कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांचा वेग तंत्रज्ञान क्षेत्रात एवढा प्रचंड आहे की, दिवसागणिक नवीन उलथापालथ होत आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात कर्मचारी कपातीचे वारे सुरू आहे. त्यातच आता मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्य कंपनीवर अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर करण्याची वेळ आली आहे.

पार्श्वभूमी नेमकी काय?

मायक्रोसॉफ्टमध्ये अमेरिकेत कार्यरत असलेल्या एकूण मनुष्यबळाची संख्या १ लाख २५ हजार आहे. त्यातील ८ हजार ७५० म्हणजेच ७ टक्के कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ५१ वर्षांच्या इतिहासात अशा प्रकारचे पाऊल पहिल्यांदाच उचलले आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात कंपनीने १५ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कंपनीच्या समभागाला सातत्याने फटका बसला असून, गेल्या सहा महिन्यांत समभागात २५ ते ३० टक्के घसरण झाली आहे. कंपनीने एआयसाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर मोठ्या प्रमाणात खर्च सुरू केला आहे. यासाठी पुढील काही वर्षांत १०० अब्ज डॉलरहून अधिक खर्च करण्याची घोषणा कंपनीने गेल्या वर्षी केली. या वाढत्या खर्चाचा परिणाम होऊन कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.

योजनेचे निकष कोणते?

मायक्रोसॉफ्टने या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी प्रामुख्याने तीन निकष निश्चित केले आहेत. त्यात सर्वप्रथम कर्मचाऱ्याचे वय आणि अनुभव हा निकष आहे. कर्मचाऱ्याचा कंपनीतील अनुभव आणि त्याचे वय यांची बेरीज ७० अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तो पहिल्या पातळीवर पात्र ठरेल. दुसरा निकष हा कर्मचारी कोणत्या पदावर कार्यरत आहे, हा आहे. ही योजना वरिष्ठ संचालक आणि त्यापेक्षा कनिष्ठ पदांसाठी लागू असेल. मात्र, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश नाही. तिसरा निकष म्हणजे विक्री प्रोत्साहन योजनेअंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी पात्र ठरणार नाहीत. पुढील काही दिवसांत कंपनीकडून या योजनेबाबत अधिक तपशील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी कशी?

या योजनेसाठी पात्र कर्मचाऱ्यांना ७ मे रोजी कंपनीकडून सूचना देण्यात येईल. त्यांना निर्णय घेण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील भविष्याचा निर्णय घेण्यासाठी केवळ महिन्याभराचा कालावधी मिळेल. या योजनेतून कर्मचाऱ्यांना नेमकी किती रक्कम दिली जाणार, याचे तपशील कंपनीने जाहीर केलेले नाहीत. तसेच, कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेली आरोग्यविमा सुविधा सुरू राहील की नाही, याबाबतही स्पष्टता नाही. तसेच, सर्वसाधारणपणे प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही बंधने घातली जातात. या योजनेच्या माध्यमातून कंपनीतून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची बंधने नसतील, असे समजते.

कपातीऐवजी स्वेच्छानिवृत्ती का?

करोना संकटानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली होती. त्यानंतर हे मनुष्यबळ अतिरिक्त ठरू लागल्याने कपातीचे चक्र सुरू झाले. मायक्रोसॉफ्टने २०२३ मध्ये जगभरातील एकूण मनुष्यबळापैकी १० हजार म्हणजेच ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्यानंतरही कर्मचारी कपात सुरूच राहिली. गेल्या वर्षी कंपनीने १५ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली. या कपातीवरून कंपनीवर बरीच टीका झाली. यामुळे कर्मचारी कपातीमुळे निर्माण होणारे नकारात्मक वातावरण टाळण्यासाठी कंपनीने स्वेच्छानिवृत्तीची योजना आणल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याऐवजी त्यांनीच बाहेर पडण्याचा पर्याय निवडला, अशी सकारात्मक बाजू यातून दिसावी, असाही कंपनीचा प्रयत्न आहे. परंतु, कंपनी कर्मचाऱ्यांनी नेमकी किती भरपाई देणार यावर, हे पाऊल सकारात्मक की नकारात्मक ठरणार हे अवलंबून असेल.

इतर कंपन्यांत काय स्थिती?

तंत्रज्ञान क्षेत्रातील ॲमेझॉन, मेटा आणि ओरॅकल यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांकडून खर्चात कपातीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. मेटाने नुकतीच ८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली. कंपन्यांकडून नवनिर्मितीक्षम कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे. यासाठी मोठी विदा केंद्रे स्थापन केली जात आहेत. एआयसाठी भांडवली खर्च वाढल्याने कंपन्यांना खर्चात कपात करावी लागत आहे. त्यातच एआयमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नोकऱ्या अनावश्यक ठरत असून, पर्यायाने हे काम करणारे कर्मचारीही अतिरिक्त ठरत आहेत. एआयमुळे काही कर्मचाऱ्यांचे काम एकटा कर्मचारीही आता करू शकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कंपन्यांकडून मनुष्यबळ कपातीचा पर्याय अवलंबला जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची एकही कंपनी याला सध्या अपवाद दिसत नाही.

sanjay.jadhav@expressindia.com