Pune Wipro Company Forced Conversion Investigation: पुण्यातील विप्रो कंपनी धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची तसेच छळ झाल्याची तक्रार एका माजी महिला कर्मचाऱ्याने केली आहे. नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुण्यातूनही अशीच घटना समोर आली आहे. विप्रो कंपनीतील माजी महिला कर्मचाऱ्याने तिच्या माजी पर्यवेक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. महिला पर्यवेक्षकाने धर्मांतर करण्यासाठी छळ केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. २०१९ ते २०२५ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. जबरदस्ती धर्मांतरासाठी सातत्याने छळ होत असल्याने नोकरीही सोडली असा दावा महिलेने केला.

या प्रकरणी महिलेने पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच राज्य मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागितली आहे. कंपनीतील ज्या पर्यवेक्षक महिलेने धर्मांतरासाठी छळ केला, ती बंगळुरूतून काम करते. तिच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली. महिलेने आरोप केल्यानंतर विप्रो कंपनीने एक निवेदन जारी करून भूमिका मांडली. पुणे पोलीस व तपास यंत्रणांना सहकार्य केले जात असून आवश्यक ती कागदपत्रे व माहिती दिली असल्याचे विप्रो कंपनीकडून सांगण्यात आले. हे प्रकरण नेमके काय आहे? जाणून घेऊयात.

तक्रारीत महिलेने कोणते आरोप केले?

महिलेने दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनुसार, हा प्रकार पुण्यातील हिंजेवाडी येथील विप्रो कंपनीत घडला. काही वरिष्ठ व्यवस्थापक व टीम लिडर्सने धर्मावरून तसेच धार्मिक ओळखीवरून सातत्याने लक्ष्य केल्याचे महिलेने सांगितले. कंपनीत काम करत असताना सातत्याने मानसिक दबाव टाकण्यात आला. इस्लाम स्वीकारण्यास तसेच त्याचे पालन करण्यास जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वातावरण अत्यंत दूषित झाले होते, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

धर्मांतर करण्यासाठी नकार दिल्यानंतर छळ अधिकच वाढला. तसेच नोकरी जाण्याची धमकी देण्यात आली. कंपनीतील कामगिरी (परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन) कमी नोंदवली जाईल, अशीही धमकी देण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. एकदा तिच्या मॅनेजरने कामगिरी ढासळल्याने नोकरी जाण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवली. त्यामुळे मानसिक तणाव आल्याने व कामाच्या ठिकाणी सतत छळ झाल्याने नोकरी सोडली, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या अंतर्गत तक्रार प्रणालीकडे (‘इंटर्नल ग्रीव्हान्स सिस्टीम’) तक्रार करण्यात आली होती. परंतु, कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कायदेशीर मार्ग निवडला, असे विप्रो कंपनीतील माजी महिला कर्मचाऱ्याने सांगितले.

पोलीस तपास कोणत्या दिशेने सुरू?

या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून तपास सुरू करण्यात आल्याचे पुणे पोलिसांतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “विप्रो कंपनीतील एका महिला प्रकल्प व्यवस्थापकाने (प्रोजेक्ट मॅनेजर) तिच्या महिला सहकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. आरोपी महिला ही इन्शुरन्स ऑपरेशन्सशी संबंधित आहे. तिने तक्रारदार महिलेबाबत काही आक्षेपार्ह टीपण्णी केल्याचा आरोप आहे”, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यांनी एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेला सांगितले.

आरोपी महिला ही बंगळुरूत राहते. तसेच ती बंगळुरूतूनच इन्शुरन्स ऑपरेशन्सशी संबंधित काम करते. तिचे नाव तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीने महिलेच्या तक्रारीवर काय प्रतिसाद दिला, अंतर्गत पातळीवर हे प्रकरण कसे हाताळले जात आहे, याचाही पोलीस तपास करणार आहेत.

“सहकाऱ्याने राजीनामा देण्यास सांगितल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तिने आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ज्या महिला सहकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली, ती बंगळुरूत राहते व तिथूनच काम करते. या तक्रारीनंतर कंपनीने अंतर्गत पातळीवर काही कारवाई केली आहे का? याचाही आम्ही तपास करणार आहोत”, असे पोलीस अधिकारी पांढरे म्हणाले.

तक्रारदार महिलेने केलेल्या प्रत्येक आरोपाची तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीत खरोखर गैरप्रकार झाला आहे का, तसेच घटनाक्रम जाणून घेण्यासाठी कंपनीचे अंतर्गत रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. ३ जून रोजी विप्रोतील माजी महिला कर्मचाऱ्याने हिंदू जनजागृती समिती या संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली होती. विप्रोत काम करत असताना २०१९ ते २०२५ दरम्यान धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती तसेच छळ करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.

विप्रो कंपनीने काय म्हटले?

तपास यंत्रणांना या प्रकरणी पूर्णपणे सहकार्य केले जात असल्याचे विप्रो कंपनीकडून सांगण्यात आले. “या प्रकरणी आम्ही तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत आहोत. पुणे पोलिसांना सर्व महत्त्वाची कागदपत्रे व माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असल्याने अधिक तपशिल देता येत नाही. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सन्मानपूर्वक कामाचे ठिकाण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कर्मचाऱ्यांचा आदर, सुरक्षा आणि समावेशकता आमच्यासाठी महत्वाची आहे. छळ व भेदभावाबाबत कंपनी अजिबात सहनशिलता दाखवणार नाही.” असे विप्रोकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी धर्मावरून होणारा भेदभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी कंपनीत असाच प्रकार समोर आला होता. त्यानंतर राज्यात ते प्रकरण गाजले. अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. आता हे प्रकरण कोणते वळण घेते, ते पाहणे महत्वाचे ठरेल.