Chandigarh Capital Dispute: आज १ नोव्हेंबर. भारताच्या आधुनिक नकाशावर, एकाच सांस्कृतिक मुळाशी जोडलेल्या दोन स्वतंत्र राज्यांची नवी प्रशासकीय वाटचाल याच दिवशी सुरू झाली. बरोबर ६० वर्षांपूर्वी १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब आणि हरियाणा ही दोन नवी राज्यं अस्तित्वात आली. आज या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस; पण या एकाच दिवशी जन्मलेल्या दोन भावांसारख्या राज्यांच्या वाटणीत एक असा तिढा निर्माण झाला, ज्याचं उत्तर भारताच्या संघराज्य रचनेला अजूनही पूर्णपणे शोधता आलेलं नाही. तो तिढा म्हणजे – चंदिगड.

एकाच शहरात दोन मुख्यमंत्री बसतात, दोन राज्यपाल राहतात, दोन विधानसद्ध चालतात आणि शहरावर नियंत्रण मात्र केंद्र सरकारचं! एकाच शहराच्या नशिबी अशी दोन राज्यांची सामायिक राजधानी तयार होण्याचं कारण काय? ही केवळ नकाशावर लाल शाईने आखलेल्या सीमारेषांची कथा नसून; ती फाळणीच्या जखमा, भाषिक अस्मिता आणि राजकीय सत्तासंघर्षाची एक गुंतागुंतीची कहाणी आहे.

फाळणीची जखम आणि नेहरूंचे स्वप्न

हा संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला थेट १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात जावं लागेल. ‘रॅडक्लिफ’च्या रेषेने पंजाबचे दोन तुकडे केले. लाहोर – जे अखंड पंजाबचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय जीव होता, जे पाकिस्तानला मिळालं. भारताच्या हद्दीत उरलेल्या उत्तर पंजाबकडे स्वतःची कोणतीही राजधानी उरली नाही. शिमला हे तात्पुरतं प्रशासकीय केंद्र बनलं खरं; पण हिमालयाच्या कडेकपारीत बसून विस्तीर्ण मैदानी पंजाबचा कारभार सांभाळणं प्रशासकीयदृष्ट्या अशक्य होतं.

त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक धाडसी निर्णय घेतला. जुन्या जखमांवर रडत बसण्यापेक्षा नव्या आधुनिक भारताचं भविष्य दाखवणारं एक नवीन शहर शून्यातून उभं करायचं. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी चंडी मातेच्या मंदिराच्या परिसरात एका नव्या शहराची पायाभरणी झाली – ‘चंदिगड’. स्विस-फ्रेंच वास्तुविशारद ली कॉर्बुझिए (Le Corbusier) यांनी हे शहर अशा रीतीने ‘डिझाईन’ केलं की, ते एखाद्या सजीव मानवी शरीरासारखं भासावं. कॉर्बुझिए यांच्या सेक्टर मॉडेलवर आधारित या शहरानं पाहता पाहता जगाचं लक्ष वेधून घेतलं. फाळणीत सर्वस्व गमावून आलेल्या विस्थापित पंजाबी कुटुंबांना या शहरानं आसरा दिला. चंदिगड हे पंजाबच्या पुनरुत्थानाचं आणि आधुनिक भारताचं प्रतीक बनलं.

भाषेची वानवा आणि शाह आयोगाची कात्री

पण, हे शांततामय चित्र फार काळ टिकलं नाही. १९५० च्या दशकात संपूर्ण देशात भाषावार प्रांतरचनेचे वारे वाहत होते. दक्षिणेत आणि पश्चिमेत भाषेच्या आधारावर राज्यं तयार झाली; पण पंजाबमध्ये हा पेच अधिक जटिल होता. मास्टर तारा सिंग आणि संत फतेह सिंग यांच्या नेतृत्वाखालील अकाली दलानं ‘पंजाबी सुभा’ म्हणजेच पंजाबी भाषिकबहुल राज्याची मागणी तीव्र केली. दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडील हिंदी भाषिक पट्ट्यातून (हरियाणवी परिसर) वेगळ्या हरियाणा राज्याची मागणी जोर धरू लागली.

केंद्रातील इंदिरा गांधी यांच्या सरकारनं अखेर या मागणीपुढे मान झुकवली आणि २३ एप्रिल १९६६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. सी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली ‘पंजाब सीमा आयोग’ (Shah Commission) स्थापन करण्यात आला. या आयोगाची जबाबदारी होती की, पंजाबी आणि हिंदी भाषिक खेड्यांची वर्गवारी करून सीमारेषा निश्चित करणं.

आयोगानं हजारो कागदपत्रं आणि १९६१ च्या जनगणनेची आकडेवारी तपासली. खरा संघर्ष सुरू झाला तो चंदिगडवर. पंजाबचा दावा होता की, चंदिगड हे त्यांच्यासाठी वसलेलं शहर आहे, त्याच्या बांधकामासाठी पंजाबी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि ते पंजाबच्याच परिसराचा भाग आहे. तर हरियाणाचा युक्तिवाद असा होता की, चंदिगडच्या लगतचा मोठा पट्टा हिंदी बोलणाऱ्यांचा आहे.

शाह आयोगानं जेव्हा आपला अहवाल दिला, तेव्हा एका ऐतिहासिक पेचाची ठिणगी पडली. तीन सदस्यीय आयोगातील न्यायमूर्ती जे. सी. शाह व एम. एम. फिलीप यांनी चंदिगड हरियाणाला देण्याची शिफारस केली; मात्र, तिसरे सदस्य एस. दत्त यांनी त्याला तीव्र विरोध करीत चंदिगड पंजाबलाच मिळावं, असा स्पष्ट अल्पमत अहवाल (Dissent Note) नोंदवला.

एका रात्रीतला तो तडजोडीचा निर्णय

आयोगाच्या दुभंगलेल्या निकालामुळे दिल्लीतील सरकार प्रचंड तणावात आलं. चंदिगड हरियाणाला दिलं, तर पंजाब पेटून उठणार होता आणि पंजाबला दिलं, तर हरियाणामध्ये असंतोष उफाळणार होता. अखेर केंद्र सरकारनं एक तात्पुरती मलमपट्टी केली. पंजाब पुनर्रचना कायदा, १९६६ (Punjab Reorganisation Act, 1966) संसदेत मंजूर झाला. १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब आणि हरियाणा ही दोन स्वतंत्र राज्यं अस्तित्वात आली; पण चंदिगडला कोणत्याही एका राज्याच्या हवाली न करता, थेट केंद्रशासित प्रदेश (Union Territory) घोषित करण्यात आलं. एकाच शहराला दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी बनवण्यात आलं. सचिवालयाच्या इमारतीत एकाच मजल्यावर दोन राज्यांचे अधिकारी शेजारी शेजारी बसू लागले.
कायद्याच्या दृष्टीनं ही तात्पुरती व्यवस्था होती; प्रत्यक्षात ती दशकांसाठी कायमस्वरूपी कोडं बनून राहिली.

उपोषणं, आश्वासनं आणि अपुरे करार

हा प्रश्न इथेच मिटला नाही. फाळणीनंतर चंदिगड पूर्णपणे पंजाबला मिळावं म्हणून आंदोलनं सुरूच राहिली. १९६९-७० मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी नेते दर्शन सिंग फेरुमान यांनी चंदिगड पंजाबला मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण केलं आणि ७४ व्या दिवशी त्यांनी आपला जीव सोडला. त्यामुळे पंजाबमधील वातावरण तापलं.

Indian Express

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २९ जानेवारी १९७० रोजी एक मोठा निर्णय जाहीर केला. या घोषणेनुसार, संपूर्ण चंदिगड शहर पंजाबला दिलं जाईल आणि त्या बदल्यात हरियाणानं स्वतःची नवी स्वतंत्र राजधानी उभी करावी; तोपर्यंत हरियाणाला मदत म्हणून केंद्राकडून २० कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाईल. त्याशिवाय फाजिल्का आणि अबोहर या पंजाबमधील हिंदी भाषिक भागातील काही गावं हरियाणाला हस्तांतरित करण्याचं ठरलं. त्यासाठी पाच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, जमिनींची अदलाबदल आणि पाणीवाटपाच्या गुंतागुंतीमुळे ही मुदत संपली तरी निर्णय कागदावरच राहिला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अकाली दलाचे अध्यक्ष संत हरचंद सिंग लोंगोवाल

पुढे १९८० च्या दशकात पंजाबमधील असंतोष शिगेला पोहोचला. तो शांत करण्यासाठी २४ जुलै १९८५ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अकाली दलाचे अध्यक्ष संत हरचंद सिंग लोंगोवाल यांच्यात ऐतिहासिक ‘पंजाब करार’ (Rajiv-Longowal Accord) झाला. या करारातील पहिल्याच कलमात स्पष्ट नमूद होतं: २६ जानेवारी १९८६ रोजी चंदिगड अधिकृतपणे पंजाबच्या स्वाधीन केलं जाईल.

मात्र, इतिहास पुन्हा थबकला. २६ जानेवारी १९८६ उजाडली; पण हरियाणामध्ये कोणत्या गावांची भरपाई करायची यावर नेमलेल्या मॅथ्यू आयोगाला एकमत करता आलं नाही. तो दिवस उलटून गेला आणि हस्तांतर पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी रखडलं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच संत लोंगोवाल यांची हत्या झाली आणि करार धूळखात पडला.

न संपलेला सत्तासंघर्ष

आज १ नोव्हेंबर रोजी पंजाब आणि हरियाणा आपल्या स्थापनेचा हीरक महोत्सव किंवा वर्धापनदिन साजरा करत असताना, चंदिगड आजही त्याच सामायिक प्रशासनाच्या कात्रीत उभं आहे. गेल्या काही वर्षांत हा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारनं चंदिगडमधील कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय सेवा नियम (Central Service Rules) लागू केले, तेव्हा पंजाब विधानसभेनं एकमतानं ठराव मंजूर करून चंदिगडवर आपला संपूर्ण हक्क सांगितला. लगेचच दुसऱ्या दिवशी हरियाणा विधानसभेनंही विशेष अधिवेशन बोलावून पलटवार केला आणि जोपर्यंत एसवायएल (SYL – सतलज-यमुना लिंक) कालव्याचं पाणी आणि हिंदी भाषिक भाग मिळत नाहीत, तोपर्यंत चंदिगडवरील दावा सोडणार नाही, असा ठराव केला. एवढंच नाही, तर हरियाणानं शहरात स्वतःच्या स्वतंत्र विधानसभा इमारतीसाठी जमिनीची मागणी लावून धरली आहे.

‘द सिटी ब्युटीफुल’ म्हणून ओळखलं जाणारं चंदिगड आज शांत, देखणं आणि हिरवंगार दिसतं खरं; पण त्याच्या सुंदर रुंद रस्त्यांवर आणि भव्य इमारतींच्या सावलीत भारताच्या संघराज्याचा सर्वांत प्रदीर्घ राजकीय पेच आजही जिवंत आहे. एका शहरावर दोन राज्यांचं प्रेम असावं ही अभिमानाची गोष्ट ठरू शकली असती; पण जोपर्यंत अविश्वासाचं आणि अस्मितेचं राजकाण संपत नाही, तोपर्यंत ‘चंदिगड कोणाचं’ या प्रश्नाचं उत्तर भारताच्या इतिहासातील एका न सुटलेल्या कोड्यासारखंच अनुत्तरित राहील.