युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये सध्या वणवा पेटण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा वणवा प्रचंड मोठ्या प्रमाणात लागतो. या वणव्यांचा परिणाम म्हणून ‘पायरोक्युम्युलोनिम्बस’ ढग (Pyrocumulonimbus Cloud) तयार होताना दिसत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणावर मेघगर्जना करणाऱ्या या ढगांमुळे आग लागण्याच्या शक्यता आणखी वाढताना दिसत आहेत. नेचर या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अलीकडच्या वर्षांमध्ये अशा प्रकारच्या ढगांच्या निर्मितीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २०२३ च्या पूर्वी जागतिक स्तरावर एका वर्षात सरासरी १०२ पायरोक्युम्युलोनिम्बस ढगांच्या निर्मितीची नोंद झाली होती. त्यातील ५० ढग एकट्या कॅनडामध्ये तयार झाले होते. दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी जंगली आगी लागण्याच्या हंगामामध्ये एकट्या कॅनडामध्ये १४० पायरोक्युम्युलोनिम्बस ढगांची नोंद झाली होती.

हेही वाचा : बांगलादेश, श्रीलंका नि अफगाणिस्तान: अराजक असताना लोक ‘असे’ का वागतात?

या ढगांची निर्मिती कशी होते?

प्रत्येक वणव्यामुळे पायरोक्युम्युलोनिम्बस ढग तयार होत नाहीत. हे ढग अत्यंत उष्ण असा वणवा पेटला, तर त्याची परिणती म्हणूनच तयार होतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही पायरोक्युम्युलोनिम्बस ढगांची निर्मिती होऊ शकते. उदाहरणार्थ- २०१९-२०२० च्या ऑस्ट्रेलियन बुशफायर्सच्यादरम्यान अशा प्रकारचे ढग तयार झाले होते. त्या आगीच्या काळात तापमान तब्बल ८०० अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते.

आगीच्या तीव्र उष्णतेमुळे सभोवतालची हवा गरम होते. ही गरम झालेली हवा वातावरणामध्ये वरच्या दिशेने जाऊ लागते. या हवेमध्ये पाण्याची वाफ, धूर व राखदेखील वाहून नेली जाते. जसजशी ही गरम हवा वरच्या बाजूला जाते, तसतशी ती पसरू लागते आणि थंड होते. जेव्हा ही हवा पुरेशी थंड होते तेव्हा हवेबरोबर वर गेलेल्या राखेभोवती पाण्याची वाफ घनरूप होते. परिणामी, राखाडी किंवा तपकिरी रंगाचे ढग आकारास येतात. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या ढगांना पायरोक्युम्युलस ढग किंवा ‘फायर क्लाउड’, असे म्हणतात. मात्र, जर पुरेशी पाण्याची वाफ असेल आणि गरम हवा अधिक तीव्रतेने वाढली, तर हेच ‘पायरोक्युम्युलस’ ढग ‘पायरोक्युम्युलोनिम्बस’ ढगांमध्ये परिवर्तित होतात. हे ढग ५० हजार फूट उंचीवर पोहोचू शकतात. पायरोक्युम्युलोनिम्बस ढग विजांची निर्मिती करू शकतात. मात्र, या ढगांद्वारे फारसा पाऊस पडत नाही. त्यामुळे अशा ढगांमुळे लागलेला वणवा विझण्याऐवजी नव्या ठिकाणी असे अनेक वणवे पेटण्यास ते कारणीभूत ठरू शकतात. या ढगांमुळे जोरदार वारेदेखील वाहू लागतात. या जोरदार वाऱ्यामुळे वणव्याची आग अधिक वेगाने पसरू शकते. त्यामुळे वणवे कधी, कुठे नि कोणत्या दिशेने पसरतील, याचा अंदाज बांधता येणे कठीण बनते.

पायरोक्युम्युलोनिम्बस क्लाउडच्या निर्मितीचे प्रमाण अधिक वाढले आहे का?

या ढगांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ढगांचा अभ्यासदेखील तुलनेने कमी प्रमाणात झाला आहे. कारण- ही इतर पर्यावरणीय घटनांपेक्षा वेगळी घटना आहे. त्यामागे हवामान बदलाची भूमिका अधिक कारणीभूत असू शकते, असे बऱ्याचशा संशोधकांना वाटते. हवामान बदलांमुळेच या ढगांच्या निर्मितीचे प्रमाण अधिक वाढले असल्याचा त्यांचा कयास आहे. अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, जगभरामध्ये तापमान वाढत चालले असल्यामुळे जंगलांमध्ये वणवे पेटण्याची घटना अधिक सामान्य झाली असून, त्यांची तीव्रताही वाढलेली आहे. त्याचा परिणाम म्हणूनच पायरोक्युम्युलोनिम्बस ढगांच्या निर्मितीमध्येही वाढ झालेली असू शकते.

हेही वाचा : आर्थिक संकट, देशातून पलायन! श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर राजपक्षे कुटुंबाचा वंशज राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकू शकेल?

डेव्हिड पीटरसन हे कॅलिफोर्नियातील यूएस नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये हवामानशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी या ढगांसंदर्भात न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना म्हटले आहे, “सामान्यत: जर तुमच्याकडे वणवे पेटण्याचे प्रमाण अधिक असेल, तर तुमच्याकडे अधिक पायरोक्युम्युलोनिम्बस ढगांचीही (पायरोसीबीएस) निर्मिती होईल. कारण- त्यांच्या निर्मितीसाठीचे पोषक वातावरण इथेच असू शकते. मात्र, ते वातावरणातील परिस्थितीवरही अवलंबून असते. तीव्र वणव्यामुळे हे ढग तयार होण्याची शक्यता निश्चितपणे वाढते.”