ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (८ सप्टेंबर) स्कॉटलंडमधील बालमोरल महालात निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात कोहिनूर हिऱ्याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे. कोहिनूर हिरा भारतात परत आणावा, अशी मागणी काही नेटकऱ्यांकडून केली जात आहे. कोहिनूर हिरा १०५.६ कॅरेटचा रंगहीन हिरा आहे. हा हिरा १३व्या शतकात आंध्र प्रदेशातील गुंटूरजवळ काकतीय राजवंशाच्या कालखंडात सापडला होता.

कोहिनूर हिऱ्याचा प्रवास
गेल्या काही वर्षांत कोहिनूर हिरा अनेक राजघराण्यांच्या ताब्यात होता. सुरुवातीला हा हिरा दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीकडे होता, त्यानंतर तो मुघल साम्राज्याकडे गेला. पुढे पर्शियन राजाने आक्रमण केल्यानंतर नादिर शाहने कोहिनूर हिरा लुटून अफगाणिस्तानात नेला. १८०९ साली पंजाबचे शीख महाराजे रणजीत सिंग यांच्याकडे हा हिरा आला. तत्पूर्वी हा हिरा विविध राजवंशांकडे गेला होता. यानंतर अखेरीस रणजीत सिंग यांच्या उत्तराधिकाऱ्याने ब्रिटीश कालखंडात इंग्रजांकडून राज्य गमावल्यानंतर कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरियाकडे सुपूर्द केला.

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

सुरुवातीला राणी व्हिक्टोरियाने हा हिरा ‘ब्रोच’ म्हणून परिधान केला. त्यानंतर कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणीच्या मुकुटाचा एक महत्त्वाचा भाग बनला. हा मुकुट सर्वप्रथम राणी अलेक्झांड्राने वापरला, त्यानंतर तो मुकुट राणी मेरीच्या डोक्यावर सजला. शेवटी, १२ मे १९३७ रोजी राजा जॉर्ज सहावे यांचा राज्याभिषेक पार पडला. यावेळी कोहिनूर हिरा राजा जॉर्ज सहावे यांच्या पत्नी राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटाचा भाग बनला. दोन हजार ८०० हिऱ्यांनी जडलेल्या या मुकुटाची फ्रेम प्लॅटिनम धातूची असून या मुकुटाच्या समोरचा बाजूला कोहिनूर हिरा लावण्यात आला आहे. हा हिरा सध्या टॉवर ऑफ लंडनमध्ये देखाव्यासाठी ठेवण्यात आला आहे.

राणीच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिऱ्याचा मुकुट कुणाला मिळणार?
‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर हा कोहिनूर हिऱ्याचा मुकुट ब्रिटनचे नवीन राजे चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला पार्कर बाउल्स यांच्या डोक्यावर ठेवला जाईल. राजे चार्ल्स जेव्हा ब्रिटनचा राजा म्हणून सिंहासनावर बसेल, तेव्हा तो मुकुट राजा चार्ल्सची पत्नी कॅमिला पार्कर बाउल्स यांना देण्यात यावा, अशी घोषणा राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. खरं तर, हा मुकुट आतापर्यंत राजघराण्यातील केवळ महिलांनीच परिधान केला आहे. पुरुषांनी हा मुकुट परिधान करणं अपशकून मानलं जातं, असंही ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटलं आहे.

कोहिनूर हिरा परत भारतात आणला जाऊ शकतो का?
तत्कालीन पंजाब प्रांत ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर तेथील राजाने कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरीयाला सुपूर्द केला होता. भारतीय राजकारणी आणि लेखक शशी थरूर यांनी आपल्या ‘An Era of Darkness’ या पुस्तकात लिहिलं आहे की, ब्रिटिशांनी वसाहतवादाची भरपाई म्हणून त्याकाळी केलेली लूट परत करावी.

हेही वाचा- राजे चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे सम्राट

कोहिनूर हिरा शीख महाराजा रणजीत सिंग यांचे वारस दुलीप सिंग यांनी औपचारिकपणे राणी व्हिक्टोरियाला सुपूर्द केला होता. त्यावेळी दुलीप सिंग यांच्याकडे हिरा देण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. या घटनेवर भारतीय राजकारणात असा युक्तीवाद केला जातो की, “जर तुम्ही माझ्या डोक्यावर बंदूक रोखली तर मी तुम्हाला माझं पाकीट भेट म्हणून देऊ शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुमच्याकडे बंदूक नसताना मला ते पाकीट परत नको आहे.”

कोहिनूर हिऱ्याबाबत भारत सरकारची भूमिका
कोहिनूर हिरा चोरून किंवा जबरदस्तीने घेतला नव्हता, त्यामुळे भारताने पुन्हा पुन्हा त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नये, असं भारत सरकारने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. तसेच ब्रिटीश सरकारनेही यापूर्वी कोहिनूर हिरा परत करण्याबाबतची शक्यता नाकारली आहे.