President Draupadi Murmu Train Journey Special President Railway Train Security Protocol highlights the hidden operational logistics of Indian Railways: राष्ट्रपतींचा ताफा असं म्हटलं की, आपल्या नजरेसमोर हवाई दलाचे विमान किंवा मोटारींचा ताफा येतो. परंतु, ४ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशातील भुवनेश्वर ते ब्रह्मपूर हा सुमारे १७० किमीचा प्रवास ‘विशेष राष्ट्रपती रेल्वे’ने पूर्ण केला आणि एका नव्या चर्चेला उधाण आले. या ताफ्यात १ नव्हे तर ३ रेल्वेगाड्या समाविष्ट होत्या. या प्रवासामागे भारतीय रेल्वेची कोणती तांत्रिक, सुरक्षा आणि प्रशासकीय प्रणाली कार्यरत असते, याचा हा सविस्तर आढावा.
तीन रेल्वे गाड्यांचा विशेष ताफा
राष्ट्रपतींचा ताफा असं म्हटलं की, हवाई दलाचे विमान किंवा हेलिकॉप्टर अथवा मोटारींचा ताफा असंच चित्र आपल्या नजरेसमोर येतं. त्यामुळेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी भुवनेश्वर ते ब्रह्मपूर हा सुमारे १७० किमीचा प्रवास ‘विशेष राष्ट्रपती रेल्वे’ने केल्याची बातमी देशभर चर्चेचा विषय ठरली. कारण या ताफ्यात होत्या चक्क तीन रेल्वेगाडया. पहिली पायलट रेल्वे, त्यानंतर राष्ट्रपतींसाठीची विशेष रेल्वेगाडी आणि त्या पाठोपाठ एस्कॉर्ट रेल्वेगाडी. हा केवळ एका व्हीव्हीआयपीचा रेल्वे प्रवास नव्हता; तर भारतीय रेल्वेच्या अत्यंत गुंतागुंतीच्या सुरक्षा, तांत्रिक आणि प्रशासकीय प्रणालीचा एक आगळावेगळा नमुनाच होता.
राष्ट्रपतींसाठी स्वतंत्र रेल्वे सलोन म्हणजे नेमके काय?
विशेष म्हणजे, प्रथमच ब्रह्मपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेने विद्यमान राष्ट्रपतींनी पोहोचण्याची ही पहिलीच खेप होती. हवामान विभागाने ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे विमानाऐवजी रेल्वेचा पर्याय निवडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय रेल्वेकडे ऐतिहासिकदृष्ट्या काही विशेष सलून डबे राखीव असतात. ब्रिटिश काळात व्हाइसरॉय आणि संस्थानिकांसाठी तयार केलेल्या या परंपरेचे आधुनिक रूप सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि काही उच्च संवैधानिक पदांवरील अधिकारी व्यक्तींसाठी वापरले जाते.

या सलोनमध्ये सामान्य रेल्वे डब्यांपेक्षा असणाऱ्या वेगळ्या सुविधा खालीलप्रमाणे:
- वातानुकूलित शयनकक्ष
- स्वतंत्र बैठक व भोजनकक्ष
- संपूर्ण स्वयंपाकघर
- सुरक्षित संवादप्रणाली
- अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष
- आपत्कालीन ऊर्जा व पाणीपुरवठा

राष्ट्रपतींसाठीची ही विशेष रेल्वेगाडी (सलोन) साधारण १० डब्यांची होती, असे रेल्वे सूत्रांतर्फे सांगण्यात आले.
राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तीन रेल्वेगाड्या
सर्वसामान्यांना कदाचित आश्चर्य वाटावे, अशी बाब म्हणजे राष्ट्रपतींची विशेष रेल्वेगाडी एकटी धावत नाही. भारतीय रेल्वेच्या व्हीव्हीआयपी मूव्हमेंट प्रोटोकॉलनुसार तिच्याभोवती संपूर्ण सुरक्षा कवच तयार केले जाते.
१. पायलट ट्रेन
राष्ट्रपतींच्या रेल्वेगाडीच्या काही अंतर पुढे ही गाडी धावते. तिचे काम असते रेल्वे ट्रॅक सुरक्षित असल्याची खातरजमा करणे, रेल्वे फाटकांची तपासणी, सिग्नलिंगमध्ये कोणताही बिघाड नाही याची पडताळणी
आणि संभाव्य अडथळ्यांची पूर्वसूचना देणे

२. राष्ट्रपतींची विशेष रेल्वेगाडी
मध्यभागी असलेली ही मुख्य गाडी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती भवन सचिवालय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना घेऊन प्रवास करते.
३. रिअर एस्कॉर्ट ट्रेन
ही गाडी मागील बाजूची सुरक्षा सांभाळते. कोणतीही अनधिकृत रेल्वे वा इतर हालचाल, तांत्रिक बिघाड किंवा सुरक्षाविषयक धोका निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद देणे हे तिचे काम असते. याशिवाय, जवळच्या स्थानकावर स्टँडबाय ट्रेन सज्ज ठेवली जाते. इंजिन बिघाड, ब्रेक प्रणालीतील समस्या किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत ती तत्काळ वापरता येते.
संपूर्ण ट्रॅक रिकामा का केला जातो?
हा प्रश्न अनेकांना पडतो, पण त्याचे उत्तर अगदीच स्पष्ट आहे: राष्ट्रपतींची सुरक्षा ही देशासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब मानली जाते.
रेल्वे ट्रॅक सॅनिटायझेशन
व्हीव्हीआयपी रेल्वे मूव्हमेंट दरम्यान त्या मार्गावरील इतर सर्व प्रवासी आणि मालगाड्या थांबवल्या जातात,
कोणत्याही गाडीला `राष्ट्रपती विशेष रेल्वे सलून’च्या मागे येण्याची परवानगी नसते. समोरून येणाऱ्या गाड्या जवळच्या स्थानकात किंवा ‘आऊटर सिग्नल’वर; रोखल्या जातात आणि प्रत्येक लेव्हल क्रॉसिंगवर सुरक्षेसाठी रेल्वे कर्मचारी प्रत्यक्ष तैनात केले जातात. रेल्वेच्या भाषेत याला ‘ट्रॅक सॅनिटायझेशन’ म्हणतात. हा केवळ वाहतूक नियंत्रणाचा भाग नसून सुरक्षा तपासणीचाही महत्त्वाचा घटक आहे.
रेल्वे स्थानकांवरील अदृश्य लॉकडाऊन
भुवनेश्वर आणि ब्रह्मपूर स्थानकांवरील प्लॅटफॉर्म १ आणि २ राष्ट्रपतींच्या आगमनासाठी पूर्णपणे राखीव ठेवण्यात आले होते. साधारणपणे अशा वेळी रेल्वे प्लॅटफॉर्म किमान तीन तास आधी रिकामे केले जातात. सामान्य प्रवाशांना पर्यायी प्लॅटफॉर्मवर वळवले जाते. सीसीटीव्ही निरीक्षण वाढवले जाते आणि सामानाची तपासणी अधिक कडक केली जाते. रेल्वे संरक्षण दल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP), राज्य पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा संयुक्तपणे ही मोहीम हाताळतात.

रेल्वे मार्गावर ड्रोन बंदी का असते?
अलीकडच्या काळात ड्रोन तंत्रज्ञानामुळे व्हीव्हीआयपी सुरक्षेचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या रेल्वे प्रवासादरम्यान संबंधित मार्गावर नो-फ्लाय आणि नो-ड्रोन झोन लागू केला जातो. ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना अँटी-सॅबोटाज (घातपातविरोधी) पथके सतत गस्त घालत असतात.
भारतात यापूर्वी असे कधी घडले आहे?
- राष्ट्रपतींचे रेल्वे प्रवास अत्यंत दुर्मीळ असले तरी ते पूर्णपणे अभूतपूर्व नाहीत. यापूर्वीही काही राष्ट्रपतींनी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला आहे.
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- स्वातंत्र्यानंतरचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशभरातील दौऱ्यांसाठी अनेकदा विशेष रेल्वेचा वापर केला होता. त्या काळी हवाई वाहतूक मर्यादित असल्याने रेल्वे हाच प्रमुख अधिकृत प्रवासमार्ग होता.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. झाकीर हुसेन
- १९६० च्या दशकात काही राज्यांच्या दौर्यांसाठी या दोन्ही राष्ट्रपतींनी ‘विशेष राष्ट्रपती रेल्वे’चा वापर केल्याच्या नोंदी रेल्वे इतिहासात आढळतात.
- राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम
- डॉ. कलाम यांनी २००० च्या दशकात काही लष्करी आणि शैक्षणिक दौऱ्यांदरम्यान रेल्वेचा वापर केला होता; मात्र त्यातील बहुतेक प्रवास पूर्णपणे सार्वजनिक मार्गावर नव्हते.

पंतप्रधानांचे ऐतिहासिक रेल्वे प्रवास
१९८४ नंतरच्या काळात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठीही अशाच प्रकारच्या पायलट आणि एस्कॉर्ट रेल्वे व्यवस्थांचा वापर करण्यात आल्याचे रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध अभ्यासांत नमूद केले आहे.
ब्रिटिश कालखंडापासूनची परंपरा
भारतीय रेल्वेच्या डायरेक्टरेट ऑफ सेफ्टी आणि व्हीव्हीआयपी मूव्हमेंट मॅन्युअलमध्ये अशा मोहिमांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती अस्तित्त्वात होती. तिची पाळेमुळे ब्रिटिश भारतातील व्हाइसरॉय स्पेशलमध्ये सापडतात. त्या काळीही व्हॉइसरॉयच्या प्रवासापूर्वी रेल्वेमार्गाची पूर्वतपासणी, पूल आणि बोगद्यांची सुरक्षा पाहणी, स्टेशन परिसर बंद ठेवणे, स्वतंत्र सिग्नलिंग यंत्रणा अशी व्यवस्था केली जात असे.
सुरक्षित रेल्वे कमांड कॉरिडॉर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेला भुवनेश्वर ते ब्रह्मपूर हा प्रवास केवळ १७० किमीचा होता; परंतु त्याने भारतीय रेल्वेचा एक वेगळाच पैलू जनसामान्यांसमोर आणला. सामान्य प्रवाशांना दिसते ती रेल्वे म्हणजे रेल्वेगाड्या, प्लॅटफॉर्म आणि वेळापत्रक. परंतु, राष्ट्रपतींच्या या एका प्रवासासाठी त्यामागे कार्यरत होते ते शेकडो रेल्वे कर्मचारी, बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा, विशेष सिग्नल नियंत्रण, हवामान निरीक्षक, गुप्तचर समन्वय यंत्रणा, आपत्कालीन पथके. राष्ट्रपती हे आपल्या सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर असतात, त्या दृष्टीने पाहायचे तर राष्ट्रपतींच्या या प्रवासासाठी भारतीय रेल्वेने एक ‘सुरक्षित रेल्वे कमांड कॉरिडॉर’ तयार केलेला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या रेल्वे प्रवासाने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली, ती म्हणजे भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकव्यवस्था नाही; तर ती राष्ट्रीय सुरक्षा, संवैधानिक प्रतिष्ठा आणि प्रशासकीय समन्वय यांचा उत्तम ताळमेळ साधणारी यंत्रणाही आहे!
