पाकिस्तान सुपर लीगसाठी (पीएसएल) अनेक खेळाडूंनी ऐनवेळेस इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) धरलेला रस्ता, तसेच परदेशी खेळाडूंना मिळालेल्या धमक्या आणि काहींकडून अचानक मानधनात वाढ करण्याची मागणी होत असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) अडचणीत वाढ झाली आहे. इंधनटंचाईमुळे सुरुवातीचे सामने प्रेक्षकांविना खेळवण्याची नामुष्की ओढवली आहे. ‘पीएसएल’ला गुरुवार २६ मार्चपासून सुरुवात होत असून त्यामुळे लीगवर काय परिणाम होईल याचा घेतलेला आढावा.

परदेशी खेळाडूंना कोणती धमकी

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‘जमात-उल-अहरार’ने पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंना धमकी दिली आहे. आम्ही क्रिकेटविरुद्ध नाही. मात्र, सध्याची परिस्थिती ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी पोषक नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. एक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानला येऊ नये आणि ते आल्यास त्यांच्या सुरक्षेची कोणतीच हमी नाही असे संघटनेने म्हटले आहे.

अनेक क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानात खेळण्याविषयी फेरविचार करण्याचे खेळाडूंना सूचित केले होते. यानंतरही ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन, न्यूझीलंडचे मार्क चॅपमन आणि डेव्हॉन कॉन्वे, दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी लाहोरमध्ये पोहोचले. तसेच टिम पेन यांच्यासह परदेशी प्रशिक्षकदेखील पाकिस्तानात पोहोचले आहेत. बांगलादेशच्या चार खेळाडूंनाही त्यांच्या सरकारकडून ‘पीएसएल’साठी परवानगी मिळाली आहे.

पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वींचे मत काय?

पश्चिम आशियातील संघर्ष आणि सरकारच्या काटकसरीच्या धोरणामुळे यंदाचे ‘पीएसएल’ सामने प्रेक्षकांशिवाय (बंद दाराआड) खेळवले जाणार आहेत. तसेच उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असून स्पर्धा केवळ लाहोर आणि कराची या दोनच शहरांपुरती मर्यादित ठेवली आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी दिली.

‘‘चाहत्यांना तिकिटांचे पैसे परत मिळतील आणि त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या भागातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आम्ही प्रार्थना करतो,’’ असे नक्वी म्हणाले. लीगच्या फ्रँचायझींसोबत चर्चा केल्यानंतर आणि इंधनाची बचत करण्याच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, हे नक्वी यांनी स्पष्ट केले.

‘‘सध्याची परिस्थिती किती काळ टिकेल हे आम्हाला माहीत नाही, पण ‘पीएसएल’चे आयोजन करणे आवश्यक आहे. ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे आणि त्यात परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

जर आम्ही ‘पीएसएल’ पुढे ढकलले असते, तर नंतर ते आयोजित करण्यासाठी कोणतीही संधी मिळाली नसती,’’असे नक्वी म्हणाले. ‘‘पीसीबी’ आठ संघांना, सुरुवातीला जाहीर केलेल्या परंतु आता सामने आयोजित न करणाऱ्या ठिकाणांसाठीच्या अंदाजित प्रवेश शुल्काच्या (गेट मनी) स्वरूपात भरपाई देण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये फैसलाबाद, रावळपिंडी, पेशावर आणि मुलतान यांचा समावेश आहे,’’ असे नक्वी यांनी सांगितले. यंदाच्या ‘पीएसएल’मध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे.

खेळाडूंची ‘पीएसएल’मधून माघार का?

भारताच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला शनिवार २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर, ‘पीएसएल’ गुरुवारपासून सुरू होत आहे. या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी सुरू राहतील. ‘पीएसएल’चा समारोप ३ मे रोजी होईल. तर, ‘आयपीएल’ आणखी काही दिवस सुरू राहील. या दोन्ही स्पर्धा प्रत्येक हंगामात जवळपास एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे वादाला नेहमीच तोंड फुटते.

यंदाच्या ‘पीएसएल’मधून माघार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये गुडाकेश मोती, जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडिज), दसून शानका (श्रीलंका), ब्लेसिंग मुझारबानी (झिम्बाब्वे), स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅगर्क (ऑस्ट्रेलिया), ऑटनील बार्टमन (दक्षिण आफ्रिका), रहमानुल्ला गुरबाझ (अफगाणिस्तान) आणि टायमल मिल्स (इंग्लंड) यांचा समावेश आहे. त्यातील मुझारबानी, स्पेन्सर जॉन्सन, शानका यांना ‘आयपीएल’ संघांनी करारबद्ध केले आहे. तर, काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचे कळते. ‘पीसीबी’ केवळ खेळाडूंच्या करार उल्लंघनामुळेच नाही, तर शेवटच्या क्षणी खेळाडूंनी केलेल्या मानधनाच्या वाढीव मागणीमुळेही त्रस्त आहे.

लीगचा विस्तार करण्याच्या निर्णयापासून सध्या तरी ‘पीसीबी’ला दूरच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. ‘पीएसएल’मधून माघार घेताना काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणे दिली आहेत, तर काहींनी थेट ‘आयपीएल’मध्ये जात असल्याचे सांगितले आहे.

‘पीसीबी’मध्ये ‘आयपीएल’बाबत चिंता?

‘पीएसएल’च्या गेल्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला त्याच्याच देशातील जायबंदी खेळाडू लिझाड विल्यम्सच्या जागी मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले. मात्र, त्यानंतर वाद विकोपाला गेला. यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यंदाही काही खेळाडू ‘आयपीएल’मध्ये करारबद्ध झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘पीसीबी’च्या चिंतेत भर पडली आहे. ‘आयपीएल’ ही जगातील सर्वात मोठी लीग असून प्रत्येक खेळाडू यामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतो.

‘पीएसएल’च्या तुलनेने यामध्ये पैसेही अधिक मिळत असल्याने खेळाडूंना यामध्ये फायदा होतो. कोणताही खेळाडू जायबंदी झाल्यास लिलावात बोली न लागलेल्या खेळाडूंना संघात सहभागी करता येते. त्यामुळे खेळाडूही ‘आयपीएल’ला प्राधान्य देत आहेत. स्टीव्ह स्मिथ हा ‘पीएसएल’ इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला सियालकोट स्टॅलियन्सने भारतीय रुपयांप्रमाणे जवळपास ४.५ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.

याउलट आयपीएलमध्ये महागड्या खेळाडूंचे मानधन २० कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यावरून दोन्ही लीगमधील फरक आपल्याला कळू शकतो. ‘‘आयपीएल’ मध्ये सहभागी होण्यासाठी ‘पीएसएल’मधील आपले करार रद्द करणाऱ्या क्रिकेटपटूंवर ‘पीसीबी’चा कायदेशीर विभाग खटले चालवेल,’’ असे नक्वी यांनी सूचित केले होते. त्यामुळे या खेळाडूंवर खरोखरच कारवाईचा बडगा उचलला जातो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.