आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन्स आणि अब्जावधी गणितं काही सेकंदांत सोडवण्यासाठी विविध यंत्रांचा आणि त्यातील तंत्रज्ञानाचा विकास झाला. आज तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन हा मानवी बुद्धिमत्तेचा सर्वांत मोठा चमत्कार मानला जातो. त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये कोट्यवधी ट्रान्झिस्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जगातील कोणतीही माहिती काही सेकंदात आपल्या डोळ्यांसमोर मांडण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे.

बहुतांश लोक या तंत्रज्ञानातील एक ‘फीचर’ रोज वापरतात – कीबोर्ड. पण, तुम्ही कधी कीबोर्डवरच्या अक्षरांचा क्रम निरखून पाहिला आहे का? आपण बालपणापासून इंग्रजी अक्षरांची रचना ही डावीकडून उजवीकडे ‘A, B, C, D,…’ या क्रमात शिकलो आहोत, मग आज आपण वापरणाऱ्या कीबोर्डची रचना ‘Q, W, E, R, T, Y,…’ अशी का असते? तसंच या अक्षरांची रचना साधारण समलंब चौकोनाच्या (TRAPEZIUM) आकारात असते. ही ठरवून केलेली रचना होती की केवळ एक तांत्रिक चूक? जाणून घ्या या रचनेमागची गोष्ट.

टाईपरायटरची रचना – चूक की निव्वळ गैरसमज?

१९८० मध्ये जर्नल ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगमध्ये टोकियो विद्यापीठातले प्रा. हिसाओ यामादा यांनी ‘A Historical Study of Typewriters and Typing Methods’ हा शोधनिबंध प्रसिद्ध केला. या शोधनिबंधात अगदी उत्कृष्ट पद्धतीने टाईपरायटर आणि कीबोर्डच्या रचनेविषयी मांडणी करण्यात आली होती.

या शोधनिबंधात असं मांडण्यात आलं की, जुन्या टाइपरायटरमध्ये अक्षरांचे धातूचे दांडे (Typebars) एका गोलाकार बास्केटमध्ये बसवलेले असायचे. जर एकापाठोपाठ असलेली अक्षरं टंकित केली तर हे दांडे एकमेकांना धडकायचे आणि यंत्र जाम व्हायचं. यामादा यांनी आपल्या शोधनिबंधात असा दावा केला की, टाइपरायटरचे शोधक क्रिस्तोफर शोल्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरांचा क्रम मुद्दाम विस्कटला, ज्यामुळे टायपिस्टचा वेग कमी होईल आणि यंत्र जाम होणार नाही.

मात्र, २०११ मध्ये क्योटो विद्यापीठाचे संशोधक डॉ. कोईची यासुओका आणि मोतोको यासुओका यांनी हा दावा पूर्णपणे नाकारला. ‘On the Prehistory of QWERTY’ या शोधनिबंधात त्यांनी, ‘टायपिस्टचा वेग कमी करण्यासाठी अक्षरांचा क्रम विस्कटण्यात आला’ हा यामादा यांचा दावा पूर्णपणे खोटा (Nonsense) असल्याचे दाखवून दिले.

यासुओका यांनी मांडलेले पुरावे

  • टायपिस्टचा वेग कमीच होता : त्यांच्या मते, १८७० च्या दशकात आजच्यासारखं आपण न बघता सर्व दहा बोटांचा उपयोग करून टंकन करतो (टच टायपिंग) तसं कौशल्य तत्कालीन टायपिस्टसमध्ये नव्हतं, त्यामुळे यंत्र जाम होईल इतका वेग मानवी हातांना असण्याचा प्रश्नच नव्हता!
  • टेलिग्राफ ऑपरेटर्सची गरज : तत्कालीन टाइपरायटर्सचे ग्राहक हे रेल्वे आणि पोस्टातील टेलिग्राफ ऑपरेटर्स होते. अमेरिकीय मोर्स कोडमध्ये ‘Z’ (… .) आणि ‘SE’ (…आणि) यांचे ध्वनी ऐकताना प्रचंड गोंधळ व्हायचा. तारेतून येणारा आवाज नीट कळेपर्यंत ऑपरेटरचं बोट अडखळू नये म्हणून शोल्स यांनी टेलिग्राफ ऑपरेटरच्या सूचनेनुसार ‘S, E आणि Z’ ही अक्षरं जवळ आणून ठेवली.

पहिल्या टाइपरायटरची रचना

१८६८ मध्ये जेव्हा शोल्स यांनी पहिलं मॉडेल पेटंट केलं तेव्हा अक्षरं वर्णक्रमानुसार दोन रांगांमध्ये मांडलेली होती. तो पियानोच्या पट्ट्यांसारखा दिसायचा.

वरची रांग : 3 5 7 9 N O P Q R S T U V W X Y Z
खालची रांग : 2 4 6 8 . A B C D E F G H I J K L M

PIANO KEYBOARD

१८७३ : बंदुका बनवणाऱ्या कंपनीत कीबोर्ड बनला?

१८६८ ते १८७३ या पाच वर्षांत हजारो टेलिग्राफ संदेशांच्या चाचण्यांनंतर अक्षरांची रचना अनेकदा बदलली गेली. शेवटी फेब्रुवारी १८७३ मध्ये शोल्स यांनी या तंत्राचे उत्पादन हक्क अमेरिकेतील प्रसिद्ध शस्त्रनिर्मिती कंपनी ‘ई. रेमिंग्टन अँड सन्स’ला विकले.

रेमिंग्टनच्या कारखान्यातले मेकॅनिक जेफरसन क्लाफ यांनी या रचनेत शेवटचा एक बदल केला. त्यांनी ‘R’ हे अक्षर खालच्या रांगेतून वरच्या रांगेत टाकलं. यामागे एक साधी ‘मार्केटिंग युक्ती’ होती – विक्री करणाऱ्या सेल्समनला ग्राहकांसमोर प्रात्यक्षिक दाखवताना ‘TYPEWRITER’ हा ब्रॅण्डचा संपूर्ण शब्द कीबोर्डच्या वरच्या एकाच रांगेमध्ये येतात, ज्यामुळे T-Y-P-E-W-R-I-T-E-R हा शब्द जलद टाईप करून दाखवता येत होता.

अशा प्रकारे, मोर्स कोडच्या गोंधळातून आणि सेल्समनच्या एका छोट्या मार्केटिंग युक्तीतून (किंवा ट्रिकमधून) जन्माला आलेली ही रचना पुढे QWERTY म्हणून जगासमोर प्रसिद्ध झाली.

स्मार्टफोनच्या युगात १५३ वर्ष जुनी सवय का टिकली?

QWERTY कीबोर्ड आणि ड्व्होरॅक कीबोर्ड

एकदा माणसाला एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती सुटता सुटत नाही – याला ‘path dependency’ असं म्हणतात. ‘ड्व्होरॅक कीबोर्ड’ने टंकनाचा वेग प्रचंड वाढवूनही जगाने तो स्वीकारला नाही; कारण तोपर्यंत बहुतांश कार्यालयांमध्ये QWERTY कीबोर्डची सवय लागली होती.