मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी दावोस येथे, रायगड जिल्ह्यातील पेणजवळ एक हजार हेक्टरवर बीकेसीच्या धर्तीवर विकास केंद्र उभारण्याची घोषणा केली. यात एक लाख कोटींची गुतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. रायगडसाठी हा प्रकल्प म्हणजे मोठ्या धोरणात्मक बदलांची नांदी ठरू शकतो, या प्रकल्पाचे रायगड जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि स्थानिक पातळीवर काय परिणाम होऊ शकतील याचा थोडक्यात आढावा…
घोषणा काय?
वार्षिक आर्थिक परिषदेसाठी दावोस येथे गेल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा होती ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्राच्या उभारणीची. रायगड जिल्ह्यातील पेणजवळ हे नवे विकास केंद्र होऊ घातले आहे. नवी मुंबई विमानतळापासून काही किलोमीटरच्या अंतरावर हे विकास केंद्र वसवले जाणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर ते उभारण्यात येणार आहे. खासगी सार्वजनिक भागीदारीतून विकासित केले जाणारे हे पहिले शहरवजा केंद्र असणार आहे. या ठिकाणी किमान एक लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारही झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
नेमका कुठे येणार हा प्रकल्प?
रायगड जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये पूर्वी सिडकोमार्फत नवे नगर विकासित केले जाणार होते. यात पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील गावांचा समावेश होता. मात्र आता हा परिसर सिडकोऐवजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) समाविष्ट करण्यात आला आहे. यात पेण तालुक्यातील खारपाड्यापासून वडखळपर्यंतच्या गावांचा समावेश आहे. या परिसरातील जमिनी पूर्वी महामुंबई सेझ आणि विविध प्रकल्पासांठी संपादित करण्यात आल्या, ज्या वापराविना पडून होत्या. याच जागांचा वापर करून नवे विकास क्षेत्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्णय का घेतला?
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्याने, रायगड जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रात येणाऱ्या परिसरात विकासाच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. जेएनपीए प्रकल्पदेखील याच परिसरात असल्याने, तसेच रेल्वे कनेक्टिव्हिटी असल्याने, व्यवसाय, उद्योग आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने या परिसराचे महत्त्व वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन या परिसराचा संतुलित विकास करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. पायाभूत सुविधांचा विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. या परिसरात नवीन महसूल स्रोत निर्माण करणे गरजेचे होते. याच उद्देशाने पेणजवळ नवे आर्थिक विकास केंद्रे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर हे केंद्र विकसित केले जाणार आहे.
गुंतवणूक कुठून येणार?
दावोस येथील वार्षिक आर्थिक परिषदेत या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर जवळ पास एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. अनेक परदेशी कंपन्यांनी या प्रकल्पात स्वारस्य दाखवले. रिपब्लिक ऑफ कोरियातील हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप; एन्सार, फेडेक्स, ट्रिबेका डेव्हलपर्स हे अमेरितील समूह; फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरमधील स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, या कंपन्यांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे आगामी काळात बिझनेस डिस्ट्रिक्ट हब म्हणून पेण परिसर विकसित होण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचे इतर फायदे कोणते ?
औद्योगिक गुंतवणूकीबरोबर शैक्षणिक गुंतवणुकीची नवी दालने या प्रकल्पामुळे खुली होणार आहेत. अनेक परदेशी विद्यापीठांनी या परिसरात आपल्या शाखा सुरू करण्यात स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे गुंतवणुकीसोबत ज्ञान आणि तंत्रज्ञानही देशात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह – लंडन, आयसीसीआय – इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग – सिंगापूर या शैक्षणिक संस्थांनी या प्रकल्पात स्वारस्य दाखविले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्य सरकार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण( एमएमआरडीए) आणि खासगी कंपन्या एकत्र येऊन काम करतील. या ठिकाणी नवीन व्यवसाय केंद्र तयार करतील. त्यामुळे याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रकल्प का महत्त्वाचा?
या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आर्थिक, शैक्षणिक विकासाचा चालना मिळू शकेल आणि रोजगार निर्मितीही होईल. नोकऱ्यांसाठी मुंबईच्या दिशेने होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ रायगड जिल्हादेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे.
harshad.kashalkar@expressindia.com

