China, Pakistan And A Proxy War Against India: पाकिस्तान भारतापेक्षा डावपेचात हुशार आहे आणि त्यातही त्याला समविघाती लोकांची साथ मिळाली तर काय होवू शकते याची कल्पना करणंदेखील भयावह आहे. याचीच प्रचिती मे महिन्यात झालेल्या भारत पाकिस्तान तणावादरम्यान आली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील DGMO पातळीवर झालेल्या चर्चेदरम्यान भारताकडून झालेल्या हल्ल्यांच्या मार्गांची अचूक माहिती पाकिस्तानने दिली. ही माहिती चिनी उपग्रह, सिग्नल इंटेलिजन्स (SIGINT) विमाने आणि रडार स्वीप्सद्वारे मिळवण्यात आली होती. त्यामुळे चीनचे ‘छुपं युद्ध’ तंत्र उघड झाले, असे सर्वोच्च सुरक्षा सूत्रांनी CNN-News18 ला सांगितले.
छुपं युद्ध म्हणजे काय?
छुपं युद्ध म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये थेट संघर्ष न होता, तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून लढला जाणारा युद्धप्रकार. यात एखादा देश स्वतः युद्धात सहभागी होत नाही. पण, दुसऱ्या देशाला, गटाला, दहशतवादी संघटनेस आर्थिक, लष्करी, तांत्रिक किंवा राजकीय स्वरूपाचा पाठिंबा देतो. भारत आणि चीन यांनी एकमेकांवर थेट हल्ला केला, तर ते थेट युद्ध आहे. परंतु, चीन पाकिस्तानला ड्रोन, माहिती, शस्त्रास्त्रं आणि आर्थिक मदत करतो आणि पाकिस्तान भारताशी लढतो, तर हे छुपं युद्ध आहे.
छुप्या युद्धात दिसणारे मुख्य घटक
- मुख्य देश – जो थेट लढत नाही, पण मागून नियोजन करतो.
- छुपा देश – जो प्रत्यक्ष लढतो.
- लक्ष्य देश – ज्या देशावर आक्रमण केले जाते.
- उपाय – गुप्तचर यंत्रणा, सायबर सुरक्षा, राजनैतिक भागीदारी आणि ISR प्रणालींचा सक्षम वापर करणे.
इतिहासातील काही प्रसिद्ध छुपी युद्धं
- शीतयुद्ध काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात थेट युद्ध न होता व्हिएतनाम, अफगाणिस्तान, कोरिया यांसारख्या देशांमध्ये छुपी युद्धं लढवली गेली.
- सीरिया संघर्षात अमेरिका आणि रशिया वेगवेगळ्या गटांना समर्थन देत होते.
पाकिस्तानचे अचूक प्रत्युत्तरात्मक हल्ले
अलीकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान चीनच्या इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स (ELINT) प्लॅटफॉर्मद्वारे भारताच्या एन्क्रिप्टेड कम्युनिकेशनमध्ये हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानला अचूक प्रत्युत्तरात्मक हल्ले करणे शक्य झाले, असे CNN-News18 दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. म्हणजेच चीनने दिलेल्या माहितीच्या मदतीने पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले.
लाइव्ह वेपन टेस्ट लॅब
पाकिस्तानने ८१% युद्धसामग्रीचा वापर करत भारताला अत्यंत अचूक प्रत्युत्तर दिले. यात J-10C लढाऊ विमाने, PL-15 क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर उपकरणांचा समावेश होता. त्यांनी या संघर्षाकडे ‘लाइव्ह वेपन टेस्ट लॅब’ म्हणून पाहिले, असे सांगितले जाते. ही सर्व युद्धसामग्री चीनकडून पाकिस्तानला देण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानचा हा वापर चीनसाठी त्यांची शस्त्रचाचणी करण्यासाठी उपयोगी ठरला. Bayraktar TB2 ड्रोन्स आणि त्यांच्याबरोबर असलेले प्रशिक्षक व पायलट सतत आकाशात गस्त घालत होते. त्यांनी केवळ शत्रुच्या हालचालींवर लक्ष ठेवले नाही, तर तोफेच्या गोळ्यांचे अचूक लक्ष्य साधण्यासाठी आवश्यक माहितीही पुरवली. या ड्रोन्समुळे पाकिस्तानला रिअल टाइम डेटा मिळाला आणि त्यांचे तोफेचे हल्ले अधिक अचूक व प्रभावी झाले.
इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला भारताचे उत्तर
- भारताच्या Project Kautilya जॅमर्सने चीन-पाकिस्तानच्या ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) चॅनेलमध्ये अडथळा निर्माण केला आणि ड्रोन व तोफेची अचूकता निष्प्रभ केली.
- स्टँडऑफ स्ट्राईक्स: SkyStriker ड्रोन्स, BrahMos आणि SCALP-EG क्रूझ क्षेपणास्त्रे वापरून मानवी सहभागाविना हल्ले करण्यात आले. भारताने ISR ला मिळणारी माहिती थांबण्यासाठी लक्ष्य निश्चितीची प्रक्रिया ६० मिनिटांखाली आणली.
- तिन्ही सेनादलांचा समन्वय: भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांना डायनॅमिक कंट्रोल ग्रीड अंतर्गत एकत्र आणले गेले. त्यामुळे शत्रूच्या ISR क्षमतेवर मर्यादा आली.
- जागतिक पातळीवरील प्रत्युत्तर: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि आखाती देशांशी संपर्क साधून भारताला कूटनीतिक पाठिंबा मिळवून दिला आणि चीनच्या गुप्त आक्रमकतेचा पर्दाफाश केला.
रणभूमीवरील वास्तव
- सैनिकी हालचालींच्या गोपनीयतेतल्या त्रुटींमुळे भारताला रणभूमीवर शत्रूवर कुरघोडी करताना सर्वाधिक अडथळा आला. सैन्याने कोणत्या दिशेने आणि किती प्रमाणात हालचाल केली, याची माहिती शत्रूच्या ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) यंत्रणेद्वारे अचूक टिपली गेली. परिणामी, भारताच्या हालचालींना वेळेआधीच प्रत्युत्तर मिळू लागलं.
- सुरक्षा सूत्रांचं म्हणणं आहे की, ही माहिती गुप्त न ठेवता आल्यामुळे झालेले नुकसान हे प्रत्यक्ष स्फोटक किंवा क्षेपणास्त्र गमावण्यापेक्षा जास्त महागात पडलं. रणनीतीच्या पातळीवर गोपनीयता भंग होणं म्हणजे शत्रूला आधी मारा करण्याची संधी देणं आहे.
छुपं युद्ध आता ‘प्रिसीजन गाईडेड’ झाले आहे
- आधी छुपं युद्ध म्हणजे दहशतवादी संघटनांना सहाय्य करणे किंवा अप्रत्यक्ष समर्थन मानलं जात होतं. मात्र, आता हाय-टेक, पूर्व नियोजित आणि थेट युद्धासारखी छुप्या युद्धाची रणनीति वापरली जात आहे.
- चीनने थेट रणभूमीवर सहभागी न होता, पाकिस्तान व तुर्की यांच्यासारख्या घटकांमार्फत प्रगत तंत्रज्ञान, क्षेपणास्त्रं, ड्रोन आणि ELINT यंत्रणा वापरून युद्ध लढवले आणि स्वतःवर कोणतीही जबाबदारी किंवा आंतरराष्ट्रीय टीका होऊ दिली नाही.
- यातून स्पष्ट होतं की, आधुनिक छुपी युद्धं केवळ राजकीय हेतू नव्हे तर अचूक लष्करी उद्दिष्टांसाठीही आखली जात आहेत. जिथे शत्रूचा प्रत्यक्ष सहभाग दिसत नाही. पण, त्याचा हस्तक्षेप सर्व निर्णायक घडामोडींमध्ये असतो.
भविष्यातील युद्ध
- शत्रू आधी पाहतो मग हल्ला करतोय. त्यामुळे आता भारताला ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) प्रणालींना निष्प्रभ करण्याच्या, म्हणजेच शत्रूच्या डिटेक्शन क्षमतेला आळा घालण्याच्या धोरणावर भर द्यावा लागेल.
- भविष्यातील युद्ध हे रणगाड्यांच्या गडगडाटावर नव्हे, तर माहितीची सुस्पष्टता, वेळेवर निर्णय आणि अचूक लक्ष्य ओळखण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. ‘पहिल्यांदा पाहणं’ म्हणजे ‘पहिल्यांदा जिंकणं’ हे तत्त्व नव्या युद्धपद्धतीचे मूलमंत्र ठरणार आहेत.
भारताचा प्रतिसाद: टॅक्टिकल अॅजिलिटी
भारताने ४८ तासांत ड्रोन-आधारित हल्ले, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि थिएटर कमांड यंत्रणा अमलात आणल्या. त्यामुळे शत्रूचा वेग कमी करता
आला.
ऑपरेशन सिंदूर: पिढी बदलणारं युद्ध
ऑपरेशन सिंदूर हे पारंपरिक युद्ध नव्हतं, तर पाचव्या पिढीचं, मल्टी-डोमेन युद्ध होतं. चीनच्या नियोजनात, पाकिस्तानने अंमलात आणले आणि तुर्कीयेने पूरक भूमिका बजावली. भारताचा खरा विजय रणांगणावर नव्हता, तर या नव्या युद्धपद्धतीला वेळीच ओळखून तंत्रज्ञानाशी झपाट्याने जुळवून घेण्यात होता.या नव्या युद्धपद्धतीला वेळीच ओळखून तंत्रज्ञानाशी झपाट्याने जुळवून घेण्यात होता.