Psychology of Sleeping With a Blanket: आपल्यापैकी अनेकांना कोणताही ऋतू असो, अगदी प्रचंड उकडत असलं तरी अंगावर चादर किंवा पांघरूण घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. काही जण डोक्यापासून ते पायांपर्यंत संपूर्ण शरीर झाकून घेतात तर काहींना पांघरुणाचा एक कोपरा पायावर किंवा पोटावर घेतल्याशिवाय चैन पडत नाही. कोणीही कितीही बोललं किंवा हसलं तरी हा त्या व्यक्तीचा कम्फर्ट झोन असतो. या सवयीचा मेंदूशी नेमका काय संबंध आणि डॉक्टर काय सांगतात, त्याविषयी…
पांघरूण हे केवळ थंडीपासून संरक्षण देत नाही. तर अंगावर पांघरूण ओढून झोपण्याच्या या वर्तनाचा थेट संबंध आपल्या मेंदूने अंगीकारलेल्या सवयी, स्पर्शातून मिळणाऱ्या संवेदना, मनातील सुरक्षिततेची भावना आणि शरीराचे तापमान संतुलित राखणाऱ्या जैविक चक्राशी असतो. ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘व्हॉट इज अ वेटेड ब्लँकेट?’ (२०२२) या लेखात मानसशास्त्रज्ञ विनया गोरे सांगतात की, वजनदार पांघरुणाचा शरीरावर पडणारा हलका दाब एखाद्या आलिंगनासारखा (मिठीसारखा) भासतो. या स्पर्शात्मक दाबामुळे मज्जासंस्थेला शांत करणारी प्रक्रिया शरीरात सक्रिय होते; परिणामी ताण आणि चिंतेची लक्षणे ओसरून व्यक्तीला गाढ, शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते.
उकाडा असतानाही पांघरूण घेण्यामागचं मानसशास्त्र काय सांगतं?
मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास माणसाच्या अनेक सवयी या त्याच्या शारीरिक गरजांपेक्षा मानसिक अनुभवांशी अधिक संबंधित असतात. एखादी कृती वारंवार केल्यामुळे ती परिचित होते आणि कालांतराने तिचा विशिष्ट भावनिक अवस्थेशी संबंध निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, काही लोकांना झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय असते, तर काहींना विशिष्ट उशी किंवा शांत वातावरण आवश्यक वाटतं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींसाठी पांघरूण हा झोपेच्या वातावरणाचा अविभाज्य भाग असतो. अशा वेळी पांघरूण घेतल्यामुळे व्यक्तीला मानसिक आराम मिळू शकतो. परंतु, हा अनुभव व्यक्तिनिष्ठ असतो, हेही येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
मेंदूला पांघरुणाची सवय कशी लागते?
मेंदूला पांघरुणाची सवय कशी लागते? या प्रश्नाचे उत्तर मानसशास्त्रातील Conditioning (अनुबंधन) या संकल्पनेतून मिळते. मानवी मेंदू एखाद्या विशिष्ट वातावरणाचा किंवा कृतीचा दुसऱ्या अनुभवाशी अगदी सहज संबंध जोडतो. एखादी व्यक्ती लहानपणापासून दररोज पांघरूण घेऊन झोपत असेल, तर पांघरूण अंगावर ओढणे ही तिच्या झोपण्याच्या प्रक्रियेशी संबंधित एक परिचित आणि स्वाभाविक सवय होते. कालांतराने मेंदू या कृतीला झोपेची थेट पूर्वतयारी मानू लागतो.

या संदर्भात अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने (AASM) २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेली निद्रानाशावरील उपचारविषयक मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरतात. त्यामध्ये Stimulus Control (उद्दीपक नियंत्रण) या मानसशास्त्रीय उपचारपद्धतीचा उल्लेख आढळतो. या पद्धतीत, बेड किंवा शयनकक्ष मेंदूला विश्रांतीची त्वरित जाणीव करून देणारा एक मानसिक दुवा (Trigger) म्हणून काम करतो. म्हणजेच, अंधार, शांतता किंवा पांघरुणाचा स्पर्श मेंदूला झोपेची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत देतात. म्हणूनच पांघरुणाचा स्पर्श Stimulus Control म्हणून काम करत असावा, असे मानले जाते.
पांघरूण घेतल्यावर सुरक्षित वाटण्यामागे काय कारण असू शकतं?
पांघरूण अंगावर घेताच अनेकांना मिळणारा सुरक्षिततेचा आणि आरामाचा भास स्पर्शाच्या संवेदनेशी जोडलेला असतो. त्वचेतील संवेदनग्राही पेशी स्पर्श आणि हलक्या दबावाचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचवून मज्जासंस्थेला शांत करतात. यामागे प्रामुख्याने Deep Pressure Stimulation हे तत्त्व काम करते; शरीरावर पडणारा एकसंध दाब व्यक्तीला विश्रांतीची अनुभूती देतो. याच आधारावर वजनदार पांघरुणांचा (Weighted Blankets) वापर केला जातो.
पांघरुणामुळे चिंता कमी होते का? संशोधन काय सांगतं?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी स्वीडनमधील संशोधकांनी केलेला एक अभ्यास महत्त्वाचा ठरतो. यासंबंधित शोधनिबंध २०२० मध्ये Journal of Clinical Sleep Medicine या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला होता. या संशोधनासाठी केलेल्या प्रयोगात १२० प्रौढ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या व्यक्तींना निद्रानाशाबरोबर नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, सामान्य चिंताविकार किंवा एडीएचडी यांपैकी निदान झालेली समस्या होती. संशोधकांनी सहभागींचे दोन गट केले. एका गटाला वजनदार साखळी असलेलं पांघरूण देण्यात आलं, तर दुसऱ्या गटाला तुलनेने हलकं पांघरूण वापरण्यास सांगण्यात आलं. चार आठवड्यांनंतर वजनदार पांघरूण वापरणाऱ्या गटात निद्रानाशाच्या तीव्रतेत अधिक सुधारणा झाल्याचं आढळलं. थकवा, चिंता आणि नैराश्याशी संबंधित काही लक्षणांमध्येही सुधारणा नोंदवण्यात आली. या संशोधनातून वजनदार पांघरूण काही विशिष्ट रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतं, असे संकेत मिळाले. मात्र, या अभ्यासातील सहभागी आधीपासून निद्रानाश आणि मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते. त्यामुळे हे निष्कर्ष सर्वसामान्य निरोगी व्यक्तींना तंतोतंत लागू होतीलच असं नाही.
पांघरूण घेतल्याने झोप खरोखरच सुधारते की ती बिघडते?
२०१८ मध्ये Journal of Thermal Biology मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, झोपताना शरीराचे तापमान, येणारा घाम आणि तापमानातील अचानक होणारे बदल यांचा थेट परिणाम आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर होतो. आपण अंगावर घेतलेले पांघरूण आणि परिधान केलेले कपडे मिळून शरीराभोवती एक सूक्ष्म वातावरण (Sleep Microclimate) तयार करतात. हे वातावरण जितके संतुलित आणि आरामदायी असेल, तितकीच झोप शांत आणि सुखद लागते.

उलटपक्षी, पांघरुणामुळे उष्णता आणि घाम वाढल्यास झोपेत वारंवार व्यत्यय येतो. तसेच २०२४ मध्ये Journal of Sleep Research मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातही हेच स्पष्ट झाले की, पांघरुणाचा कापडाचा प्रकार आणि त्वचेचे तापमान यांचा परस्पर सखोल संबंध असतो. योग्य कापडाचे पांघरूण शरीराला योग्य तो निवांतपणा देते. त्यामुळेच, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत जाड किंवा उष्ण पांघरूण ओढण्याऐवजी, सुती आणि हलकी, हवेशीर चादर वापरणे शांत झोपेसाठी अधिक फायदेशीर ठरते.
