डॉ. प्राची मोघे
Pururava Urvashi Rigveda Samvad Sukta: भारतीय इतिहासात पुरुरवा आणि उर्वशी ही अत्यंत रोचक कथा आहे. हे संवादात्मक सूक्त (ऋग्वेद १०. ९५) वैदिक साहित्यातील जुन्या प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. परंतु ही केवळ प्रेमकथा नाही तर मानवी आणि दैवी संबंध यावरील कथा आहे. ऋग्वेदातील पुरुरवा -उर्वशी ही कथा आदिबंधात्मक, कठोर सत्य सांगणारी आहे. निसर्ग (अप्सरा) आणि मानव (राजा) यांचे मिलन क्षणभंगुर असते, तसेच दैवी आणि मानुषी प्रेम याची परिणीती चिरवियोगातच होते हे सांगते. ऋग्वेदातील ही कथा तत्त्वज्ञानावर आधारित आहे.
पुरुरवाने इंद्राला देव-दानव युद्धात मदत केलेली असते. इंद्र त्याला आपल्या दरबारात बोलावतो. तिथे अप्सरांचे नृत्य चालू असते. उर्वशी आणि पुरुरवा प्रथम दृष्टिक्षेपातच एकमेकांवर अनुरक्त होतात. उर्वशीचा पदन्यास चुकतो. इंद्राचा पुरुरवा मित्र असल्यामुळे उर्वशी त्याच्याबरोबर पृथ्वीतलावर जायला तयार होते पण एक अट असते. उर्वशीने पुरुरवाला कधीही नग्न पाहू नये ही ती अट.
अटीचा भंग
उर्वशी आणि पुरुरवा पृथ्वीवर सुखासमाधानाने नांदत होते. त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झाले. उर्वशी स्वर्गाला विसरली की काय अशी आशंका इंद्रादी देवांना येऊ लागली. मग गंधर्वांनी क्लृप्ति लढवली ज्यायोगे उर्वशीला पुरुरवाचे नग्न दर्शन झाले आणि तिला अटीनुसार मनुष्यदेहाचा त्याग करावा लागला. अटींचा भंग झाल्यामुळे ती त्याला सोडून निघून जाते. पुरूरवा तिला शोधत कुरुक्षेत्रातील एका सरोवरापाशी येतो, जिथे त्यांच्यात हा संवाद होतो.
- पुरुरवा तिला विनवितो : “हे निष्ठुर पत्नी, थांब! आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगूया. जर आपण आता बोललो नाही, तर भविष्यात आपल्याला सुख मिळणार नाही.”
- उर्वशी त्याला उत्तर देते: “हे पुरूरवा, या शब्दांचा आता काय उपयोग? मी वार्याप्रमाणे तुला सोडून गेले आहे, ज्याला पकडणे अशक्य आहे. तू आता आपल्या घरी परत जा. मी आता तुला प्राप्त होऊ शकत नाही.”
- पुरुरवा तिची आर्जवं करतो: “तुझ्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे. तुझा विरह सहन न झाल्यामुळे तुझा हा पती आता जमिनीवर पडेल, लांब कुठेतरी निघून जाईल किंवा हिंस्त्र पशूंचे भक्ष्य बनेल.”
- उर्वशी त्याला एक सत्य सांगते; “पुरूरवा, तू असा मरणाचा विचार करू नकोस. रडू नकोस. तू तुझ्या कर्तव्याचे पालन कर.” भावनांच्या भरात घेतलेले निर्णय किंवा कोणाला भावनिकरीत्या वेठीस धरून केलेले काम कधीही यशस्वी होत नाही. ती त्याला सांगते की, “रडून किंवा मरून काही साध्य होणार नाही.” संकटात स्थिर बुद्धी (Emotional Intelligence) राखणे महत्त्वाचे आहे.
- ती त्याला आश्वासन देते, “तू ज्या अटी पाळल्यास, त्यामुळे तुला स्वर्गात स्थान मिळेल. तू आता दु:ख सोडून दे आणि पृथ्वीवर राज्य कर.” उर्वशी त्याला त्याच्या राजा म्हणून असलेल्या कर्तव्याची आठवण करून देते. आयुष्यात एखादी वैयक्तिक मोठी हानी (Personal Loss) झाली तरी, आपले सामाजिक आणि व्यावसायिक कर्तव्य थांबता कामा नये. ती त्याला त्याच्या ‘स्वधर्माची’ आठवण करून देते.
- उर्वशी स्वतःबद्दल म्हणते की, “सालावृकाणां हृदयान्येता” (आमची हृदये लांडग्यांसारखी आहेत). लांडगा हा प्राणी पाळला जाऊ शकत नाही, तो स्वतंत्र असतो. तसेच दैवी प्रेरणा किंवा मोठी ध्येये ही माणसाच्या मोहात अडकून पडत नाहीत. ध्येय गाठताना कधीकधी माणसाला भावना बाजूला ठेवून कठोर व्हावे लागते.
वैयक्तिक इच्छा कर्तव्यापेक्षा मोठ्या होतात तेव्हा पतन निश्चित
त्याची तीव्र इच्छा त्याच्या प्रेमाच्या विनवणीत दिसून येते. तिच्याशिवाय त्याचे जीवन व्यर्थ आहे असे त्याला सारखे वाटत असते. तो तिची आर्जव करत रहातो पण ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम रहाते आणि ती पुनर्भेटीसाठी अनासक्त असते. पुरूरवा आणि उर्वशीची कथा प्रबोधन करणारी कथा आहे, राजा पुरूरवा हा अत्यंत पुण्यवान आणि धार्मिक राजा होता, ज्याचा देवांनाही हेवा वाटावा; परंतु अप्सरा उर्वशीच्या मोहात तो अपयशी ठरला. पुरूरवा सारखा महान राजा केवळ सौंदर्याच्या (Physical Beauty) मागे लागतो. त्याला त्याच्या राजधर्माचे विस्मरण होते. हे सूक्त सांगते की, वैयक्तिक इच्छा जेव्हा कर्तव्यापेक्षा मोठ्या होतात, तेव्हा पतन निश्चित असते.
‘दिव्य’ सुखाचा हव्यास म्हणजे विनाशाचे कारण
देवांनाही हेवा वाटावा (Envied even by the gods) हा उल्लेख महत्त्वाचा आहे. वैदिक आणि पौराणिक कथांमध्ये मानवी सामर्थ्य आणि दैवी सामर्थ्य यात जर मानुषी सामर्थ्य बळकट झाले तर दैवी शक्ती त्याला आडव्या येतात. इथे उर्वशी समोर येते. या संवादाचा शेवट हा पुरूरवाच्या शरणागतीने आणि वास्तवाच्या स्वीकाराने होतो. त्याला समजते की ‘मर्त्य’ मानवासाठी ‘दिव्य’ सुखाचा हव्यास हा विनाशाचे कारण ठरू शकतो.
भावना आणि अनासक्ती (Emotion vs. Detachment)
पुरूरवा: तो मानवी भावनेचे प्रतीक आहे. त्याच्या संवादात मोह, मानवी अगतिकता , आसक्ती आणि विरहाच्या वेदना आहेत. उर्वशी अत्यंत स्पष्टवक्ती आणि अनासक्त आहे. ती म्हणते, “न वै स्त्रैणानि सख्यानि सन्ति” (स्त्रियांची मैत्री कायमस्वरूपी नसते). येथे ‘स्त्री’ शब्दाचा अर्थ ‘चंचल निसर्गशक्ती’ किंवा ‘माया’ यांच्याशी जोडलेला आहे, जी कोणा एकाची होऊन राहत नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून किंवा परिस्थितीकडून ती कधीच बदलणार नाही अशी अपेक्षा करतो, तेव्हा दुःख निर्माण होते. उर्वशी पुरूरवाला वास्तवाचा स्वीकार करायला शिकवते.
‘पुरुष’ (Consciousness) आणि ‘प्रकृती’ (Nature) संबंध
हे सूक्त केवळ एका प्रियकर-प्रेयसीची कथा नाही, तर ते ‘पुरुष’ (Consciousness) आणि ‘प्रकृती’ (Nature) यांच्यातील संबंध दर्शवते. प्रकृती ही मोहक असते, ती पुरुषाला आनंद देते, पण ती कधीच एका जागी स्थिर राहत नाही. ती सतत बदलत असते (Dynamic), तर पुरुष तिच्या मागे धावत असतो.
चिरविरहाचा अभिशाप
ऋग्वेदातील हे संवाद सूक्त जरी पुरूरवा आणि उर्वशी यांची प्रेमकथा असली तरी तिचे अनेक पदर आहेत. या कथेचा पाया एका कठोर वास्तवावर आधारित आहे. तिला तत्त्वचिंतनाची डूब आहे. त्यात सौंदर्य, उत्कंठा आहेच पण एक चिरवियोगाची वेदना आहे. मर्त्य लोक आणि दैवी लोक यातील मधुर संबंध पण याला असलेला चिरविरहाचा अभिशाप हे या कथेचे खरे मर्म आहे.
अमर प्रेमाचे प्रतीक
ही कथा शतपथ ब्राह्मणात सकारात्मकता, आशेचा किरण घेऊन येते. महाभारत आणि पुराणातही तिचे सुखांत रूप मोहविते पण या कथेचा उत्कर्ष कालिदासाच्या विक्रमोर्वशीयम या नाटकात पाहायला मिळतो. पुरुरवा उर्वशी या कथेचा प्रवास शोकांताकडून सुखांताकडे होतो. या कथेत मानवी मूल्ये, भावना, शाश्वत जीवन मूल्ये अगदी ऋग्वेदापासून कालिदासपर्यंत अनुभवायास मिळतात आणि म्हणूनच हे युगल अमर प्रेमाचे प्रतीक ठरत.
