दसरा-दिवाळीसाठी काही दिवसच राहिले आहेत. दसरा-दिवाळी म्हटलं की, सर्वांच्या घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने डाळ, तेल, तूप आणि इतर किराणा वस्तूंचा वापर होतो. यंदा कडधान्यांसोबतच डाळीचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. चणे असो की तूर, मूग आणि वाटाणे, गेल्या महिनाभरात प्रमुख कडधान्यांच्या घाऊक किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनच्या (IPGA) आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात चण्याच्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूग १०.६ टक्के, तूर ६.५ टक्के, तर मटारच्या किमतीत सहा टक्के वाढ झाली आहे. रोजच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या कडधान्यांच्या किमती गेल्या आठवडाभरात तीन ते पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. आणि पुढे देखील दरामध्ये काही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.
सणासुदीच्या दिवसांत बाजारात किराणा आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे डाळींच्या किमतींवर त्याचा काहीसा परिणाम होतो. मात्र, डाळी महागण्यामागे केवळ सणासुदीची वाढती मागणी कारणीभूत नाही. उत्पादक भागांतील पावसाची कमतरता, जमिनीतील कमी ओलावा आणि रब्बी हंगामातील कडधान्यांचे अनिश्चित उत्पादन यांमुळेही डाळींच्या किमतींवरील दबाव वाढू शकतो. चणे, तूर, मूग आणि वाटाण्याच्या किमती एकाच वेळी का वाढल्या आहेत, त्यामागे नेमके काय कारण आहे? जाणून घेऊया सविस्तर…
गेल्या महिनाभरात कडधान्यांच्या घाऊक किमतींत लक्षणीय वाढ झाली आहे. महिनाभरात चण्याच्या किमती ११ टक्के, मूग १०.६ टक्के, तूर ६.५ टक्के आणि वाटाणे ६ टक्क्यांनी महागले आहेत. गेल्या आठवड्यातही या डाळींच्या किमतीत २.४ ते ५.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. वर्षभरातील चित्र पाहिले, तर चणा २३ टक्के, वाटाणे ४७ टक्के आणि उडीद २४ टक्के या प्रमाणात दर वाढले आहेत. मूग आणि मसूरच्या किमती अनुक्रमे ४ आणि २ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
घाऊक बाजारासोबत किरकोळ बाजारातही डाळींच्या किमती वधारल्या आहेत. सरकारच्या किंमत निरीक्षण प्रणालीच्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात चणा डाळीची सरासरी किंमत ८८.७२ रुपये किलो, तूरडाळ १२५.७२ रुपये, मूग डाळ ११२.१४ रुपये व मसूर डाळ ९०.४३ रुपये किलो होती. कडधान्यांच्या किमती कडाडल्याने डाळींचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.
सणांमधील वाढीव मागणीमुळे दर वाढले?
सणासुदीच्या काळात घरगुती किराणासह स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू आणि डाळींपासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे डाळींच्या किमती वाढण्यामागे सणासुदीतील वाढती मागणी हे एक कारण असू शकते. मात्र, डाळींच्या किमतींवर याव्यतिरिक्त अनेक घटकांचा परिणाम होतो.
एकीकडे सणासुदीमुळे बाजारातील मागणी वाढली आहे; तर दुसरीकडे कडधान्यांच्या उपलब्धतेबाबत व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. कडधान्यांच्या भविष्यातील पुरवठ्याबाबत अनिश्चितता असताना बाजारातील मागणी वाढल्याने किमतींवर अधिक दबाव आला आहे.
चण्याच्या किमतीत वाढ का होतेय?
चणे (हरभरा) हा भारतीयांच्या आहारातील प्रमुख कडधान्य आहे. त्यामुळे चण्याचे दर वाढल्यास त्याचा थेट परिणाम बाजारावर होतो. आगामी रब्बी हंगामाआधीच चण्याच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
चण्याचे पीक प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते. त्यामुळे पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असणे महत्त्वाचे असते. मात्र, यंदा एल निनो आणि असमान पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम आव्हानात्मक ठरू शकतो, असे कृषी सचिवांनी सांगितले आहे. त्यामुळे चण्याच्या पुढील उत्पादनाबाबतची अनिश्चितता वाढली असून, त्याचा सध्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.
आयातीच्या आघाडीवरही किमतीवरील दबाव वाढत आहे. भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातून चणा आयात करतो. मात्र, यंदा ऑस्ट्रेलियातील चण्याचे उत्पादन गतवर्षींच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारताने जानेवारी ते जुलै २०२६ या काळात सुमारे ६.४२ लाख टन हरभरा आयात केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आयात ४५ टक्क्यांनी कमी आहे. या आयातीपैकी जवळपास ९५ टक्के हरभरा ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आला.
याच काळात पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात एकाच वेळी अनेक घटकांचा परिणाम दिसून येत आहे. सणासुदीमुळे वाढलेली मागणी, पुढील हंगामातील उत्पादनाबाबतची चिंता आणि आयातीत झालेली घट यांमुळे हरभऱ्याचा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.
तूरीचे दर का वाढले?
तूर ही मुख्यतः खरीप हंगामातील डाळ असल्याने तिची स्थिती हरभऱ्यापेक्षा वेगळी आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांत पिकाची स्थिती चिंताजनक असल्याने तुरीच्या किमती वाढत आहेत. पावसाची कमतरता आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसाची मोठी तूट आहे. कर्नाटकातील काही भागांतही पावसाअभावी पिकांवर ताण आला आहे. हे दोन्ही प्रदेश तूर उत्पादनासाठी महत्त्वाचे असल्याने हवामानातील बदलांचा थेट बाजारातील किमतीवरदेखील परिणाम होतो.
देशभरातील तूरीची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तूरीची आयात करावी लागते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताने सुमारे १४.८ लाख टन तुरीची आयात केली. मागील वर्षाच्या तुलनेत ही आयात २१ टक्क्यांहून अधिक वाढली. मोझांबिक, म्यानमार व टांझानिया हे भारतासाठीचे प्रमुख तूर आयात स्रोत आहेत त्यामुळे बाजारात सरकारी आणि खासगी साठा उपलब्ध असला तरी देशांतर्गत पिकाची स्थिती आणि आयातीचा प्रवाह, अशा दोन्ही बाबींचा किमतींवर परिणाम होतो.
मूगाची स्थिती काय?
गेल्या महिनाभरात हरभरा आणि तुरीसोबतच मुगाच्या किमतीतही १०.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूग हे कमी कालावधीत घेतले जाणारे पीक असल्याने पावसाची वेळ आणि त्याचे वितरण यांचा त्याच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हवामानाची स्थिती पुढील पिकासाठी अडचणीची ठरू शकते. मात्र, किंमत वाढली म्हणजे बाजारात लगेच प्रत्यक्ष तुटवडा निर्माण झाला आहे, असे नाही. पुढील हंगामातील पुरवठा कमी होण्याची शक्यता दिसत असेल, तर त्याचा परिणाम म्हणूनही व्यापारी डाळींच्या किमती वाढवू शकतात.
पिवळा वाटाणाही महाग का होतोय?
हरभऱ्याला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. उद्योग प्रतिनिधींच्या मते, रशियाकडून होणारा पुरवठा कमी झाल्याने या किमती वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठ्याबाबतची अनिश्चितता वाढली असून, त्याचा आंतरराष्ट्रीय किमतींवर परिणाम झाला आहे.
भारत मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा आयात करतो. जानेवारी ते जुलै २०२६ या काळात भारताने सुमारे ७.२९ लाख टन मटार आयात केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आयात ११ टक्क्यांनी वाढली आहे. या आयातीपैकी ७९ टक्क्यांहून अधिक मटार कॅनडाकडून घेण्यात आला; तर रशियाही वाटाण्याचा प्रमुख पुरवठादार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा थेट परिणाम मटारच्या किमतीवर होतो.
डाळींच्या किमतींशी एल निनोचा काय संबंध?
एल निनोमुळे यंदाचा रब्बी हंगाम आव्हानात्मक बनला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी सचिव अतिश चंद्र यांनी अलीकडेच सांगितले की, एल निनोच्या प्रभावामुळे पावसावर अवलंबून असलेल्या भागांसाठी यंदाचा रब्बी हंगाम आव्हानात्मक ठरू शकतो. कमी पाऊस झालेल्या भागांत जमिनीतील ओलावा टिकून राहणे अवघड होऊ शकते; तर काही भागांत जमिनीत जास्त ओलावा निर्माण होऊ शकतो. या बाबीचा कडधान्यांच्या उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. कारण- रब्बी हंगामात कडधान्यांची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
कृषी सचिवांच्या माहितीनुसार, देशात रब्बी हंगामात साधारण ६३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. त्यापैकी सुमारे १४० लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची पिके घेतली जातात. यामुळे डाळींच्या किमतींवरही मोठा परिणाम होऊ शकतो.
दिवाळीपूर्वी डाळी आणखी महागणार का?
आगामी काळात सण-समारंभ, खरीप पिकाची आवक, रब्बी पेरणीची स्थिती, पाऊस आणि जमिनीतील ओलावा यांसोबतच आयातीची उपलब्धता आणि सरकारकडून होणारा साठा या सर्व स्थितीनुसार डाळींच्या किमती ठरणार आहेत.
खरीप पिकाची आवक चांगली राहिली आणि सरकारने बफर स्टॉकमधील पुरेसा साठा बाजारात आणला, तर किमतीवरील दबाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, हवामानबदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण असणार आहे. एकंदरीत डाळींसाठी सर्वसामान्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
