Punjab Drug Crisis History : पंजाबच्या आगामी निवडणुकांमध्ये ड्रग्जचा प्रश्न सर्वांत मोठा कळीचा मुद्दा ठरताना दिसतोय. गेल्या अनेक वर्षांत या संकटाला आळा घालण्यासाठी राज्याने अनेक मार्ग चोखाळले, पण पदरात फारसं यश पडलं नाही. पंजाब नेमका या टोकाच्या वळणावर कसा येऊन ठेपला?
पंजाबमधल्या ड्रग्जच्या समस्येवरून पुन्हा एकदा असंतोषाचा भडका उडाला आहे. ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या एका तरुणाचा मृतदेह पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतला. त्या व्यक्तीचे कुटुंबीय या मृतदेहासह आंदोलन करण्याच्या तयारीत होते, ज्यामुळे आता सरकारवर मोठा दबाव आला आहे.
औषध विक्रेत्यावर ड्रग्ज विकल्याचा आरोप केल्याने ज्याची हत्या झाली, त्या परविंदर सिंह झोटा या सामाजिक कार्यकर्त्याचे कुटुंबीय मानसा इथं आधीपासूनच आंदोलन करत आहेत. ३५ वर्षीय दलजित सिंहचा मृतदेह त्याच आंदोलनाच्या ठिकाणी नेला जात होता.
पंजाब गेल्या दीड दशकाहून अधिक काळ या ड्रग्जच्या समस्येशी दोन हात करतोय; मात्र या विळख्यातून राज्याची सुटका होण्याची चिन्हं दिसत नाहीत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या २०२४ सालच्या अहवालानुसार, ड्रग्जच्या तस्करीच्या ६,०६० गुन्ह्यांसह पंजाब देशात अव्वल स्थानी आहे. याशिवाय, ओव्हरडोजमुळे राज्यात १०६ मृत्यूंची नोंद झाली असून, तमिळनाडूपाठोपाठ सर्वाधिक मृत्यू पंजाबमध्येच झाले आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता चांगलाच तापवला जातोय. सत्ताधारी ‘आप’ सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने या प्रश्नाला आपल्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरवलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे पंजाब प्रभारी सचिन पायलट आणि अकाली दलाच्या नेत्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं; मात्र झोटा यांच्या हत्येनंतर ‘आप’च्या एकाही बड्या नेत्याला मानसा गावात पाय ठेवण्याची हिंमत झालेली नाही.
पंजाब नेमकं या वळणावर कसं पोहोचलं? या ड्रग्जच्या समस्येच्या मुळाशी काय आहे आणि ही समस्या अजूनही का भेडसावतेय, याचा हा आढावा.
स्वातंत्र्यपूर्व काळातला पंजाब आणि ड्रग्ज
स्वातंत्र्यपूर्व पंजाबमध्ये अफू आणि भुक्कीचा वापर सर्रास व्हायचा आणि त्याला सामाजिक मान्यताही होती. ‘डायनॅमिक्स ऑफ ड्रग अब्यूज अँड ॲडिक्शन इन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक प्रा. रणजीत सिंह घुमन यांच्या मते, त्या काळात पंजाबी लोक अफूचं सेवन अगदी अल्प प्रमाणात आणि बहुधा वैद्यांच्या सल्ल्याने औषध म्हणून करत असत. ‘रॉयल कमिशन ऑन ओपियम’ने १८९४ मध्ये नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, भारतात सर्वसामान्यांकडून होणारं अफूचं सेवन अत्यंत नगण्य होतं. उत्तर भारतातल्या काही विशिष्ट घटकांमध्ये शतकानुशतकं याचं सेवन केलं जात होतं.
घुमन सांगतात की, घरगुती पद्धतीने तयार केलेली गावठी दारू ही दीर्घकाळापासून पंजाबमधली सर्वाधिक पसंतीची आणि समाजमान्य अशी नशा होती. स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये अफूवर बंदी घातली गेली, तरी त्याचा वापर सुरूच राहिला. शेजारच्या राजस्थानमध्ये अफूचे कायदेशीर ठेके असल्याने लोक सीमा ओलांडून तिथून अफू आणायचे. १९७९ च्या ‘पॅटर्न्स अँड प्रेव्हलेन्स ऑफ ओपियम यूज इन रूरल पंजाब (इंडिया)’ या अभ्यासात असं आढळलं होतं की, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असताना आणि शेजारील राज्यांमधून छुप्या मार्गाने आणावं लागत असतानाही, पंजाबच्या ग्रामीण भागात अफूचा वापर मोठ्या प्रमाणावर टिकून होता.
भौगोलिक रचनेमुळे वाढलेला धोका
पाकिस्तानला लागून असलेली पंजाबची ५५३ किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा तस्करीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या डोंगराळ भागांनी मिळून तयार झालेला ‘गोल्डन क्रेसेंट’ हा हेरॉईन तयार करणाऱ्या जगातल्या तीन प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. उरलेली दोन केंद्रं म्हणजे म्यानमार, थायलंड व लाओसचा ‘गोल्डन ट्रँगल’ आणि दक्षिण अमेरिका.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, पंजाबमधल्या फुटीरतावादी दहशतवादाची लाट ओसरल्यानंतर या सीमावर्ती राज्याला कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानने इथं ड्रग्जचा मारा करायला सुरुवात केली. त्या अधिकाऱ्याने याला ‘नार्को-दहशतवाद’ असं नाव दिलं.
स्थानिक भाषेत ‘चित्ता’ म्हणून ओळखलं जाणारं हेरॉईन पुरेशी सुरक्षा नसलेल्या सीमाभागातून चोरट्या मार्गाने आणलं जातं; तर औषध, संशोधन आणि निर्यातीसाठी कायदेशीर शेतीची परवानगी असलेल्या राजस्थान व मध्य प्रदेशातून अफू आणि भुक्की येते. चरस व हशीश हिमाचल प्रदेशातून येते. याशिवाय उच्च दर्जाचं हेरॉईन दिल्लीवरून गुजरात, राजस्थानचे गंगानगर आणि हनुमानगड जिल्हे किंवा जम्मू-काश्मीरमधल्या जम्मू आणि कथुआमार्गे पंजाबमध्ये पोहोचवले जात असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.
औषधांच्या नशेकडे वळलेला मोर्चा
केंद्र आणि राज्य सरकारने सीमेवर कडक पहारा बसवल्यानंतर, नशेसाठी औषधी गोळ्यांचा गैरवापर झपाट्याने होऊ लागला. २०२१ मध्ये केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचं अधिकारक्षेत्र सीमेपासून १५ किमीवरून थेट ५० किमीपर्यंत वाढवलं. २०२४ मध्ये देशभरात जप्त करण्यात आलेल्या एकूण ५.१३ कोटी औषधी गोळ्यांपैकी तब्बल २.९४ कोटी गोळ्या एकट्या पंजाबात जप्त करण्यात आल्या. २०२२ मध्ये पंजाब पोलिसांनी दाखल केलेल्या एकूण एनडीपीएस गुन्ह्यांपैकी सुमारे २५ टक्के गुन्हे याच औषधी गोळ्यांशी संबंधित होते. यांपैकी जवळपास ८० टक्के औषधं हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधल्या उत्पादन केंद्रांमधून पंजाबमध्ये घुसवली जातात.
सध्या पेटलेला नवा वादही अशाच औषधांशी जोडलेला आहे. एका दुकानदाराकडून व्यसनी लोकांना प्रतिबंधित औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या झोटा यांच्यावर १३ ऑक्टोबर रोजी त्या दुकानदाराने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
ड्रोन्सच्या माध्यमातून वाढलेला धोका
गेल्या काही वर्षांत सीमेपलीकडून ड्रोनच्या साहाय्याने होणारी तस्करी प्रचंड वाढली आहे; आता तर हे ड्रोन दिवसाढवळ्याही खाली उतरताना दिसतात. बहुतांश ड्रोन हे चीनमध्ये तयार झालेले छोटे ‘क्वाडॉप्टर्स’ असून त्यांच्याद्वारे हेरॉईन आणि शस्त्रं टाकली जातात. बीएसएफच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये ड्रोन पाडण्याच्या केवळ ३ घटना नोंदल्या गेल्या होत्या, तर २०२५ मध्ये हा आकडा २०० च्या वर गेला आहे.
अमृतसर-तरण तारण-फिरोजपूर-गुरुदासपूर हा पट्टा या तस्करीचा मुख्य केंद्रबिंदू ठरतोय. बीएसएफने यासाठी स्वतंत्र अँटी-ड्रोन गुप्तचर शाखा स्थापन केली आहे आणि पंजाब पोलिसांनी ड्रोनविरोधी बंदुकाही खरेदी केल्या आहेत; तरीही तस्कर पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून आपलं काम साधताना दिसतात.
पैशांच्या मोहाने वाढतोय धंदा
इतकी कडक कारवाई होऊनही हा धंदा फोफावण्यामागचं मुख्य कारण म्हणजे यात मिळणारा अफाट नफा. एक ग्रॅम ‘चित्ता’ बाजारात १,००० ते ५,००० रुपयांना विकला जातो, तर फक्त एकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवणाऱ्या व्यक्तीला अर्थात ड्रग म्यूलला एका फेरीत लाखभर रुपये मिळतात. तरुणांच्या वाढत्या अपेक्षांपुढे पुरेशा रोजगाराच्या संधी नसलेल्या या राज्यात हा पैशांचा मोह अधिकच घातक ठरतो.
‘इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेशन’चे (आयडीसी) डॉ. प्रमोद कुमार सांगतात, महिनाभर राबूनही हातावर केवळ काही हजार रुपये टेकवले जात असताना, हा धोका पत्करणं तरुणांना सोपं वाटतं. शिवाय बदलत्या सामाजिक मूल्यांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, कारण कोणत्याही गैरमार्गाने पैसा कमावण्याला आता प्रतिष्ठा मिळू लागली आहे.
याशिवाय तस्कर, पोलिस कर्मचारी आणि राजकीय नेते यांच्यातलं कथित साटंलोटं या व्यापाराला खतपाणी घालत राहतं. २०१३ मध्ये पंजाब पोलिसांचे डीएसपी जगदीश सिंह भोला यांना कोट्यवधींच्या ड्रग रॅकेटमध्ये बेड्या ठोकल्या गेल्या, तेव्हा हे भयानक वास्तव जगासमोर आलं होतं. त्यांना २०१९ मध्ये दोषी ठरवण्यात आले असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.
तस्करीसाठी महिलांचा वापर
मार्च २०२३ मध्ये पंजाब विधानसभेत मांडलेल्या आकडेवारीनुसार, २०१५ च्या तुलनेत २०२२ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत महिलांच्या अटकेचं प्रमाण तब्बल ८५ टक्क्यांनी वाढलं आहे. तज्ज्ञांच्या मते, यात हळूहळू संपूर्ण कुटुंबंच ओढली जातात; म्हणूनच आई-मुलगा किंवा पती-पत्नी अशा जोड्यांवर एकत्र गुन्हे दाखल होण्याची उदाहरणं वाढली आहेत. महिलांची झडती सहजासहजी घेतली जात नसल्याने आणि त्या बसने सुरक्षितपणे माल पोहोचवू शकत असल्याने तस्कर त्यांचा वापर करतात. याशिवाय अनेक व्यसनी महिला स्वतःच्या व्यसनांचा खर्च भागवण्यासाठी पुढे जाऊन तस्करी करू लागतात.
‘आप’ सरकारची ड्रग्जविरुद्धची लढाई
अकाली दल आणि भाजपाच्या सरकारने २०१४ मध्ये ‘ड्रग्जविरुद्ध युद्ध’ पुकारल्यापासून राज्याने कारवाई, व्यसनमुक्ती आणि प्रतिबंध (ईडीपी) हे त्रिसूत्री धोरण राबवलं होतं. ‘आप’चं सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांनी, म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये एका बैठकीत भरपूर विचारमंथन झाल्यानंतर पोलिसांनी आपलं धोरण बदलल्याचं पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं होतं. ते पुढे म्हणाले, “एकीकडे मोठ्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन मालाचा पुरवठा तोडायचा आणि दुसरीकडे लोकांना नशेपासून लांब ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवायची, असा निर्णय आम्ही घेतला होता.”
या प्रयत्नांना अपेक्षित यश न मिळाल्याने ‘आप’ सरकारने मार्च २०२५ मध्ये ‘युध नशेयां विरुध’ ही मोहीम सुरू केली. यात तस्करांची आर्थिक नाकेबंदी करणं आणि काळ्या पैशातून उभारलेली त्यांची घरं पाडणं यांसारखी पावलं उचलली गेली. या वर्षी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी दीड लाखांहून अधिक ‘पिंड दे पहरेदार’ अर्थात गावातल्या स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. असं असलं तरी ड्रग्ज अजूनही सहजगत्या उपलब्ध होत आहेत.
यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने शस्त्र परवाने देतेवेळी अर्जदारांची आणि नव्या सरकारी नोकरभरतीवेळी उमेदवारांची ‘डोप टेस्ट’ सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. प्रमोद कुमार यांच्यासारखे अभ्यासक मात्र सरकारच्या ‘ईडीपी’ धोरणातल्या त्रुटींकडे बोट दाखवतात. कुमार यांच्या मते, दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी व्यसनाला प्रतिबंध घालणं आणि पुनर्वसन करणं या बाबींना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.
