दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या कुश या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने गुरुवारी (२३ जुलै २०२६) घेतली. अतिउंचावरील हवाई धोक्याला या क्षेपणास्त्राने अचूक टिपले. बहुस्तरावरील हवाई सुरक्षा देशांतर्गत पातळीवर तयार करण्यामध्ये जे मोजके देश आघाडीवर आहेत, त्यांच्या पंक्तीत आपण जाऊन बसलो आहोत.

चाचणीचे महत्त्व काय?

क्षेपणास्त्रनिर्मितीमध्ये भारताने आघाडी घेतल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली आणि त्यातील समन्वय यामध्ये भारत वेगाने प्रगती करीत आहे. कुश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही या क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे आणि या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरील आपले यश अधोरेखित करते. हवाई सुरक्षेचा विचार केला, तर ती बहुस्तरीय असते. लांब, मध्यम आणि लघु पल्ल्याच्या अंतरांसाठी विविध प्रकारची क्षेपणास्त्रे लागतात. तसेच, शत्रूने डागलेली क्षेपणास्त्रे अथवा ड्रोन किंवा इतर हवाई शस्त्रे यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी सक्षम रडार यंत्रणा, सेन्सर्स आणि इतर आवश्यक तंत्रज्ञान लागते. भारत या तंत्रज्ञानात वेगाने पुढे जात आहे.

कुश क्षेपणास्त्र

दीर्घ पल्ल्याच्या कुश क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पडली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना या क्षेपणास्त्राची थोडी माहिती सामाजिक माध्यमावर दिली. ते म्हणतात, ‘हे क्षेपणास्त्र लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही), शत्रूची मोठी विमाने यांना भेदू शकते. भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठीचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. दीर्घ पल्ल्याची हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा मोजक्या देशांकडे आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे आपला आयातीवरील खर्च वाचेल आणि देशाच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होईल.’

‘प्रोजेक्ट कुश’ काय आहे ?

विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, कुश प्रकल्पांतर्गत लघु, मध्यम आणि लांब अशा तीन प्रकारची क्षेपणास्त्रे आपण विकसित करीत असून, शत्रूच्या हवाई हल्ल्यांना भेदण्याचे काम ही यंत्रणा करील. या प्रकल्पाला २०२२ मध्ये मंजुरी मिळाली. १०० किलोमीटरपासून ४०० किलोमीटरपर्यंतच्या हवाई लक्ष्यांना ही क्षेपणास्त्रे भेदतील. संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या (बीईएल) सहाय्याने या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  

वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान

‘प्रोजेक्ट कुश’ हा हवाई सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून, तो वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सध्या ‘डीआरडीओ’समोर आहे. पुढील १२ महिन्यांत या प्रकल्पांतर्गत असलेल्या तिन्ही प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे. हा प्रकल्प पुढील काही वर्षांत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण झाला, तर आपल्याला हवाई सुरक्षेच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही.

कुश क्षेपणास्त्र आणि ‘एस-४००’

कुश प्रकल्प संरक्षण दलांमध्ये दाखल होईपर्यंत आपल्याला रशियानिर्मित ‘एस ४००’ क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करावा लागेल. भारताने २०१८ मध्ये रशियामधून पाच ‘एस-४००’ प्रणाली खरेदी करण्याची मागणी केली. सध्या तीन प्रणाली भारतामध्ये असून, आणखी पाच प्रणाली खरेदी करण्यास या वर्षी मार्च महिन्यात आपण मंजुरी दिली. अब्जावधी रुपयांच्या खरेदीला दिलेली ही मंजुरी पाहता स्वदेशीनिर्मित कुश प्रणाली प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यास अवधी असल्याचे लक्षात येते.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून सुरक्षिततेही प्रगती

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शत्रूने डागल्यानंतर ती भेदण्यासाठी आणखी वेगळ्या प्रकारची यंत्रणा लागते. पृथ्वीच्या वातावरणाच्या आत आणि बाहेर ही क्षेपणास्त्रे भेदणारी प्रणाली तयार करावी लागते. ही क्षेपणास्त्रे डागल्यानंतर त्यांचा शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करेपर्यंतचा जो मार्ग असतो, त्यावरूनच त्यांना बॅलिस्टिक असे संबोधतात. त्यांना भेदण्याचे आव्हान त्यामुळेच मोठे असते. भारतात हा प्रकल्पदेखील आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ‘पृथ्वी एअर डिफेन्स’ आणि ‘अॅडव्हान्स एअर डिफेन्स’ (पीएडी आणि एएडी) या क्षेपणास्त्रांचा वापर भारताच्या बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (बीएमडी) होईल. भारताने १० आणि ११ जून २०२६ रोजी लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून आणि मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली. अशी प्रणाली असणाऱ्या अमेरिका, रशियासारख्या मोजक्या देशांत त्यामुळे भारत गेला आहे. कुश क्षेपणास्त्र प्रणाली ‘बीएमडी’ प्रणालीसह भारताच्या संरक्षण दलांत देशाच्या संपूर्ण हवाई सुरक्षा प्रणालीत लवकरात लवकर दाखल होणे गरजेचे आहे. भारतासाठी एक अभेद्य हवाई सुरक्षा कवच त्यामुळे तयार होईल.

हवाई सुरक्षेसाठी समन्वयाची यंत्रणा

हवाई दलासाठी एकत्रित मानवरहित हवाई यंत्रणाविरोधी यंत्रणेची (आयएसीसीएस) निर्मिती ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ने केली आहे, तर भूदलासाठी ‘आकाशतीर’ ही हवाई संरक्षण नियंत्रण आणि माहिती देणारी यंत्रणा आहे. हवाई संरक्षणासाठी कार्यरत सर्व यंत्रणांची एकत्रित माहिती ‘आयएसीसीएस’ घेते, तर आकाशतीर यंत्रणा लष्कराच्या हवाई संरक्षण केंद्रांना जोडलेली आहे. ‘प्रोजेक्ट कुश’ पूर्णत्वास गेल्यानंतर या हवाई सुरक्षा प्रणालींना तो जोडला जाईल. भारताच्या ‘सुदर्शन चक्र’ या मोहिमेचे हे सारे घटक असतील.

prasad.kulkarni@expressindia.com