Indo-Pak and Punjabiyat: गुरुवार, १८ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज़ शरीफ़ यांनी गुरुद्वारा खतरपूर साहिब येथे तब्बल तीन हजार शीख यात्रेकरूंसमोर स्वतः ‘पंजाबी’ असल्याचा उल्लेख मुद्दामहून केला. तुम्ही सर्व पंजाबचे आहात, मी पाकिस्तानी असले तरीही, मी सुद्धा खरी पंजाबी आहे असे त्या म्हणाल्या. इतकेच नाही तर त्यांनी आपले वडील पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज़ शरीफ़ यांनी दिलेल्या “शेजाऱ्यांशी युद्ध करू नका, मैत्रीची दारे उघडा, तुमच्या हृदयाची दारे उघडा” या मित्रत्त्वाच्या सल्ल्याचाही उल्लेख केला. द्विपक्षीय संबंध घनिष्ठ करण्यासाठी सीमेच्या दोन्ही बाजूंच्या राजकारण्यांनी अनेक प्रसंगी सामायिक पंजाबी परिचयाचा आग्रह धरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘पंजाबियत’चा वापर द्विपक्षीय संबंध घनिष्ठ करण्यासाठी कसा केला जातोय, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

अधिक वाचा: पाकिस्तानला मिळाला धडा असं कोण म्हणालं? ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ काय आहे?

पंजाबी एकच ओळख

मरियम म्हणाल्या की, त्या पाकिस्तानी आहेत, परंतु त्याच वेळी त्या पक्क्या पंजाबीही आहेत. दोन्ही बाजूंच्या पंजाबींमध्ये नाते आहे आणि ‘पंजाब आमच्या हृदयात आहे’. १९४७ साली पंजाबचे विभाजन झाले, त्या गोष्टीला ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चार युद्धे झाली, तरीही अनेकांना एकमेकांविषयी अनुबंध जाणवतो. त्यांच्या संस्कृतीत ‘पंजाबियत’मुळे समानता जाणवते. ‘फाळणीच्या क्लेशदायक आठवणी असल्या तरी अनेकांना एकमेकांविषयी सहानुभूतीची भावना आहे. दोन्हीकडच्या अनेकांना असे वाटते आहे की, शोकांतिकेवर मात करून आता मिलापाची वेळ आली आहे’, असे सी राजा मोहन (परराष्ट्र धोरण आणि सामरिक व्यवहार तज्ज्ञ) सांगतात.

सांस्कृतिक बंध

फाळणीच्या वेळी विभक्त झालेल्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र येण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पंजाबी चित्रपट ‘आजा मेक्सिको चलिये’साठी (२०२२) भारतीय आणि पाकिस्तानी कलाकार एकत्र आले. हा चित्रपट पाश्चिमात्य देशामध्ये ‘डाँकी रूट’चा वापर करून स्थलांतर करणाऱ्या पंजाबींवर आधारित होता. २०१६ पासून पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर बंदी असताना भारतातील पंजाबी चित्रपट पाकिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘कॅरी ऑन जट्टा ३’ (२०२३) पाकिस्तानमध्ये खूप हिट ठरला होता. किंबहुना ‘मौजा ही मौजा’ (२०२३) हा चित्रपट भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये जास्त लोकप्रिय झाला होता. बुल्ले शाहच्या कवितांपासून ते भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लोकप्रिय असलेल्या सिद्धू मूसेवालाच्या पंजाबी रॅपपर्यंत संगीतातही खोल सांस्कृतिक बंध असल्याचे आढळते.

पॅराडिप्लोमसीसाठी जागा

भारत- पाक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये ‘पंजाबियत’चा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे, दोन्ही बाजूंच्या पंजाबी राजकारण्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी १९९९ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून पाकिस्तानला भेट दिली होती. व्यापार आणि पाकिस्तानमधील शीख मंदिरांच्या देखभालीवर चर्चा करण्यासाठी ही भेट होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री म्हणून (२००२-०७) त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २००४ मध्ये लाहोर येथे झालेल्या जागतिक पंजाबी परिषदेसाठी आणि २००६ मध्ये नानकाना साहिब- मन्नावाला दुहेरी कॅरेजवेच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानचे दोन दौरे केले होते.

अधिक वाचा: पाकिस्तानने चोरला भारताचा बासमती तांदूळ; परिस्थिती खरंच किती चिंताजनक?

२००४ मध्ये पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही ऑल पंजाब गेम्ससाठी पटियाला येथे आले होते. २०१२ मध्ये, पंजाबचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी आशिया कबड्डी चषकाच्या अंतिम फेरीसाठी लाहोरला भेट दिली आणि पाक पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री शेहबाज शरीफ यांनी पंजाब युवा महोत्सव आणि दिव्यांगांसाठी भारत-पाक दोस्ती चषकाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. त्याच वर्षी, अटारी- वाघा सीमेवर एकात्मिक चेक पोस्ट (ICP) च्या उद्घाटनासाठी शेहबाज शरीफ यांनी भारताला भेट दिली. शेहबाज शरीफ आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. २०१३ च्या डिसेंबर महिन्यात लुधियाना येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जागतिक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते प्रमुख पाहुणे म्हणून परत आले होते. त्यांनी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांची भेट घेतली होती. अशा प्रकारच्या संबंधांना पॅराडिप्लोमसी म्हणतात, असे सी राजा मोहन सांगतात.

व्यापार प्रमुख भूमिका बजावू शकतो

अटारी- वाघा मार्ग २००५ साली सुरु करण्यात आला, ट्रकची वाहतूक २००७ मध्ये सुरू झाली. अटारी येथील ICP ने भारत आणि पाकिस्तान दरम्यान जलद आणि किफायतशीर व्यापारासाठी सुविधा पुरवल्या. २०१४ मधील सरकारी गणनेनुसार, ICP ची व्यापार क्षमता १० अब्ज अमेरिकन डॉलर्सची होती. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने व्यापार स्थगित केला त्यामुळे हा मार्ग २०१९ मध्ये बंद करण्यात आला होता. परंतु अनेकांना दोन्ही पंजाबमधील व्यापार फायदेशीर ठरू शकतो याची खात्री आहे. तरनजीत सिंग संधू हे अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत होते. जे आता अमृतसर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘पुन्हा एकदा व्यापारासाठी हा मार्ग खुला करावा यासाठी निश्चितच प्रयत्न करणार’. मार्चमध्ये, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांनी लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तानी उद्योगपतींना भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू व्हावा अशी इच्छा आहे”, आणि नवीन सरकार “भारताशी व्यापाराच्या बाबींवर गांभीर्याने विचार करेल”. याच दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे मरियम शरीफ यांचे ‘पंजाबियत’बद्दलचे उद्गार जे दोन्ही देशांमधील दुवा सांधण्यावर भर देतात!