विश्लेषण : चीनमध्ये जनक्षोभ, करोना, टाळेबंदीविरोधात नागरिक रस्त्यावर; नेमकं कारण काय? | protest in major cities in china against government opposing lockdown and zero covid policy | Loksatta

विश्लेषण : चीनमध्ये जनक्षोभ, करोना, टाळेबंदीविरोधात नागरिक रस्त्यावर; नेमकं कारण काय?

चीनमध्ये लॉकडाऊन आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली जात आहे.

विश्लेषण : चीनमध्ये जनक्षोभ, करोना, टाळेबंदीविरोधात नागरिक रस्त्यावर; नेमकं कारण काय?
चीनमध्ये अशा प्रकारे आंदोलन केले जात आहे. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत आहे. करोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणामुळे चीनमध्ये लॉकडाऊन आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र येथे चीनमध्ये टाळेबंदीला कडाडून विरोध होत आहे. येथे शांघाय, बीजिंग यासारख्या प्रमुख शहरांमध्ये लोक टाळेबंदीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. लोकांकडून राष्ट्रध्यक्ष क्षी जिनपिंग यांना हटवावे अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर चीनमधील ‘झिरो कोव्हिड’ धोरण काय आहे? नागरिक टाळेबंदीविरोधात रस्त्यावर का उतरले आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

हेही वाचा >>> विश्लेषण : ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना मिळणार ९२५० रुपये! काय आहे सरकारची वय वंदन योजना? कसा मिळणार लाभ?

झिरो कोव्हिड धोरणाला होतोय विरोध

शांघाय, बीजिंग यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चीनमधील ‘झिरो कोव्हिड’ धोरणाला कडाडून विरोध होत आहे. झिरो कोव्हिड धोरणांतर्गत करोनाची लागण झालेली एखादी व्यक्ती आढळली की त्या भागात कडक टाळेबंदीचे आदेश दिले जातात. तसेच पीसीआर टेस्ट केल्या जातात. विशेष म्हणजे झिरो कोव्हिड धोरणांतर्गत नागरिकांच्या रोजच्या व्यवहारांवरही निर्बंध लादले जातात. याच कारणामुळे चीनमधील सरकारच्या या धोरणाला विरोध होत आहे. जगभरात जेव्हा करोनाचा उद्रेक झाला होता, तेव्हापासून म्हणजेच २०२० सालापासून चीनमध्ये हे झिरो कोव्हिड धोरण राबवले जात आहे. इतर देशांमध्ये करोना निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.

उरुमकीमध्ये आगीत १० लोकांचा मृत्यू

चीनमधील नागरिक टाळेबंदीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मागील काही वर्षांपासून येथील जनतेमध्ये सरकारविधोत रोष आहे. हाच रोष या निदर्शनांच्या माध्यमातून बाहेर येतोय, असे म्हटले जात आहे. या आंदोलनाला येथे राजकीय वळण मिळत असल्याचे दिसतेय. २४ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी शिंजियांग प्रांताची राजधानी असलेल्या उरुमकीमध्ये एका इमारतीला आग लागली. या आगीत १० लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर या आंदोलनाची धार तीव्र झाली. या घटनेनंतर येथील जनता शुक्रवारी रस्त्यावर उतरली. तसेच लॉकडाऊन संपवा अशा घोषणा येथे देण्यात आल्या. उरुमकी येथे नागरिक साधारण १०० दिवसांपासून टाळेबंदीला तोंड देत होते. याच कारणामुळे येथील नागरिकांमध्ये हा उद्रेक झाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?

विद्यापीठांपर्यंत पोहोचले आंदोलन

चीनमधील हे आंदोलन शांघाय, बीजिंग या मोठ्या शहरांव्यतिरिक्त विद्यापीठांमध्येही पोहोचले आहे. आंदोलकांनी बीजिंगमधील एका प्रतिष्ठित विद्यापीठात निदर्शने केली आहेत. येथे मेणबत्ती पेटवून या आंदोलनाला समर्थन देण्यात आले. शांघायमध्ये आंदोलकांनी पोलिसांना दाद दिली नाही. ‘लोकांची सेवा करा’, ‘आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे’, ‘आम्हाला आरोग्यासाठी कोणतीही बंधनं नकोत’ अशा आशयाच्या घोषणा या आंदोलकांनी दिल्या आहेत.

करोना चाचणी केंद्रांचीही तोडफोड

चीनमधील लॉन्झो या भागातही टाळेबंदीविरोधात निदर्शने करण्यात आली. येथे शनिवारी कोविड कर्मचाऱ्यांचे टेन्टवर आंदोलकांनी हल्लाबोल केला. येथे करोना चाचणी केंद्रांचीही तोडफोड करण्यात आली. कोणाचीही करोना चाचणी सकारात्मक आलेली नाही, तरीदेखील या भागात लॉकडाऊन लावण्यात आला आहे, असा आरोप येथील आंदोलकांनी केला आहे. पूर्वेतील नानजिंग, दक्षिणेकडील गुआंझू तसेच इतर पाच शहरांमध्येही चीन सरकार तसेच टाळेबंदीविरोधात आंदोलन झाले. या भागात आंदोलक-पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा >>>विश्लेषण : भारतात लवकरच होणार ‘टिल्टिंग रेल्वे’चं आगमन, काय आहेत खास वैशिष्ट्ये?

चीन सरकार ‘झिरो कोव्हिड’ धोरणाला महत्त्व का देते?

जगभरात करोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. मात्र चीनमधील सरकार तेथे अद्याप झिरो कोव्हिड धोरण राबवते. या धोरणामुळे अनेक लोकांचा जीव वाचला. असा दावा चीन सरकारकडून केला जातो. यामध्ये आम्हाला काही प्रमाणात यशही मिळाल्याचे येथील सरकार सांगते. तर दुसरीकडे सततच्या टाळेबंदीमुळे येथील लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच येथील अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे लाखो कुटुंबे घरात बंदीस्त झाली आहेत. याच कारणामुळे येथे सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:23 IST
Next Story
विश्लेषण: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?