Prince Harry Meghan Markle Love Story: सहा वर्षांपूर्वी ज्या ब्रिटिश राजघराण्याच्या चौकटीपासून दूर जाण्याचा निर्णय घेऊन प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली, त्याच ब्रिटनकडे आता त्यांची पावलं पुन्हा वळणार असल्याची चर्चा आहे. सध्या प्रसारित झालेल्या वृत्तानुसार, हॅरी आणि मेघन आपली मुलं… सात वर्षांचा प्रिन्स आर्ची आणि पाच वर्षांची प्रिन्सेस लिलिबेट यांच्यासह ब्रिटनमध्ये अधिक काळ व्यतित करण्याचा विचार करत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठीही ब्रिटनचा पर्याय विचारात असल्याची चर्चा आहे. मात्र कुटुंब कोणत्याही राजवाड्यात किंवा शाही निवासस्थानी नव्हे, तर खासगी घरात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने आता, हॅरी आणि मेघन पुन्हा ब्रिटनमध्ये आले, तर ते राजघराण्यातही परतणार का? याच प्रश्नाची चर्चा सुरू आहे.

या प्रश्नाच उत्तर तितकं सरळ नाही. कारण या उत्तरामागे दहा वर्षांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टमधून सुरू झालेली प्रेमकथा, जगाने पाहिलेलं शाही लग्न, राजघराण्याशी झालेला संघर्ष आणि शेवटी प्रिन्स हॅरीने आपल्या कुटुंबासाठी निवडलेलं वेगळं आयुष्य यामध्ये दडलं आहे.

पहिल्या नजरेतच मेघन आवडली…

२०१६ सालची गोष्ट. हॅरी एके दिवशी सोशल मीडिया पाहत असताना एका मैत्रिणीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याला मेघन दिसली. चेहऱ्यावर मजेशीर फिल्टर असलेली ती मुलगी पाहून त्याच्या मनात पहिला प्रश्न आला, ही कोण ? एका छोट्याशा कुतूहलातून दोघांची ओळख झाली. फोन नंबरची देवाणघेवाण झाली, मेसेजेस सुरू झाले आणि अखेर लंडनमधील 76 Dean Street येथे पहिली भेट ठरली.

पहिली भेट… आणि राजकुमार चक्क अर्धा तास उशिरा!

पहिल्या भेटीतच हॅरी अर्धा तास उशिरा आला. साहजिकच कुणालाही वाटेल… राजपुत्र आहे, आपल्या थाटात आला असेल. पण मेघनच्या आठवणीनुसार चित्र अगदी उलट होतं. उशीर झाल्यामुळे हॅरी वारंवार माफी मागत होता. तो मजेशीर, मनमोकळा आणि काहीसा लहान मुलासारखा वाटला आणि मग गप्पा अशा रंगल्या की पहिली भेट संपण्याआधीच दुसरी भेट ठरली. विशेष म्हणजे मेघनला ‘प्रिन्स हॅरी’ जाणून घेण्यात फारसा रस नव्हता. तिला जाणून घ्यायचा होता तो फक्त ‘हॅरी’. म्हणूनच ओळख करून देणाऱ्या मैत्रिणीला तिने विचारलेला प्रश्नही साधा होता “तो माणूस म्हणून चांगला आहे ना?”

लंडनमधून थेट बोत्सवानाच्या तारांकित आकाशाखाली

काही भेटींनंतर हॅरीने मेघनला अचानक विचारलं… बोत्सवानाला येशील का? मेघन तयार झाली. लंडनची गर्दी, कॅमेरे आणि शाही ओळखीपासून दूर आफ्रिकेच्या तारांकित आकाशाखाली त्यांनी काही दिवस एकत्र घालवले. तिथे ना राजपुत्र होता, ना टीव्ही अभिनेत्री. फक्त हॅरी आणि मेघन. कदाचित त्याच प्रवासात दोघांना जाणवलं असावं की, हे काही भेटींपुरतं आकर्षण राहिलेलं नाही. पण प्रेम जितक्या वेगाने फुलत होतं, तितक्याच वेगाने जगाची नजरही त्यांच्यावर पडत होती. २०१६ च्या अखेरीस ब्रिटिश माध्यमांमध्ये त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मेघनविषयीच्या काही अपमानास्पद आणि वर्णद्वेषी वृत्तांमुळे हॅरीने सार्वजनिकपणे तिच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्यातील तो एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण त्या दिवसापासून ही प्रेमकथा फक्त दोघांची राहिली नव्हती.

“आम्ही प्रेमात आहोत”

२०१७ पर्यंत मेघन हळूहळू हॅरीच्या सार्वजनिक आयुष्याचा भाग होवू लागली. पोलोचे सामने, मित्रपरिवार, कौटुंबिक कार्यक्रम आणि इन्व्हिक्टस गेम्समध्ये दोघे एकत्र दिसू लागले. आणि अखेर मेघननेही मनातलं उघडपणे सांगितलं, “आम्ही प्रेमात आहोत.” त्याच वर्षी हॅरीने त्यांच्या प्रेमकथेला आणखी एक फिल्मी वळण दिलं.

फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं

केन्सिंग्टन पॅलेसच्या परिसरातील बागेत मेणबत्त्या लावल्या. एका गुडघ्यावर बसला आणि मेघनला लग्नाची मागणी घातली. हॅरीचा प्रश्न पूर्ण होण्याचीही मेघनने वाट पाहिली नाही. अर्थात, तिचं उत्तर हो! असंच होत. साखरपुड्याची अंगठीही तितकीच खास होती. मधला हिरा त्यांच्या प्रेमाच्या सुरुवातीच्या आठवणी जपणाऱ्या बोत्सवानातून आणलेला, तर बाजूचे हिरे हॅरीची दिवंगत आई प्रिन्सेस डायना यांच्या दागिन्यांमधील. जणू नव्या नात्यासोबत आईची आठवणही हॅरीने जपून ठेवली होती.

जगाने पाहिलेलं शाही लग्न

१९ मे २०१८. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये पांढऱ्या विवाह पोशाखातील मेघन हॅरीकडे चालत येत होती आणि जगभरातील लाखो लोक तो क्षण पाहत होते. एका अमेरिकन अभिनेत्रीचा ब्रिटिश राजघराण्यात प्रवेश झाला होता आणि हॅरीला आयुष्याची जोडीदार मिळाली होती. बाहेरून पाहताना सगळंच एखाद्या परीकथेसारखं होतं.पण प्रत्येक परीकथेच्या मागे एक वेगळं वास्तव असतंच. लग्नानंतर काही महिन्यांत त्यांच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली. ६ मे २०१९ रोजी मुलगा आर्चीचा जन्म झाला. हॅरी वडील झाला होता. पण याच काळात माध्यमांचं लक्ष, वैयक्तिक आयुष्यावरील चर्चा आणि राजघराण्यातील मतभेद अधिक तीव्र होत गेले.

प्रेमासाठी घेतलेला सर्वांत मोठा निर्णय?

जानेवारी २०२० मध्ये हॅरी आणि मेघन यांनी जाहीर केलेल्या निर्णयाने ब्रिटिश राजघराण्यालाच नव्हे तर जगालाही धक्का दिला. दोघांनी वरिष्ठ ‘वर्किंग रॉयल्स’ म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांमधून मागे हटण्याचं ठरवलं. त्यांना स्वतंत्र व्यावसायिक आयुष्य जगतानाच अर्धवेळ अधिकृत शाही कर्तव्ये करायची होती; मात्र सँड्रिंगहॅममधील चर्चेनंतर अशी ‘अर्धी शाही-अर्धी स्वतंत्र’ व्यवस्था शक्य होणार नसल्याचं स्पष्ट झालं. मार्च २०२० नंतर हॅरी आणि मेघन राजाच्या वतीने अधिकृत कर्तव्ये करणारे ‘वर्किंग रॉयल्स’ राहिले नाहीत. राजघराण्याशी त्यांचं नातं संपलं नव्हतं; पण राजसंस्थेतील त्यांची अधिकृत भूमिका संपली होती. आणि त्यानंतर त्यांचा प्रवास त्यांना हजारो मैल दूर कॅलिफोर्नियातील मॉन्टेसिटो येथे घेऊन गेला.

राजवाड्यापासून दूर… पण वादांपासून नाही

ब्रिटन सोडल्यावर आयुष्य शांत होईल, असं कदाचित त्यांना वाटलं असेल. मात्र चर्चा थांबली नाही. ओप्रा विन्फ्रेला दिलेली मुलाखत, नेटफ्लिक्सचा Harry & Meghan माहितीपट, हॅरीचं Spare आत्मचरित्र, ब्रिटिश माध्यमांविरोधातील त्याच्या न्यायालयीन लढाया… प्रत्येक वेळी हॅरी आणि मेघन पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. कधी त्यांच्यावर टीका झाली. कधी त्यांना सहानुभूती मिळाली.

घटस्फोटाच्याही अफवा पसरल्या

इतकंच नव्हे, तर त्यांच्या लग्नाबद्दल आणि संभाव्य घटस्फोटाबद्दलही वारंवार अफवा पसरल्या. एका कार्यक्रमात हॅरीने त्याची खिल्ली उडवत म्हटलं होतं की बातम्यांनुसार त्यांनी अनेकदा घरं बदलली आहेत आणि बहुधा अनेकदा घटस्फोटही घेतला आहे! प्रत्यक्षात मात्र ते आपलं स्वतंत्र आयुष्य उभं करत राहिले. जून २०२१ मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी लिलिबेट डायना आली. आर्ची आणि लिली हळूहळू त्यांच्या जगाच्या केंद्रस्थानी आले.

आता पुन्हा ब्रिटनकडे?

…आणि म्हणूनच आज त्यांच्या ब्रिटनमधील संभाव्य पुनरागमनाची चर्चा अधिक उत्सुकता निर्माण करते. जर हॅरी, मेघन आणि त्यांची मुलं ब्रिटनमध्ये अधिक काळ राहू लागली, तर आर्ची आणि लिलिबेट यांना आपल्या वडिलांच्या मायदेशाशी आणि विस्तारित राजघराण्याशी जवळचं नातं निर्माण करण्याची संधी मिळू शकते. हॅरी आणि किंग चार्ल्स यांच्यातील वैयक्तिक नात्यासाठीही ते महत्त्वाचं ठरू शकतं. पण याचा अर्थ हॅरी आणि मेघन पुन्हा ‘वर्किंग रॉयल्स’ होतील, असा होत नाही. हॅरीकडे ‘प्रिन्स’ आणि ‘ड्यूक ऑफ ससेक्स’ या पदव्या असणं ही एक गोष्ट; तर राजाच्या वतीने अधिकृत दौरे, सार्वजनिक कार्यक्रम आणि शाही कर्तव्ये पार पाडणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. २०२० मध्ये ठरलेली व्यवस्था बदलल्याशिवाय त्यांचं जुन्या भूमिकेत पुनरागमन सहज शक्य नाही. त्यामुळे ते ब्रिटनमध्ये परतले, तरी ती राजवाड्यातील ‘घरवापसी’पेक्षा कुटुंबाच्या मुळांकडे परतण्याची गोष्ट अधिक असू शकते.

“वादळाच्या वर सूर्य नेहमी चमकत असतो…”

या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर हॅरीने मेघनला दिलेला एक सल्ला त्यांच्या नात्याचं सार सांगून जातो. कठीण काळात तो तिला म्हणाला होता, “माझ्या प्रिये, वादळ कितीही मोठं असलं तरी त्या वादळाच्या वर सूर्य नेहमी चमकत असतो.”

२०१६ साली एका सोशल मीडिया पोस्टमधून सुरू झालेलं कुतूहल प्रेमात बदललं. त्या प्रेमाने बोत्सवानाचं तारांकित आकाश पाहिलं, शाही लग्न पाहिलं, दोन मुलांचं आगमन अनुभवलं, राजघराण्यापासून दूर जाण्याचा कठीण निर्णय घेतला आणि हजारो मैल दूर स्वतःचं नवं घर उभं केलं. आता त्यांची पावलं पुन्हा ब्रिटनकडे वळली आहेत, तर ही कहाणी जिथून सुरू झाली त्या जगाशी पुन्हा एक नवं नातं जोडण्याची सुरुवात ठरेल का? की हॅरी आणि मेघन राजघराण्याच्या जवळ राहूनही आपलं स्वतंत्र जग तसंच जपतील? याच उत्तराकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल.