्यासारखी सुरू होत नाही. पौगंडावस्थेत मेंदू, हार्मोन्स, अंडाशय आणि गर्भाशय यांची गुंतागुंतीची यंत्रणा हळूहळू विकसित होत असते. पहिली पाळी हा या बदलांचा सर्वांत सहज दिसणारा टप्पा आहे, पण ती सुरुवात नव्हे.

म्हणूनच, “पहिली पाळी आलेली नाही म्हणजे गर्भधारणा होऊ शकत नाही” हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. पहिला अंडोत्सर्ग पाळीपूर्वी घडण्याची शक्यता असल्याने पहिल्या पाळीपूर्वीही गर्भधारणा होऊ शकते. त्याच वेळी किशोरावस्थेतील अनेक सायकल्स ॲनओव्ह्युलेटरी असतात, हेही तितकेच सत्य आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्यास पाळी, अंडोत्सर्ग आणि गर्भधारणा यांबद्दलचे गैरसमज दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर, पहिली पाळी ही प्रजननचक्राची पहिली दृश्य खूण असू शकते; पण प्रजननक्षमतेची अचूक तारीख मात्र ती सांगू शकत नाही.

महत्त्वाचे संदर्भ

  • World Health Organization-Menstrual Health
  • Carlson, L. J. & Shaw, N. D. (2019)-Development of Ovulatory Menstrual Cycles in Adolescent Girls
  • Rosenfield, R. L. (2013)-Adolescent Anovulation: Maturational Mechanisms and Implications
  • NHS-Periods and fertility in the menstrual cycle