डोनाल्ड ट्रम्प चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा ‘व्हाईट हाऊस’ची पायरी चढायला सज्ज झाले आहेत. त्यांचा हा दुसरा कालखंड युरोप आणि जगासाठी अधिक जड जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यातही या निकालाने सर्वाधिक धक्का बसला आहे तो युरोपला… गेल्या दोन वर्षांपासून रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारा युक्रेन अचानक एकाकी झाल्याचे चित्र आहे. बलाढ्य अमेरिकेने डोक्यावरचा हात काढला, तर जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन किती मदत करू शकतील, युरोपातील अन्य छोट्या देशांची भूमिका काय असेल, रशियाच्या ताकदीपुढे युक्रेनचा किती काळ निभाव लागेल, हे प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत.
ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम काय?
फेब्रुवारी २०२२पासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे संपूर्ण युरोपमध्ये बेरोजगारी, इंधन दरवाढ, स्थलांतरितांचे प्रश्न, आरोग्यविषयक सेवांची हेळसांड या समस्यांनी डोके वर काढले आहे. मात्र अमेरिका आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, या विश्वासावर युरोपातील लहान-मोठे देश निवांत होते. कमला हॅरिस विजयी झाल्या असत्या, तर कदाचित युरोप सुटकेचा नि:श्वास सोडून पुन्हा निवांत झाला असता. मात्र आता चित्र संपूर्ण बदलले आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’, स्थलांतरितविरोधी धोरणांमुळे युरोपची झोप उडाली आहे. ट्रम्प यांच्या विजयाचा सरळसरळ अर्थ म्हणजे आता युरोपसाठी सुगीचे दिवस संपले आहेत. यापुढे सुरक्षेसाठी युरोपला अमेरिकेवर विसंबून राहता येणार नाहीच, पण आर्थिक क्षेत्रातही ट्रम्प फारसे उपयोगी पडण्याची शक्यता नाही. युरोपचा व्यापार अधिशेष ते फार काळ टिकू देण्याची शक्यता नही. त्यामुळे आता ‘आत्मनिर्भर’ होण्याखेरीज युरोपसमोर अन्य पर्याय नाही, पण त्याला आता उशीर झालाय का, हा प्रश्न आहे.
हेही वाचा >>>साडी नेसणार्या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
युरोपातील नेत्यांचे म्हणणे काय?
ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर युरोपने अचानक ‘शाकाहारी’ न होता, अधिक ‘मांसाहारी’ झाले पाहिजे, अशी कोटी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी केली. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा, की ट्रम्प कोणत्याही क्षणी ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’, म्हणजे ‘नेटो’ची रसद कमी करू शकतात आणि त्यामुळे युरोपीय देशांना आपल्या संरक्षण खर्चात वाढ करावी लागेल. मॅक्राँ यांनी हे मत पहिल्यांदा मांडलेले नाही. अमेरिकेवर अधिक काळ विसंबून न राहता युरोपने स्वत:च्या रक्षणासाठी स्वत: सिद्ध व्हावे, असे ते पूर्वीपासून सांगत आहेत. मात्र आता त्यांच्या या इशाऱ्याकडे खरोखरच गांभीर्याने बघण्याची वेळ आल्याचे बहुतेक नेत्यांचे मत झाले आहे. रशियाचे सामरिक आक्रमण आणि चीनचे व्यापारी आक्रमण थोपवून धरण्यासाठी आता युरोपला स्वत:च बाह्या सरसाव्या लागणार आहेत. जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांची प्रतिक्रिया मॅकाँइतकी आक्रमक नसली, तरी त्यांनीही युरोपच्या सुरक्षेसाठी आपल्याला जे करता येईल, ते केले पाहिजे असे म्हटले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्याबरोबर सर्वोत्तम वाटाघाटी करण्याचाही त्यांचा आग्रह आहे. एका अर्थी, शोल्झ यांनी अद्याप अमेरिकेच्या सढळ मदतीची आशा सोडली नसली, तरी त्यांचीच खुर्ची डुगडुगू लागली आहे.
जर्मनीतील राजकीय अस्थैर्याचा परिणाम?
ट्रम्प ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी शोल्त्झ यांचे आघाडी सरकार कोसळले आणि युरोपमधला ‘दादा’ जर्मनी राजकीय अर्थैर्याच्या गर्तेत फेकला गेला. देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचा ठपका ठेवत शोल्त्झ यांनी त्यांचे वित्तमंत्री ख्रिस्तियन लिंडनर यांची हकालपट्टी केली. लगोलग लिंडनर यांच्या फ्री डेमोक्रॅट्स पक्षाने सरकारचा पाठिंबा काढला आणि सोशल डेमोक्रेटिक पक्षाचे सरकार अल्पमतात गेले. आता जर्मनीमध्ये मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुन्हा सत्तेचे गणित जुळविण्यात शोल्त्झ यशस्वी झाले, तर त्यांना आतापर्यंतची धोरणे पुढे नेता येतील. मात्र युरोपमधील वाढता राष्ट्रवाद पाहता, जर्मनीमध्येही उजवे पक्ष प्रबळ झाले आणि त्यांना सरकारमध्ये स्थान मिळाले, तर चित्र संपूर्ण वेगळे असेल आणि याची चुणूक ट्रम्प यांच्या विजयाबद्दल युरोपच्या उजव्या राष्ट्रप्रमुखांच्या प्रतिक्रियांमधून मिळते.
हेही वाचा >>>साडी नेसणार्या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
युरोपमधील उजव्या नेत्यांचे म्हणणे काय?
युक्रेनला मदत करण्यास पहिल्यापासून विरोध असलेले हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांनी पुन्हा एकदा ‘युरोप एकट्याने युद्धाला सामोरा जाऊ शकत नाही,’ असे जाहीर केले आहे. अमेरिकेने मदत थांबविली, तर युरोपने एकट्याने युक्रेनला लष्करी रसद देत राहण्याची काही गरज नाही, असे त्यांनी ट्रम्प विजयी होताच सांगून टाकले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना अमेरिका आणि इटली ‘बहिणी’ असल्याचा साक्षात्कार झाला. ट्रम्प यांच्या राजवटीत उभयपक्षी संबंध अधिक दृढ होतील, असे वाटत आहे. जर्मनी-फ्रान्स या युरोपातील महासत्तांमधील उजव्या गटांच्या नेत्यांना ट्रम्प यांच्या विजयामुळे आनंद झाला आहे. स्थलांतरितांना विरोध, पर्यावरण रक्षणविरोधी भूमिका घेणारा ‘आपल्यातला एक’ जागतिक महासत्तेचा अध्यक्ष झाल्याची त्यांची भावना आहे. तिकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ट्रम्प यांच्या विजयाचे स्वागत करत पुन्हा चर्चेची साद घातली आहे. एकूणच, अटलांटिक महासागराच्या पलिकडे घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे हादरे पुढील काही महिने युरोपला जाणवणार आहेत.
– amol.paranjpe@expressindia.com