पंजाब मेल (१२१३७/१२१३८) ही १९१२ पासून धावत असलेली सर्वात जुनी सुपरफास्ट रेल्वे गाडी आहे. मध्य रेल्वेद्वारे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते फिरोजपूर (पंजाब) दरम्यान चालवण्यात येणाऱ्या या गाडीचा इतिहास तितकाच रंजक आहे. नुकताच या गाडीचा वर्धापनदिन साजरा झाला. पंजाब मेल भारतीय रेल्वेच्या वाटचालीत केवळ एक रेल्वे गाडी नव्हे तर इतिहास, वारसा आणि असंख्य कथांनी विणलेला हा एक समृद्ध प्रवास आहे. त्याचा हा आढावा. 

पंजाब मेलचा इतिहास कसा?

पंजाब मेल सध्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पंजाबमधील फिरोजपूर स्थानकांदरम्यान धावते. पण ती पहिल्यांदा एक जून १९१२ रोजी मुंबईतील बॅलार्ड पिअर ते पेशावर अशी धावली. ही गाडी विशेषतः ब्रिटिश अधिकारी, नागरी सेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईहून दिल्ली आणि नंतर ब्रिटिश भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात नेण्यासाठी खास तयार करण्यात आली होती. संबंधित विमानातून उतरताच पंजाब मेलमध्ये चढत असत. पुढील दोन वर्षातच म्हणजे १९१४ मध्ये पंजाब मेलचे सुरुवातीचे स्थानक तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस येथे बदलण्यात आले. देशाची फाळणी झाली नव्हती तोपर्यंत पंजाब मेल निरंतर मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनसहून सुटून पेशावरपर्यंत धावली. परंतु, फाळणीनंतर पंजाब मेलचे अंतिम स्थानक भारत-पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर स्थानकावर हलवण्यात आले.  

१९३० पासून भारतीयांसाठी

जुनी पंजाब मेल कोळशावर चालणारे इंजिन आणि लाकडी डब्यांसह धावत असे आणि पूर्वी पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. फाळणीच्या आधी ती इटारसी, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली, अमृतसर, लाहोर आणि पेशावर दरम्यान २,४९६ किलोमीटरचा प्रवास करत असे. सुरुवातीला ही गाडी फक्त गोऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी चालवली जात होती. मात्र, १९३० पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी पंजाब मेलला तृतीय श्रेणीचे डबेही जोडण्यात आले. स्वातंत्र्याच्या दोन वर्षे आधी १९४५ मध्ये पंजाब मेल पहिल्यांदा वातानुकूलित करण्यात आली. कधीकाळी पंजाब मेलला एकूण सहा डबे होते. त्यापैकी तीन डबे प्रवाशांसाठी आणि तीन डबे पोस्टल सामान आणि इतर वापरासाठी होते. तीन प्रवासी डब्यांमधून सुमारे २८८ प्रवासी प्रवास करत होते. आता या मेलला एक वातानुकूलित प्रथम श्रेणीसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक ‘एसएलआर’ (सेकंड लगेज आणि गार्ड व्हॅन), असे एकूण २४ डबे आहेत. या गाडीचा एकेरी प्रवास आता १,९३२ किलोमीटरचा आहे.

पंजाब मेल आता नव्या रूपात?

११४ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली १२१३७/३८ पंजाब मेल या रेल्वे गाडीने आता कात टाकली असून, ती नव्या आकर्षक आणि आधुनिक स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. नव्या रूपामुळे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. गाडीच्या नूतनीकरणामध्ये वारसा जपत प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रथम वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित आणि पॅन्ट्री कारमध्ये वारसा संकल्पनेवर आधारित आकर्षक विनाइल रॅपिंग करण्यात आले आहे. रॅपिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), गेटवे ऑफ इंडिया तसेच अमृतसर येथील सुवर्ण मंदिर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. ज्या माध्यमातून महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, १९१२ पासून सुरू असलेल्या पंजाब मेलच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावादेखील डब्यांमधील चित्रांद्वारे सादर करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करतानाच इतिहासाचीही ओळख होणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सर्व वातानुकूलित डब्यांमध्ये नवीन पडदे बसविण्यात आले आहेत. तसेच ऑटो एअर फ्रेशनर्स, सोप डिस्पेंसर, सुधारित नळ व्यवस्था, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती, सीट कव्हर डिस्पेंसर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंजाब मेल महोत्सव उत्साहात

सुमारे ११४ वर्षांचा इतिहास लाभलेल्या देशातील एकमेव सर्वात जुन्या पंजाब मेलचा मध्य रेल्वेला नेहमीच अभिमान राहिला आहे. दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर पंजाब मेलचा वर्धापन दिनही महोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. यंदा देखील पंजाब मेल महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. त्यास प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंजाब मेलचा गौरव करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेष मीना, मुख्य यांत्रिक अभियंता सुबोध कुमार सागर तसेच विविध विभागांचे प्रमुख, मुख्यालय व मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंजाब मेल केवळ एक रेल्वे गाडी नव्हे, तर इतिहास, वारसा आणि असंख्य कथांनी विणलेला हा एक प्रवास आहे. हा असा एक वारसा आहे, जो लक्षावधी लोकांना अधिक सामर्थ्याने, अधिक वेगाने आणि काळाच्याही पुढे घेऊन जातो. १९१२ सालापासून पिढ्यानपिढ्यांना जोडणारा हा एक समृद्ध वारसा असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

patil.jitendra@expressindia.com