महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी, २०२६) विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या अपघाताच्या काही महिने आधीच एक अहवाल तयार करण्यात आला होता. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृतीवरील संसदीय स्थायी समितीने देशातील विमान वाहतुकीशी संबंधित सुरक्षेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. खासगी व चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वेगाने विस्तारत आहेत. परंतु, त्या तुलनेत विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र कमी पडत आहे. त्यामुळे नॉन शेड्यूल्ड सेक्टरमधील या कंपन्यांवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे त्या अहवालात म्हटले होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जदयूचे खासदार संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल तयार केला होता.
शेड्यूल्ड असलेल्या कमर्शियल एअरलाइन्स आखून दिलेल्या नियमांचे काही प्रमाणात पालन करताना दिसतात, तर खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नियमांच्या पूर्ततेबाबत अनियमितता दिसते असे निरीक्षण समितीने नोंदवले होते. देशात कॉर्पोरेट जेट, खासगी विमान आणि चार्टर्ड विमानांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, त्या तुलनेत विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र वाढत नाही. त्यामुळे विमान वाहतूक सुरक्षेशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे.
खासगी विमान, चार्टर्ड विमान सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार
देशात खासगी विमान, चार्टर्ड विमान सेवा क्षेत्र विस्तारत आहे. या सेवा सध्या नॉन शेड्यूल्ड सेक्टरमध्ये येतात. या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून होत असलेल्या मेन्टेनन्स स्टँडर्ड, ऑपरेशनल कंट्रोल स्ट्रक्चर व कागदपत्रांची पूर्तता या बाबींवर समितीने चिंता व्यक्त केली आहे. काही चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची तांत्रिक आणि सुरक्षा टीम कुशल नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. अशा कंपन्यांवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अचानक छापा टाकून तपासणी करण्याची तसेच त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याची गरज असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.
सेफटी मॅनेजमेंट सिस्टिम
उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी होती. त्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे एखाद्या ठिकाणी खराब हवामान असल्यास लँडिंग करावे की नाही, हा निर्णय देणारे ऑपरेशनल कंट्रोल सेंटर्स नसल्याचे समितीला आढळून आले होते. खासगी विमान सेवा मुख्यत: जिथे इतर कमर्शियल विमानाने जाता येत नाही, त्या ठिकाणी जाण्यासाठी राजकारणी व व्यावसायिक वापरतात. या विमान सेवा पुरवणाऱ्या सगळ्याच कंपन्यांना ‘सेफटी मॅनेजमेंट सिस्टिम’ (SMS) बंधनकारक करावी, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे. इतर कमर्शियल विमाने ‘सेफटी मॅनेजमेंट सिस्टिम’चे पालन करतात कारण कमर्शियल विमानतळांवर ती सुविधा उपलब्ध असते.
खासगी विमान कंपन्यांकडून विमानांचे नियोजन तसेच हवामानाचा अंदाज यांचा रेकॉर्ड ठेवला जातोय की नाही हे तपासणे आवश्यक आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच संभाव्य धोका काय आहे ? धोका असल्यास पर्यायी व्यवस्था काय आहे ? दृश्यमानता कमी असेल तर काय केले पाहिजे ? या बाबींचा विचार करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. खासगी विमानसेवा या नॉन शेड्यूल्ड आहेत म्हणून या बाबींकडे सर्रासपणे दुर्लक्ष होऊ नये, असे समितीने अहवालात म्हटले आहे.
DGCA वर कामाचा ताण
देशातील विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर (DGCA) कामाचा ताण असल्याचे अहवालात नमूद आहे. डीजीसीए ‘ओव्हरबर्डन्ड’ असल्याचे समितीने म्हटले आहे. डीजीसीएवरील जबाबदारी सातत्याने वाढत चालली असून मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे डीजीसीए एखादी घटना घडून गेल्यानंतर त्यावर काम करत आहे. डीजीसीएने टेक्निकल स्टाफ वाढवला पाहिजे, प्रशिक्षणात सुधारणा केली पाहिजे, तसेच डेटा ड्रिव्हन रिस्क असेसमेंट टुलचा वापर केला पाहिजे, अशा सूचना समितीने केल्या आहेत. असे केल्याने घटना घडून गेल्यानंतर कारवाई करण्याची वेळ डीजीसीएवर येणार नाही.
मानवी चुकांमुळे अपघाताची शक्यता वाढते
देशात वाढणारी विमानतळ व विमानांची संख्या, तसेच खासगी विमान सेवांना वाढणारी मागणी हे पाहता त्या तुलनेत सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास समस्या अधिक वाढतील, असा इशारा देण्यात आला आहे. विमान वाहतुकीच्या सुरक्षेत एअर ट्रॅफिक कंट्रोलचा (ATC) वाटा मोठा आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. ATC मधील कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी. खराब हवामान व विमान वाहतुकीतील अति महत्वाच्या तासांमध्ये ATC मधील कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव येतो. त्यामुळे मानवी चुका होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते, असे निरीक्षण समितीने अहवालात नोंदवले आहे.
अहवाल तयार करण्यासाठी मागील विमान दुर्घटनांचा अभ्यास
समितीने अहवाल तयार करण्यासाठी मागील काही विमान अपघातांचा अभ्यास केला. त्यात बहुतांश अपघात हे मानवी चुकीमुळे घडल्याचे आढळून आले. त्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे. तसेच वैमानिकांना तणावात योग्य निर्णय घेता येईल याबाबत प्रशिक्षण आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. विमान अपघातानंतर झालेल्या तपासांचा समितीने अभ्यास केला आहे. समितीने सूचवलेल्या बाबी फक्त कागदावर राहू नयेत, त्या प्रत्यक्षात अंमलात याव्यात यावर समितीने जोर दिला आहे. सुरक्षेशी संबंधित बाबींची पूर्तता होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी एक सेंट्रलाइज्ड मॉनिटरिंग मेकॅनिझ्म उभारण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे.

