Pune Lohagad Fort Murder Case Siya Goyal Chetan Choudhary : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही संशयितांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले. केतनची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा मित्र चेतन चौधरीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याचे सूत्रांनी सांगितले. केतनच्या हत्येचा कट आपल्या मित्रानेच रचला असल्याचा दावा सियाने केला. चेतनने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून आपण सियाबरोबर पळून जाऊन लग्न करण्यास तयार होतो; पण तिनेच केतनचा काटा काढण्याचा हट्ट धरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या पार्श्वभूमीवर केतन अग्रवाल नेमका कोण होता, त्याला लोहगडावरून ढकलून देणारे सिया आणि चेतनची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, त्याविषयीचा हा आढावा…

कोण आहे सिया गोयल?

२० वर्षीय सिया गोयल ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. तिचे कुटुंब पुण्यातील मार्केट यार्डजवळील बिबवेवाडी परिसरातील ‘लीला कुंज’ या आलिशान बंगल्यात राहते. गोयल कुटुंबाचा सुक्या मेव्याचा (ड्राय फ्रूट्स) मोठा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. बिबवेवाडी हा दक्षिण पुण्यातील एक उच्चभ्रू निवासी आणि व्यावसायिक परिसर म्हणून ओळखला जातो. सियाचा होणारा पती केतन राहत असलेल्या गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ अपार्टमेंटपासून हा परिसर गाडीने साधारण एक तासाच्या अंतरावर आहे. सियाचे निकटवर्तीय तिचे वर्णन एक हसमुख आणि आनंदी असणारी मुलगी म्हणून करतात. तिला फॅशनची आवड होती आणि अलीकडेच तिने स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले जाते. मात्र, या व्यवसायाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरून पडून केतनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सियाला अटक झाल्यानंतर केतनची आई राखी अग्रवाल यांना तीव्र धक्का बसला. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या की, सिया इतर सामान्य मुलींसारखीच सुस्वभावी होती आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचे. आमच्या घरी पूजा आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती अनेकदा आली होती. आम्ही एकत्र खरेदीला आणि जेवायलाही गेलो होतो.

राजस्थानमध्ये होणार होता विवाह

अग्रवाल आणि गोयल कुटुंबांमध्ये दूरचे नातेही असल्याचे सांगितले जाते. यावर्षीच्या अखेरीस सिया आणि केतनचा विवाह होणार होता. मात्र त्याआधीच घडलेल्या या हत्याकांडाने सुन्न झालेल्या राखी अग्रवाल सांगतात की, लग्नापूर्वी आम्ही सियासमोर फक्त दोनच अटी घातल्या होत्या. पहिली अट- आमच्या घरात मद्यपानाला परवानगी नाही आणि दुसरी अट – तुला पार्टीसाठी बाहेर जाता येणार नाही. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पुण्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये सिया आणि केतनचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला होता. येत्या काही महिन्यातच राजस्थानमधील उदयपूर येथील एका राजवाड्यात त्यांचे लग्न होणार होते. त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी दोन खासगी विमानेही बुक करण्यात आली होती. केतनच्या मृत्यूनंतर समाजमाध्यमांवर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामध्ये तो सियाबरोबर खूपच आनंदी असल्याचे दिसून येते.

केतनच्या मृत्यूनंतर सियाचे ढोंग

केतनच्या मृत्यूनंतर सियाने समाजमाध्यमांवर भावनिक पोस्टही केली होती. माझ्या वाढदिवशी तू मला सोडून गेलास. आपले लग्न होण्याच्या अगदी जवळ असताना तू मला का सोडून गेलास, हे अजूनही मला समजलेले नाही. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? तुझ्या आत्म्यास शांती लाभो, असे तिने पोस्टमध्ये नमूद केले होते. सियाला तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान भाऊ आहे. या घटनेनंतर अग्रवाल आणि गोयल कुटुंबांना ओळखणाऱ्या अनेकांनी भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, सियाचे वडील प्रवीण गोयल यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. केतन आमच्यासाठी स्वतःच्या मुलापेक्षाही अधिक जवळचा होता. या प्रकरणात माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली ढकला, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

चेतन चौधरी कोण आहे?

२२ वर्षीय चेतन चौधरी याची सियासोबत साधारण आठ ते नऊ महिन्यांपूर्वी एका पार्टीत भेट झाल्याचे समजते. चेतनचे कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यातील श्री पार्श्वनगर सोसायटीत वास्तव्यास आहे. या परिसरातील रहिवाशांनी त्याच्यावरील आरोपांबद्दल आश्चर्य व्यक्त केले. एका शेजाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी चौधरी कुटुंबाला ओळखतो. चेतन हा परिसरात मुख्यतः खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. लहानपणापासून तो क्रिकेट खेळत होता आणि त्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या स्वभावात कधीही हिंसक प्रवृत्ती दिसली नाही. त्याच्या वागणुकीबद्दल सर्वांचे मत नेहमीच चांगले होते. चेतनचे काका उदयराम चौधरी यांनीही त्याच्यावरील आरोपांवर विश्वास बसत नसल्याचे सांगितले. चेतन हा उत्कृष्ट खेळाडू असून त्याने विविध स्पर्धांमध्ये १५० हून अधिक ट्रॉफी जिंकलेल्या असल्याचे ते म्हणाले.

चेतन चौधरीची कौटुंबिक पार्श्वभूमी

सोसायटीच्या आवारात चेतनला पाहणारे लोक सांगतात की, एकतर तो आवारात खेळताना दिसायचा किंवा मार्केट यार्डमधील त्याचे वडील बाबूलाल चौधरी यांना व्यवसायात मदत करताना आढळायचा. चौधरी कुटुंबाचा मार्केट यार्ड परिसरात ‘धनश्री मसाला’ या नावाने मसाले आणि सुका मेव्याचा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे, गोयल कुटुंबाचे घरही याच परिसरात आहे. सिया गोयलने आमच्या मुलाला या प्रकरणात जाणूनबुजून अडकवले असल्याचा आरोप चेतनच्या वडिलांनी केला आहे. चेतनचे वकील राम शहाणे यांनी न्यायालयात अद्याप त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचा दावा केला आहे. चेतन आणि सिया यांच्यात सातत्याने संपर्क होता हे आम्ही नाकारत नाही. मात्र, त्यांच्यातील संभाषण हे केवळ मैत्री आणि व्यावसायिक कारणांसाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी दोघांमध्ये दोन हजारांहून अधिक फोन कॉल झाल्याचा दावा केला असला, तरी त्या कॉल्सचा कालावधी, संदर्भ किंवा त्यासंबंधी कोणताही ठोस पुरावा अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, असा दावाही शहाणे यांनी केला आहे.

केतन अग्रवाल नेमका कोण होता?

लोहगड किल्ल्यावरून पडून मृत पावलेला २६ वर्षीय केतन अहवाल हा अत्यंत मनमिळावू आणि सर्वांचा आवडता होता, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर केतनला किल्ल्यावरून दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. केतन आपल्या कुटुंबासह पुण्यातील गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या आलिशान निवासी संकुलात राहत होता. ही वसाहत पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित निवासी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. याच सोसायटीतील रहिवासी ललिता सिंह सांगतात की, केतन अत्यंत मनमिळावू आणि नेहमी आनंदी स्वभावाचा होता. अग्रवाल कुटुंबाचे येथे सर्वांशी अतिशय चांगले संबंध आहेत. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर केतन दोन वर्षांपूर्वीच भारतात परतला होता. सुरुवातीला त्याने ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’ या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आणि त्यानंतर कुटुंबाच्या ‘सक्सेस ग्रुप’ या बांधकाम कंपनीत मुख्य विपणन अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली.

केतन अग्रवालची कौटुंबिक पार्श्वभूमी

अग्रवाल कुटुंबातील अनेक सदस्य याच कंपनीत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. केतनचे वडील विशाल अग्रवाल हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून आजोबा देवीचंद अग्रवाल हे अध्यक्ष आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, केतन अग्रवाल हा धोरणात्मक विपणन, व्यवसाय विकास आणि आधुनिक उद्योगांच्या गरजांनुसार ‘बिल्ट-टू-सूट’ रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करण्याचे काम पाहत होते. तसेच शाश्वत विकास आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्याच्या उपक्रमांमध्येही त्याचा सहभाग होता. सक्सेस ग्रुपने पुण्यातील चाकण येथे पाच औद्योगिक प्रकल्प, तसेच आकुर्डी, रावेत, निगडी, मोशी आदी भागांत सहा निवासी प्रकल्प उभारल्याची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे. दरम्यान- केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आणखी कोणकोणत्या बाबी उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.