‘पिग्मी हॉग’ हे जगातील सर्वात लहान आकाराचे डुक्कर. मानवी अतिक्रमण व नैसर्गिक अधिवासाचा विनाश यांमुळे एकेकाळी ही ‘वराह’ प्रजाती नामशेष होण्याची भीती होती. मात्र ‘पिग्मी हॉग संवर्धन कार्यक्रमा’अंतर्गत त्यांची संख्या वाढवण्याच्या निसर्गसंवर्धकांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

‘पिग्मी हॉग’ या प्रजातीची वैशिष्ट्ये काय?

‘पिग्मी हॉग’ म्हणजे डुकराची एक खुजी प्रजाती. याचे शास्त्रीय नाव पोरकुला साल्वानिया. ही डुकराची अतिशय लहान आणि लुप्तप्राय अशी पोरकुला वंशातील एकमेव प्रजाती आहे. गवताळ प्रदेश हा त्यांचा अधिवास. एकेकाळी वायव्य उत्तर प्रदेशपासून आसामपर्यंत तसेच हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गवताळ प्रदेशात डुकराची ही प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळत होती. ‘पिग्मी हॉग’ त्याच्या आकारामुळे सुईडे (र४्रिंी) कुळातील इतर सदस्यांपेक्षा वेगळा आहे. प्रौढ ‘पिग्मी हॉग’चे वजन ६.६ ते ९.७ किलो , उंची सुमारे २० ते २५ सेमी (७.९ ते ९.८ इंच) आणि लांबी सुमारे ५५ ते ७१ सेमी (२२ ते २८ इंच) असते.

‘पिग्मी हॉग’ वाचविण्यासाठी निसर्गसंवर्धकांनी काय केले?

नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, मानवी अतिक्रमण यांमुळे ‘पिग्मी हॉग’ ही प्रजाती नष्टचर्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. उरल्यासुरल्या काही प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात तसेच सोडल्यास ते पूर्ण नष्ट होतील, अशी भीती निसर्गसंवर्धकांना वाटत होती. त्यामुळे ‘पिग्मी हॉग संवर्धन कार्यक्रम’ हाती घेण्यात आला. सुमारे ३० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९९६ मध्ये आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानातील ‘कुरिबिल’ गवताळ प्रदेशातून सहा लहान ‘पिग्मी हॉग’ पकडण्यात आले. बंदिस्त वातावरणात त्यांचे प्रजनन करून त्यांची संख्या वाढविण्यात आली. मग सहा नर आणि नऊ मादी असे १५ ‘पिग्मी हॉग’ गवताळ प्रदेशात सोडण्यात आले. तिथे त्याआधीच्या नऊ वर्षांत या प्रजातीच्या अस्तित्वाची खूण आढळली नव्हती. मात्र आता त्यांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. आसाममध्ये, या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत १९४ ‘पिग्मी हॉग’चे प्रजनन करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

संख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान कितपत कठीण?

‘पिग्मी हॉग’ नामशेष होत आहेत, अशी भीती एकेकाळी होती. त्यामुळे त्यांची संख्या वाढणे ही विशेष महत्वाची बाब आहे. बंदिस्त वातावरणातील प्रजननामुळे आता या प्रजातीला नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र त्यांना नैसर्गिक अधिवासात जगण्यास, प्रजनन करण्यास आणि स्वत:ची संख्या टिकवून ठेवण्यास मदत करणे हे निसर्गसंवर्धकांसमोरचे यापुढच्या काळातले आव्हान अधिक कठीण आहे. संवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच, नैसर्गिक अधिवासात जन्मलेल्या ‘पिग्मी हॉग’ची संख्या आता बंदिस्त वातावरणातील ‘पिग्मी हॉग’पेक्षा जास्त असू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. एखाद्या प्रजातीच्या नवीन पिढ्या त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात जगू लागतात आणि पुनरुत्पादन करू लागतात, तेव्हाच ती प्रजाती खर्‍या अर्थाने तेव्हाच सावरू शकते.

पिग्मी हॉग महत्त्वाचे का आहेत?

‘पिग्मी हॉग’ म्हणजेच पोरकुला साल्वानिया हे भारतातील एकमेव स्थानिक जंगली डुक्कर जगातील सर्वात दुर्मीळ सस्तन प्राण्यांपैकी एक आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेला गवताळ प्रदेश ‘पिग्मी हॉग’चे घरच आहे. तिथे ते लपतात, घरटी बांधतात आणि पिल्लांना वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे अनेक गवताळ आकुंचन पावतात किंवा बदलतात, तसतसे ‘पिग्मी हॉग’सारखे प्राणी त्यांचा अधिवास गमावून बसतात. यापुढच्या काळात ते जगू आणि प्रजनन करू शकले, तर त्याचा अर्थ असा की आता ते त्यांच्या घरात सुरक्षितपणे जगत आहेत.
‘पिग्मी हॉग’ भारताच्या आणखी काही भागांत पुन्हा परत येऊ शकतील का?

सध्या तरी, ‘पिग्मी हॉग’च्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न आसामपुरताच मर्यादित आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘पिग्मी हॉग’चा समावेश आपल्या ‘प्रजाती पुनरुज्जीवन कार्यक्रमा’त केला असून, ‘वाइल्डलाइफ इ्स्टिटट्यूट ऑफ इंडिया’ ही संस्था या संवर्धन प्रकल्पावर काम करत आहे. या प्रजातींची संख्या वाढवणे, त्यांचा गवताळ प्रदेशातील अधिवास सुधारणे आणि ‘पिग्मी हॉग’ त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी परत येऊ शकतील का याचा अभ्यास सुरू आहे. ‘पिग्मी हॉग’च्या संभाव्य अधिवासांमध्ये पश्चिम बंगालमधील जलदापारा आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांत मानस राष्ट्रीय उद्यानात आणखी ८० ‘पिग्मी हॉग’ सोडण्याची योजना आहे. २०४० पर्यंत त्यांची संख्या ३०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

sandeep.nalawade@expressindia.com