Russia’s New Defence Minister व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान ७ मे रोजी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्याच्या एका आठवड्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी देशाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांना पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी आंद्रेई बेलौसोव यांची नियुक्ती केली. २०१२ पासून रशियाचे संरक्षणमंत्री हे पद सांभाळणारे ६८ वर्षीय शोइगू यांना रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख करण्यात आले आहे. तर, माजी उपपंतप्रधान व पुतिन यांचे दीर्घकाळ आर्थिक सल्लागार राहिलेले आंद्रेई बेलौसोव शोइगू यांची जागा घेणार आहेत. आंद्रेई बेलौसोव कोण आहेत? लष्करी पार्श्वभूमी नसून त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी कशी सोपवण्यात आली? पूर्व संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी करण्याचे कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लष्कराचा अनुभव नसलेला संरक्षणमंत्री

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी रविवारी देशाचा वाढता लष्करी खर्च आणि नवीन पर्यायाची गरज असल्याचे सांगत, शोइगू यांच्या जागी आंद्रेई बेलौसोव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे बेलौसोव यांना लष्करी अनुभव नसताना किंवा राष्ट्रीय सुरक्षेत काम केलेले नसतानाही पुतिन यांनी हा निर्णय घेतला. बेलौसोव हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. २०२० मध्ये पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांना करोनाची लागण झाली होती तेव्हा तीन आठवड्यांसाठी त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. मिशुस्तिन यांची गेल्या शुक्रवारी देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.

पुतिन यांनी संरक्षणमंत्री पदावर आंद्रेई बेलौसोव यांची नियुक्ती केली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पुतिन यांना रशियाच्या पंतप्रधानपदी मिशुस्तिनच का हवेत; कोण आहेत मिखाईल मिशुस्तिन?

आंद्रेई बेलौसोव कोण आहेत?

बेलौसोव एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी १९८१ मध्ये मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विद्याशाखेतून विशेष पदवी प्राप्त केली. २००० मध्ये, बेलौसोव यांची पंतप्रधानांचे बिगर-कर्मचारी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २००६ मध्ये ते अर्थ मंत्रालयात उपमंत्री म्हणून रुजू झाले. २००८ ते २०१२ मध्ये पुतिन पंतप्रधान असताना त्यांनी अर्थशास्त्र व वित्त विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले. २०१२ मध्ये बेलौसोव यांची अर्थशास्त्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पुढील वर्षी त्यांना रशियन राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.

उल्लेखनीय बाब म्हणजे रशियन मीडिया आउटलेट ‘आरबीसी’नुसार, बेलौसोव यांनीच २०१७ मध्ये पुतिन यांना खात्री दिली की, डिजिटल अर्थव्यवस्था आणि ब्लॉकचेन देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ‘आरबीसी’ने नोंदवले आहे की, बेलौसोव यांनी सशस्त्र दलात काम केले नसले तरी ते पुतिन यांच्या नजीकचे मानले जातात.

बेलौसोव यांची नियुक्ती करण्याचे कारण

पुतिन यांनी संरक्षणविषयक बाबींची माहिती नसलेल्या नेत्याला हे पद का सोपवले, या प्रश्नावर पुतिन यांच्या सरकारमधील प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, आता नवीन पर्याय असावा म्हणून पुतिन यांनी हा निर्णय घेतला. “आज रणांगणावर विजेता तो आहे; जो नवीन गोष्टींचा अवलंब करतो.” असे सांगून ते पुढे म्हणाले, “ते केवळ एक सामान्य नागरिक नसून, ते एक असे गृहस्थ आहेत; ज्यांनी अत्यंत यशस्वीपणे रशियाच्या आर्थिक विकास मंत्रालयाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी आर्थिक मुद्द्यांवर राष्ट्राध्यक्षांना सल्ले दिले आहेत. ते पूर्वीच्या सरकारचे पहिले उपसभापतीदेखील होते.”

पुतिन यांनी देशाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांना पदावरून हटवले. (छायाचित्र-रॉयटर्स)

तज्ज्ञांच्या मते, संरक्षणमंत्री म्हणून बेलौसोव यांची नियुक्ती अनेक गोष्टी स्पष्ट करते. काहींच्या मते, याचा अर्थ असा असू शकतो की, पुतिन यांना युद्धाच्या रणनीतींमध्ये वैयक्तिक भूमिका बजावायची आहे. खरे तर, ब्रिटनचे संरक्षण सचिव ग्रँट शॅप्स यांनी भाकीत केले आहे की, नवीन संरक्षणमंत्री केवळ पुतिन यांच्या इशार्‍यावर काम करतील. ‘स्काय न्यूज’च्या वृत्तानुसार, रशियाची संपूर्ण अर्थव्यवस्था सध्या लष्कराच्या दिशेने झुकली आहे. पुतिन यांना शक्य तितक्या कार्यक्षमतेने अर्थव्यवस्थेला मजबूत करायचे आहे; जेणेकरून युद्ध सुरू राहू शकेल आणि त्यासाठी आर्थिक धोरणांची जाण असलेल्या व्यक्तीची गरज होती.

तर अनेकांचे हेही सांगणे आहे की, पुतिन हे त्यांचे दीर्घकाळचे सहयोगी आणि रशियात सर्वाधिक काळ एका पदावर कार्यरत असणारे मंत्री शोइगू यांच्यावर नाखुश होते. युक्रेनविरुद्धच्या लढाईत अनेक अडथळे निर्माण झाल्यानंतर शोइगू यांना रशियामध्ये टीकेचा सामना करावा लागला. रशियाच्या खासगी लष्कर ‘वॅग्नर’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनीही त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शोइगू यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी एक वर्षापूर्वी मॉस्कोवर मोर्चा काढला होता.

मंत्रिमंडळातील मोठे फेरबदल

बेलौसोव यांना नवीन संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय हा व्लादिमीर पुतिन यांच्या मंत्रिमंडळातील मोठ्या फेरबदलाचा एक भाग आहे. खरे तर, पुतिन यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून केलेला सर्वांत महत्त्वाचा फेरबदल म्हणून अनेक जण याकडे पाहत आहेत. शोइगू यांची आता रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद आतापर्यंत निकोलाई पात्रुसेव्ह यांच्याकडे होते. ते माजी गुप्तहेर आणि पुतिन यांच्या सर्वात जवळच्या सहकार्‍यांपैकी एक होते.

हेही वाचा : इस्रोने रचला नवा विक्रम! 3D-प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी; हे प्रिंटर नक्की कसे काम करते?

पुतिन यांनी बोरिस कोवलचुक यांची अकाउंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. तर पुतिन यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री त्यांच्या पदांवर कार्यरत राहणार आहेत. सर्गेई लावरोव्ह परराष्ट्रमंत्री पदावरच कार्यरत राहणार आहेत; तर रशियाच्या जनरल स्टाफचे प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्हदेखील त्यांच्या पदावर कायम राहतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putin appointed andrei belousov new defence minister rac