Health Benefits of Blue Turmeric: काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी अलीकडेच त्यांच्या एका वेगळ्या आहारविषयक सवयीमुळे चर्चेत आल्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर लोकसभाध्यक्षांनी बोलावलेल्या एका अनौपचारिक बैठकीप्रसंगी त्यांनी ‘ब्ल्यू हळद’ (Blue Turmeric) या दुर्मीळ वनस्पतीच्या खास गुणधर्मांबद्दल आणि आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती दिली. त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग असलेलं हे दुर्मीळ कंद (rhizome) सध्या चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी आपण दररोज ब्ल्यू हळद का खातो, याचे कारण स्पष्ट केले. गडद निळ्या किंवा जांभळसर रंगाची ही दुर्मीळ हळद तिच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे ओळखली जाते.
ब्ल्यू हळद म्हणजे काय?
ब्ल्यू हळदीला काळी हळद (Black Turmeric) असेही म्हणतात. ही सामान्य पिवळ्या हळदीपेक्षा वेगळी आहे. दाहरोधक (anti-inflammatory), औषधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असल्यामुळे ती शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. प्रियांका गांधी वाड्रा यांनी सांगितले की, ब्ल्यू हळद प्रदूषणापासून संरक्षण करण्यास, घशातील खवखव कमी करण्यास आणि अॅलर्जीमुळे होणाऱ्या त्रासातून दिलासा देण्यास उपयुक्त ठरते. या हळदीच पीक वायनाड (केरळ) येथील जमिनीत घेतलं जात.
निळ्या हळदीचे आरोग्यदायी फायदे
अनेक संशोधनातून निळी हळद अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून त्यामध्ये जंतुनाशक (antibacterial) गुणधर्म आहेत, हे सिद्ध झालं आहे. यात कापूर (camphor), ar-turmerone तसेच इतर आवश्यक तेलांचे घटक आढळतात. कापूर आणि ar-turmerone यांसारखी द्रव्ये शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. या हळदीत कर्करोगविरोधी (anti-cancer) गुणधर्मही असल्याचे मानले जाते. कारण त्यात कर्क्यूमिनचे प्रमाण जास्त असते. मात्र, ब्ल्यू हळद वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच सावधगिरीने वापरावी आणि ती थेट औषधोपचारासाठी वापरू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. याशिवाय, सांधेदुखी आणि संधिवात (arthritis) यांमधील वेदनांपासूनही ही हळद काही प्रमाणात दिलासा देऊ शकते.

कर्क्यूमिन कसे काम करते?
Curcumin and Cancer Cells: How Many Ways Can Curry Kill Tumor Cells Selectively? या शास्त्रीय संशोधनानुसार, हळदीतील सक्रिय घटक असलेले कर्क्यूमिन (curcumin) कर्करोगावर प्रभावी औषध म्हणून महत्त्वाचे ठरते. कर्करोगात पेशींची वाढ अनियंत्रित होते, तर कर्क्यूमिन या पेशींमध्ये apoptosis म्हणजेच नियोजित पेशीमृत्यूची प्रक्रिया सक्रिय करते. ज्यामुळे कर्क पेशी स्वतःहून नष्ट होऊ लागतात. विशेष बाब म्हणजे, हे संयुग कर्क पेशींवर तुलनेने अधिक परिणामकारक असून सामान्य, निरोगी पेशींना कमी नुकसान पोहोचवते, जे पारंपरिक केमोथेरपीच्या तुलनेत मोठे फायदेशीर ठरते.
कर्करोगाचा दाह कमी करणारे…
कर्क्यूमिन कर्क पेशींच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या विविध cell signalling pathways ना रोखते, पेशींच्या ऊर्जा-निर्मिती केंद्रांवर (mitochondria) परिणाम करते आणि कर्क पेशींवरील death receptors ची अभिव्यक्ती वाढवते. याशिवाय, त्याचे दाहरोधक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील दीर्घकालीन दाह कमी करून कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. या सर्व कारणांमुळे, कर्क्यूमिन हे सुरक्षित, तुलनेने स्वस्त आणि प्रभावी असे पूरक उपचार घटक (adjunct therapy) म्हणून भविष्यात विकसित होण्याची मोठी क्षमता बाळगते, असे या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. असं असलं तरी हळदीतील कर्क्यूमिन कॅन्सर पेशींना रोखण्यास मदत करू शकते, परंतु तो कॅन्सरवरचा एकमेव उपाय (Cure) नाही, तर एक ‘सप्लिमेंट’ (पूरक उपचार) आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
ब्ल्यू हळद कुठे पिकते?
ब्ल्यू हळदीच्या बाहेरील सालीचा रंग तपकिरी असतो आणि तिला कापूरसदृश तीव्र सुगंध येतो. प्रामुख्याने ईशान्य भारत, केरळमधील वायनाड, तसेच मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये या हळदीची लागवड केली जाते. तसेच आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यांमध्येही ती पिकवली जाते. सामान्य हळदीप्रमाणेच तिची लागवड केली जाते आणि तिच्या वाढीसाठी साधारण नऊ महिने लागतात. मध्य प्रदेशात ब्ल्यू हळदीकडे फक्त औषध म्हणूनच पहिले जात नाही, तर तीला देवतेप्रमाणे पूज्य मानले जाते. चवीला ब्ल्यू हळद थोडी कडू आणि तिखट असते, रोजच्या स्वयंपाकात तिचा वापर केला जात नाही. ती दुर्मीळ असल्यामुळे सामान्य पिवळ्या हळदीपेक्षा महाग असते.
ब्ल्यू हळदीचे इतर औषधी गुणधर्म
- ब्ल्यू हळदीमध्ये कर्क्युमिनॉइड्स (Curcuminoids) आढळतात. तिच्या दाहरोधक (anti-inflammatory) गुणधर्मांमुळे संधिवात (arthritis) तसेच आतड्यांच्या दाहाशी संबंधित आजारांवर (inflammatory bowel disease) उपयोग होऊ शकतो.
- याशिवाय, ब्ल्यू हळद अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ती शरीरातील मुक्त रॅडिकल्स आणि विषद्रव्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते, दाह कमी करते आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते. त्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगाविरुद्धही ती उपयुक्त ठरू शकते, असे मानले जाते.
- ब्ल्यू हळद श्वसनसंस्थेशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. तिची पेस्ट पोटाशी संबंधित (गॅस्ट्रिक) तक्रारींमध्ये आराम देऊ शकते. तसेच जखमा भरून येण्यासही ब्ल्यू हळद मदत करते.
- ब्ल्यू हळद मधुमेहावर लाभदायक ठरू शकते आणि त्वचा व फुफ्फुसांशी संबंधित समस्यांमध्येही उपयुक्त ठरते. ब्ल्यू हळदीच कंद (मूळ भाग) ताप, डोकेदुखी, खोकला यांसारख्या त्रासांपासून ते साप चावल्यानंतरच्या उपचारांपर्यंत विविध समस्यांवर पारंपरिक औषध म्हणून वापरला जातो.
काळजी घ्यावयाच्या बाबी
ब्ल्यू हळद आरोग्यासाठी कितीही उपयुक्त असली, तरी ती मर्यादित प्रमाणातच औषध म्हणून उपयुक्त ठरते. दररोज ५०० मि.ग्रॅमपेक्षा जास्त सेवन केल्यास अॅलर्जी तसेच पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते. आरोग्यदायी फायद्यांनंतरही, अनेक सर्वेक्षणांनुसार अतिशोषण (over-harvesting) आणि अतिसेवन (over-consumption) यांमुळे ब्ल्यू हळद नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या दुर्मीळ वनस्पतीचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
