Pythagorean Theorem History Sulba Sutras search intent informative analysis: काटकोन त्रिकोणाच्या सर्वांत लांब बाजूवरील वर्गाचं क्षेत्रफळ हे उर्वरित दोन बाजूंवरील वर्गांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतकं असतं, हेच जगप्रसिद्ध ‘पायथागोरसचं प्रमेय’ (Pythagorean Theorem) आहे. साधारणपणे आपल्याला असं शिकवलं जातं की, पायथागोरस नावाच्या ग्रीक तत्त्वज्ञाने इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास या प्रमेयाचा शोध लावला. मात्र, या प्रमेयाचा खरा इतिहास इतका सरळसोट आहे का?
ज्ञाननिर्मितीत सर्वांचा समान वाटा
एक गोष्ट सुस्पष्ट आहे ती म्हणजे, भूमितीतलं हे तत्त्व प्राचीन काळातील अनेक संस्कृतींनी स्वतंत्रपणे शोधून काढलं होतं. त्यामागे प्रत्येक संस्कृतीच्या आपापल्या विशिष्ट व्यवहारिक गरजा होत्या. त्यातूनच भूमितीय सत्यापर्यंतचा प्रवास पार पडला होता. हेही खरंच की, शुल्बसूत्रांमध्ये नोंदवलेलं भारताचं योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे; मात्र भारतानेच सर्वप्रथम हे तत्त्व शोधलं, असे उपलब्ध ऐतिहासिक पुरावे सांगत नाहीत. या भूमितीय तत्त्वाचा वस्तुनिष्ठ इतिहास समजून घ्यायचा असेल, तर शुल्बसूत्रकार बौधायन यांच्या योगदानाचा विचार मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि ग्रीस या प्राचीन संस्कृतींच्या गणितीय कामगिरीच्या जोडीनेच करावा लागतो.
प्रमेयाचा सर्वांत जुना पुरावा कुठे?
पायथागोरसच्या प्रमेयाशी संबंधित आजवरचा सर्वांत जुना नोंदबद्ध पुरावा जसं सर्वसाधारणपणे मानलं जातं, तसा तो ग्रीस किंवा भारतात सापडलेला नाही. या संबंधातला ठोस पुरावा सापडलाय तो, मेसोपोटेमियात. आजच्या इराकमधील टिग्रिस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या मधल्या प्रदेशात ही प्राचीन संस्कृती विकसित झाली होती. अत्यंत संघटित प्रशासकीय व्यवस्था असलेल्या या संस्कृतीतील लेखक आणि हिशेबनीसांनी हजारो मातीच्या पाट्यांवर विविध प्रकारच्या नोंदी करून ठेवल्या होत्या.
कोणी केली वर्गमुळांची विश्वासार्ह नोंद ?
गणिताच्या इतिहासाच्या दृष्टीनं यापैकी दोन मृण्मय (मातीच्या) पाट्या विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली आहे, ‘प्लिम्प्टन ३२२’ (Plimpton 322): साधारणपणे इ.स.पूर्व १८०० च्या काळातील या पाटीवर अंकांचे अनेक स्तंभ आढळतात. त्यातल्या संख्या विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या आहेत, त्या ‘पायथागोरियन त्रिकांशी’ (Pythagorean Triples) संबंधित आहेत. यातली दुसरी पाटी आहे, YBC 7289. या पाटीवर एका तिरक्या चौकोनाच्या (चौरसाच्या) कर्णाच्या साहाय्यानं दोनचं वर्गमूळ (\sqrt{2}) अत्यंत अचूकपणानं काढलेलं दिसतं.
पायथागोरसचे पूर्वसुरी कोण ?
मेसोपोटेमियात आढळलेल्या मातीच्या पट्ट्यांवर नोंदवलेले हे परिणाम योगायोगानं आलेले नव्हते. आज ज्याला आपण पायथागोरसचं प्रमेय म्हणतो, त्या भूमितीय संबंधाचं बॅबिलोनियन गणितज्ञांनाही सखोल आणि व्यावहारिक ज्ञान होतं, हे या पुराव्यांवरून दिसतं. विशेष म्हणजे, पायथागोरसच्या जन्माच्या एक हजार वर्षांहून अधिक काळ आधी हे गणितीय ज्ञान मेसोपोटेमियात अस्तित्वात होतं.
इजिप्तचं योगदान काय?
इजिप्तमधील गणितीय योगदानाचे पुरावे तुलनेनं कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इजिप्शियन लोक लेखनासाठी पपायरसचा (Papyrus) वापर करत असत. मातीच्या पाट्यांच्या तुलनेत पपायरस अधिक नाशवंत असल्यामुळे त्यावरील प्राचीन नोंदी मोठ्या प्रमाणात टिकून राहिल्या नाहीत. प्राचीन इजिप्तमध्ये प्रचलित गणिताशी संबंधित दोन महत्त्वाच्या सुरुवातीच्या पपायरसमध्ये पायथागोरसचं प्रमेय स्पष्टपणे नमूद केलेलं नाही; मात्र साधारण इ.स.पूर्व ३०० च्या काळातील ‘काहिरो गणितीय पपायरस’ (Cairo Mathematical Papyrus) मध्ये पायथागोरसच्या भूमितीय संबंधाशी थेट निगडित नऊ गणिती प्रश्न आढळतात. याचा अर्थ काय?
पिरॅमिडची निर्मिती कोणत्या गणिती सूत्रानुसार?
३-४-५ हे पायथागोरियन त्रिकाचं सर्वांत सोपं उदाहरण आहे. इजिप्तमधल्या पिरॅमिड उभारणाऱ्या कारागिरांनी काटकोन निश्चित करण्यासाठी ३-४-५ हा नियम वापरला असावा, असंही मोठ्या प्रमाणावर मानलं जातं. मात्र, या वापराचा निर्विवाद ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. रॅमिडसारख्या प्रचंड वास्तूंचा चौकोनी पाया आणि त्याचे काटकोन अचूक राखण्यासाठी भूमितीची गरज होतीच होती. त्यामुळे इतर अनेक प्राचीन संस्कृतींप्रमाणेच इजिप्तमध्येही भव्य वास्तुनिर्मितीच्या व्यावहारिक गरजांमधून गणितीय ज्ञानाचा विकास झाला असावा, एवढेच इथं म्हणता येते.
कौ-कू प्रमेय कोणाचं?
गणितविषयक इतिहासाच्या पाश्चिमात्य मांडणीमध्ये अनेकदा चीनकडे कमअस्सल समजून दुर्लक्ष झालं. प्रत्यक्षात या संबंधातलं चीनचे योगदान उल्लेखनीय आहे. चीनमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाला ‘कौ-कू प्रमेय’ (Kou-ku theorem) या नावानं ओळखलं जातं. या प्रमेयाचा उल्लेख ‘चौ पेई सुआन चिंग’ (Chou Pei Suan Ching) या प्राचीन चिनी गणितीय ग्रंथात आढळतो. या ग्रंथाच्या निर्मितीचा संबंध साधारण इ.स.पूर्व सहाव्या शतकाशी जोडला जातो.
चिनी ज्ञान दृश्यातून उजळले
चिनी परंपरेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘सुआन-थू’ (Hsuan-thu). हे पायथागोरसच्या प्रमेयाचं दृश्य स्वरूपातलं प्रमाण (Visual Proof) मानलं जातं. गणिताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते, प्राचीन जगातल्या भूमितीय संबंधाच्या सुरुवातीच्या आणि अत्यंत सुबक दृश्य स्पष्टीकरणांपैकी हे एक आहे. चिनी गणितज्ञांनीही स्वतंत्रपणे या भूमितीय संबंधापर्यंत मजल मारली होती. भूमापन, बांधकाम आणि विविध प्रकारच्या मोजमापांसारख्या व्यावहारिक कामांसाठी या ज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता. थोडक्यात, जगात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ज्ञानाची एकसमांतर निर्मिती होतच होती.
पायथागोरसनं खरोखर लावला प्रमेयाचा शोध?
आता प्रश्न असा आहे, ज्या पायथागोरसच्या नावानं आज हे प्रमेय ओळखले जातं, त्यानेच सर्वप्रथम त्याचा शोध लावला होता का? गंमत अशीय,याबाबत इतिहासकार सावध भूमिका घेतात. कारण, ऐतिहासिक पुराव्यांनुसार पायथागोरसच्या जन्मापूर्वी अनेक शतकं मेसोपोटेमियामध्ये या भूमितीय संबंधाचं ज्ञान अस्तित्वात होतं. ग्रीक परंपरेतील नोंदींनुसार पायथागोरसनं इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये प्रवासही केला होता. त्यामुळे तेथील गणितीय विचारांशी त्याचा परिचय झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रमेयाला पूर्णत्व कोणी दिलं?
पायथागोरसच्या प्रमेयाचं औपचारिक आणि काटेकोर ग्रीक प्रमाण खऱ्या अर्थाने प्राचीन ग्रीको-रोमन काळातला गणितज्ज्ञ असलेल्या युक्लिडनं (Euclid) नोंदवलं. युक्लिडने आपल्या प्रसिद्ध ‘इलिमेंट्स’ (Elements) या भूमितीविषयक ग्रंथात हे प्रमाण दिलं. विशेष म्हणजे, पायथागोरसच्या मृत्यूनंतर जवळपास तीन शतकांनी हे घडलं. पायथागोरसच्या विचारपरंपरेनं या गणितीय संकल्पनांभोवती व्यापक गणितीय आणि तात्त्विक चौकट विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मग असं असताना प्रमेयाला पायथागोरसचंच नाव कसं मिळालं? तर याचं एक उत्तर असं आहे की, युरोपीय विद्वत्तेत ग्रीक ज्ञानपरंपरेला मिळालेल्या प्रतिष्ठेचा हा प्रभाव होता. त्या प्रभावातून
पायथागोरसला हे स्थान मिळालं.
शुल्बसूत्रांचं मोल काय ?
भूमितीय प्रमेयाच्या संदर्भात भारताचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला शुल्बसूत्रांमध्ये पाहायला मिळतं. साधारण इ.स.पूर्व ८०० ते ५०० या काळात रचल्या गेलेल्या या प्राचीन ग्रंथांमध्ये भूमितीचं अत्यंत महत्त्वाचं ज्ञान नोंदवलेलं आहे. ‘शुल्ब’ या शब्दाचा संबंध मोजमापासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरी किंवा रज्जूशी आहे. वैदिक यज्ञांसाठी विशिष्ट आकारांच्या अग्निवेदी बांधाव्या लागत. काही वेदींचे आकार बाज, कासव किंवा इतर धार्मिक प्रतिकांसारखे असत. अर्थातच या वेदींची अचूक रचना करण्यासाठी पुरोहित-कारागिरांना भूमितीचं अचूक ज्ञान असणं आवश्यक होतं. याच व्यावहारिक गरजेतून शुल्बसूत्रांमध्ये विकसित भूमितीय ज्ञान आपल्यासमोर येतं.

बौधायनांनी कोणता नियम माडंला ?
शुल्बसूत्रकार बौधायन यांनी या प्रमेयाचं अत्यंत स्पष्ट शाब्दिक विधान नोंदवलं आहे. इतिहासकारांच्या मते, हे या भूमितीय तत्त्वाच्या सुरुवातीच्या स्पष्ट आणि निःसंदिग्ध शाब्दिक मांडण्यांपैकी एक आहे. बौधायन यांनी असा नियम मांडला की, आयताच्या कर्णावर ताणलेल्या रज्जूमुळे (दोरीमुळे) निर्माण होणारं क्षेत्रफळ हे त्याच्या दोन्ही बाजूंवर स्वतंत्रपणे निर्माण होणाऱ्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतकं असते. आजचं गणितीय भाषेचं सूत्र a^2 + b^2 = c^2 या प्रसिद्ध संबंधाशी निगडित आहे.
प्रगत भारतीय भूमितीय परंपरा
अर्थातच शुल्बसूत्रांचं महत्त्व केवळ प्रमेयाच्या शाब्दिक मांडणीपुरतं मर्यादित नव्हतं. कारण, त्यामध्ये ३-४-५ आणि ५ -१२-१३ यांसारख्या पायथागोरियन त्रिकांची (Triples) उदाहरणंही आढळतात. या शिवाय वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीही दिलेल्या आहेत. विशेषतः \sqrt{2} चं अत्यंत अचूक मूल्य (Approximation) शुल्बसूत्र परंपरेतील गणितीय गल्भतेचं उदाहरण मानलं जातं. त्यामुळे प्राचीन भारतातील गणित केवळ धार्मिक किंवा तात्त्विक चिंतनापुरतं मर्यादित नव्हतं; तर यज्ञवेदींची आखणी, मोजमाप, क्षेत्रफळाचं रूपांतर आणि विविध आकारांच्या वेदी तयार करण्याच्या प्रत्यक्ष गरजांमधून विकसित झालेली एक प्रगत भूमितीय परंपरा त्यामागे होती.
ज्ञानपरंपरांचं आदानप्रदान
थोडक्यात, इजिप्तमध्ये वास्तुनिर्मिती आणि भूमापनाच्या गरजेतून भूमिती विकसित झाली. चीनमध्ये याच संबंधाची स्वतंत्र गणितीय परंपरा आणि दृश्य प्रमाण विकसित झालं. ग्रीकांनी त्याला अधिक औपचारिक प्रमाणांच्या चौकटीत मांडलं. भारतात शुल्बसूत्रकारांनी यज्ञवेदींच्या बांधणीच्या प्रत्यक्ष गरजांमधून या भूमितीचा अत्यंत विकसित वापर केला. बौधायनांनी या संबंधाचे स्पष्ट शाब्दिक विधान नोंदवलं आणि विविध पायथागोरियन त्रिकांचा उपयोग केला.
भारताचं स्थान कोणतं?
भूमितीय प्रमेयाचा हा इतिहास पाहता भारताला इतर संस्कृतींपेक्षा वर किंवा खाली ठेवण्यापेक्षा मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि ग्रीस यांच्या बरोबरीने प्राचीन जगातील स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण गणितीय परंपरा म्हणून पाहणं अधिक योग्य ठरतं. भारत या इतिहासात ना मागे होता, ना उपलब्ध पुराव्यांनुसार सर्वांत आधी; मात्र त्याचं योगदान स्वतंत्र, प्रगत आणि निर्विवादपणे महत्त्वाचं होतं. शेवटी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, भारताला इतर संस्कृतींपेक्षा वर न ठेवता त्यांच्या बरोबरीचं स्थान देणं म्हणजे भारतीय गणितीय परंपरेचं महत्त्व कमी करणं नव्हे; तर पुराव्यांच्या आधारे तिचं खरं ऐतिहासिक स्थान समजून घेणं आहे.
(देवदत्त हे कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध पुराणकथांचे अभ्यासक आहेत.)
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी विषयाशी संबंधित प्रश्न;
१. पायथागोरसच्या भूमितीय संबंधाचा सर्वांत जुना नोंदबद्ध पुरावा ग्रीस किंवा भारतात आढळत नाही. तो कुठे आढळतो आणि गणिताच्या इतिहासाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व काय?
२. पायथागोरसच्या प्रमेयाचा इतिहास समजून घेताना शुल्बसूत्रकार बौधायन यांच्या योगदानाचा विचार मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि ग्रीस यांच्या गणितीय कामगिरीच्या संदर्भात करणे आवश्यक आहे. चर्चा करा.
३. गणिताच्या इतिहासाबाबत प्रचलित असलेल्या पारंपरिक कथनांना आव्हान देण्याच्या दृष्टीने शुल्बसूत्रांचे महत्त्व स्पष्ट करा.
४. प्राचीन काळातील गणितीय ज्ञानाचा विकास अनेकदा निव्वळ अमूर्त चिंतनातून नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातील गरजांमधून झाला. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारत आणि चीनमधील उदाहरणांच्या आधारे चर्चा करा.
