Mass layoffs in Pune IT Sector : पुण्यातील हिंजवडी परिसरात कार्यरत असलेल्या ‘थिंक टेक इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीने रातोरात आपले कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या सातशे ते आठशे कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. गेल्या आठ महिन्यात पुणे शहरातील पाच आयटी कंपन्या बंद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या चार ते पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे. दी इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हर्षल ठाकरे याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने नोकरीचे प्रलोभन दाखवून अनेक कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात इतरही काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. एका २५ वर्षीय प्रशिक्षणार्थी अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीवर विश्वासघात आणि फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ३० हून अधिक प्रशिक्षणार्थी अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी फसवणुकीची तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

फसवणूक प्रकरणात आतापर्यंत तिघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,’थिंक टेक इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे नोंदणीकृत मुख्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे. तसेच तिचे विभागीय कार्यालय पुण्यातील हिंजवडी परिसरातील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत होते. पोलिसांनी एफआयआरमध्ये कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे, प्रशिक्षण आणि विकास प्रमुख तसेच एका महिला एचआर मॅनेजरची आरोपी म्हणून नोंद केली आहे. पुण्यातील आयटी क्षेत्रात गेल्या काही महिन्यांत कंपन्या अचानक बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून आयटी उद्योगातील स्थैर्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंजवडीतील ताज्या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

लॅपटॉपसाठी अनामत रक्कम, वेतनही थकवले

या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगणेकर यांनी सांगितले की, संबंधित कंपनीने प्रत्येक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपसाठी १५,००० रुपये घेतले होते. तसेच दोन महिन्यांच्या विनावेतन प्रशिक्षणानंतर दरमहा १५,००० रुपये विद्यावेतन (स्टायपेंड) देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आमच्याकडे आतापर्यंत आलेल्या अनेक तरुण अभियंत्यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. सप्टेंबर २०२५ पासून ते तक्रार दाखल होईपर्यंत हा गैरप्रकार सुरू होता, असेही वांगणेकर यांनी स्पष्ट केले. तक्रारीनुसार, या कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आपले कामकाज सुरू केले होते, मात्र जानेवारी महिन्यापासून प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे मानधन देणे बंद केले. कंपनीने पगाराच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या आणि कर्मचाऱ्यांना दिलेले धनादेशदेखील बाऊन्स झाले, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून पगार दिला नसल्याला आणि अनेक नव्या कर्मचाऱ्यांकडून अनामत रक्कम (सिक्युरिटी डिपॉझिट) म्हणून १५,००० रुपये घेतल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

कामगार संघटनेचा नेमका आरोप काय?

‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ या संघटनेचे प्रमुख पवनजीत माने यांनी हा घोटाळा सध्या समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक मोठा असू शकतो, असा दावा करत सरकारी यंत्रणांच्या निष्क्रियतेवर टीका केली आहे. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाले की, आमच्या संघटनेकडे सध्या ७०० कर्मचाऱ्यांची ठोस माहिती उपलब्ध आहे. या कंपनीमुळे बेरोजगार झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास एक हजारच्या आसपास असू शकते. या कंपनीने ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या तीन गटांची भरती केली होती आणि प्रत्येक गटात सुमारे १२५ प्रशिक्षणार्थी होते. कंपनीत नक्की किती जणांनी फ्रेशर्स, इंटर्न आणि प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले, याची अचूक माहिती आम्ही अजूनही गोळा करत असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

आठ महिन्यांत पाचवी आयटी कंपनी बंद

फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांत पुण्यात अचानक बंद पडलेली ही पाचवी आयटी कंपनी आहे. त्यापैकी तीन कंपन्या हिंजवडी परिसरातील तर दोन कंपन्या विमाननगर-खराडी बायपास पट्ट्यात कार्यरत होत्या. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचे संघटनेने सांगितले. पवनजीत माने यांनी चार महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या फ्लायनॉट या कंपनीचे उदाहरण देत गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून सुमारे दीड लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली होती. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माने म्हणाले की, या कंपन्यांची कार्यपद्धती जवळपास सारखीच आहे. उमेदवारांच्या दोन मुलाखती घेतल्या जातात. त्यानंतर निवड झाल्याचे सांगून त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून पैसे जमा करण्यास सांगितले जाते. सुरुवातीला काही महिन्यांचे वेतन देऊन विश्वास संपादन केला जातो आणि नंतर अचानक पगार थांबवून कंपनी रातोरात गायब होते.

पुण्याच्या आयटी क्षेत्रावर काय होणार परिणाम?

गेल्या काही महिन्यांत पुण्यातील पाच आयटी कंपन्या अचानक बंद पडल्यामुळे सुमारे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याचा अंदाज आहे. या घटनांमुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रातील वाढती अस्थिरता अधोरेखित झाली आहे. विशेषतः नव्याने पदवीधर झालेल्या तरुणांवर आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात काम करणाऱ्या अभियंत्यांवर याचा मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. सुरक्षा ठेव म्हणून घेतलेली रक्कम, वेळेवर न मिळालेले स्टायपेंड आणि थकीत वेतन यामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. दरम्यान, हर्षल ठाकरे आणि या प्रकरणात नाव आलेल्या इतर संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेकडूनही कथित घोटाळ्याची व्याप्ती शोधण्यासाठी माहिती गोळा केली जात आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.