Rabindranath Tagore Influence on Marathi Literature: अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रयोगशीलतेमुळे मराठी साहित्यामध्ये नवनवीन प्रवाहांना प्रोत्साहन मिळत गेले. यात मराठी साहित्यिक मनाच्या जडणघडणीमागे ‘रवींद्रनाथ टागोरां’च्या विचारांचाही खूप मोठा प्रभाव दिसून येतो. बंगालमध्ये जे पेरले, त्याचे अंकुर महाराष्ट्रातही तितक्याच जोमाने वाढले. साहित्यात जेव्हा एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेत येतात तेव्हा दुसरी भाषाही तेवढीच अधिक समृद्ध होते. मराठी मनावर टागोरांच्या साहित्याचा परिणाम हा केवळ एका लेखकाचा दुसऱ्यावर झालेला प्रभाव नसून, तो दोन संस्कृतींना जोडणारा दुवा ठरला आहे.

रवींद्र-युग

बाल्यावस्थेपासूनच टागोरांनी ज्ञानाच्या आणि कलेच्या विविध शाखा प्रत्यक्षात अभ्यासल्या- अनुभवल्या. जोडासाँको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता. यातून त्यांना लेखनासाठी स्फूर्ती मिळत होती, असे त्यांनी त्यांच्या ‘My life in my words’ ह्या पुस्तकात म्हटले आहे. मग ते वयाच्या सातव्या वर्षी कवितेची रचना करणे असो, वा वयाच्या साठाव्या वर्षी चित्ररेखाटण्याची आवड जोपासणे असो, त्यांना रुचणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवले.

निसर्गदत्त प्रतिभाशक्ती

या प्रतिभावंत व्यक्तिमत्वाच्या अंगी ही निसर्गदत्त प्रतिभाशक्ती त्यांच्या या बालपणीच्या निरीक्षणातूनच बहरत गेली असावी. त्यांच्या या निसर्गदत्त प्रतिभेने केवळ निसर्गाचेच वर्णन केले नाही, तर मानवी जीवनातील गूढता, आध्यात्मिक ओढ, वैश्विक मानवतावाद आणि स्त्री मनातील संवेदानांचे विविध पैलू उलगडले. ‘गीतांजली’मधील ईश्वराप्रती असलेली शरणागत वृत्ती, ‘गोरा’ सारख्या कादंबरीतून मांडलेला प्रगल्भ राष्ट्रवाद आणि त्यांच्या लघुकथांतून दिसणारे ग्रामीण जीवनातील सुख-दु:ख; या सगळ्या विषयातून त्यांनी माणसाला माणसाशी जोडण्याचे काम केले. निसर्गाच्या निरीक्षणातून बहरलेली ही प्रतिभा पुढे संपूर्ण जगाला गवसणी घालणारी ‘विश्वमानवतावादाची’ प्रेरणा ठरली.

शांतिनिकेतन

शांतिनिकेतन ही केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नाही तर, ती निसर्ग आणि मानव यांच्यातील अद्वैताचा शोध घेणारी एक जिवंत प्रयोगशाळाच ठरली. इथे शिक्षण निसर्गाच्या सान्निध्यात, मुक्त वातावरणात आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतीने दिले जाते. पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून वेगळे, शांतिनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. पुढे येथेच ‘विश्वभारती विद्यापीठ’ स्थापन झाले, जे आजही भारतीय संस्कृती, कला आणि शिक्षणाचा प्रसार करत आहे.

Rabindranath Tagore
Rabindranath Tagore

गुरुकुल पद्धतीवर आधारित निवासी शाळा

रवींद्रनाथांच्या वडिलांनी, महर्षी देवेंद्रनाथ टागोरांनी १८६३ साली शांतीचे निवासस्थान या उद्दिष्टाने आश्रम स्थापन केला. या वास्तूत भरलेली ईश्वरी प्रसन्नता आणि सुखावणाऱ्या ऊर्जेने जशी टागोरांची प्रतिभाशक्ती वाढवली त्याच प्रेरणेने त्यांनी या वास्तूचे रूपांतर एका ज्ञानमंदिरात केले. २२ डिसेंबर १९०१ रोजी टागोरांनी प्राचीन भारतीय गुरुकुल पद्धतीवर आधारित निवासी शाळा स्थापन केली. ती पश्चिम बंगाल मधील बोलपूर येथे वसलेली आहे.

पु. ल. देशपांडे यांनी वर्णन केलेले शांतिनिकेतन

पु. ल. देशपांडे लिखित ‘वंग-चित्रे’ या पुस्तकात आपल्या तेथील वास्तव्याचा आणि टागोरांच्या साहित्याचा प्रभाव लेखनावर कसा झाला याविषयी ते सांगतात. १९७० साली वयाच्या चाळीसाव्या वर्षी बंगाली भाषेशी ‘सलगी’ करावी म्हणून शांतिनिकेतन मध्ये राहिल्यावर त्यांच्या जीवनात जणू एका नव्या ‘वसंताचे’ आगमन झाले असे ते म्हणतात. त्यांच्यासाठी हे वास्तव्य केवळ बंगाली भाषा शिकण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते एका समृद्ध संस्कृतीशी नाते जोडणारे एक ‘सुंदर स्वप्न’ होते. पुलंच्या मते रवींद्रनाथांच्या साहित्याने केवळ निसर्गातील ऋतूंचे सौंदर्य पाहण्याची दृष्टी दिली नाही तर बंगाली साहित्याची आवड मनात निर्माण केली. पुणे विद्यापीठाच्या रवींद्रनाथ टागोरांवरील व्याख्यानमालेत ते म्हणतात की ‘रवींद्रनाथांच्या सृष्टीत शिरल्यावर, त्यांनी जीवनात ज्या ज्या पार्थिव आणि अपार्थिवाला स्पर्श केला तो एका महाकवीचा स्पर्श होता…’

साने गुरुजी आणि भा. वि. वरेरकर यांच्यावरील टागोरांचा प्रभाव

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर प्रथमच भारताचा राष्ट्र म्हणून विचार करण्यात आला. फाळणीच्या सुरुवातीनंतर बंगालमधील सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘बॉयकॉट ब्रिटिश’ हा नारा दिला होता. रवींद्रनाथांनी त्यांच्या लेखणीतून समाजाच्या परिघापर्यंत राष्ट्रीयतेचे विचार पोहोचवले होते. त्यांनी त्यांच्या कवितांमधून राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. टागोरांसाठी राष्ट्रवाद ही कोणतीही राजकीय यंत्रणा नसून, ती ‘माणसाला माणसाशी जोडणारी’ एक भावनिक साखळी होती. टागोरांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेने प्रेरित होऊन साने गुरुजी आणि भा. वि. वरेरकर त्यांच्या रचनांमधून राष्ट्रवाद प्रकटू लागला.

मराठी साहित्यावर टागोरांचा प्रभाव

साने गुरुजींच्या साहित्यावर टागोरांच्या ‘NATIONALISM’ या निबंधसंग्रहांचा आणि विशेषतः ‘विश्वमानवतावादाचा’ परिणाम झालेला दिसतो. साने गुरुजी आपल्या ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकात थेट मत मांडतात की, ओम सहनाववतु हा भारतीय मंत्र समाजातील भेदभाव आणि द्वेष मिटवून ऐक्य निर्माण करतो. ते म्हणतात की, गुरु-शिष्यांच्या पलीकडे जाऊन ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हिंदू-मुस्लिम, स्पृश्य-अस्पृश्य आणि विविध प्रांतातील लोकांमधील असलेली कुटता- भेदभाव दूर करण्यासाठी तो मंत्र वापरला जावा.

वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ आणि ‘अमृतवेल’ सारख्या साहित्यातून टागोरांच्या विचारांची प्रचिती येते. ‘ययाती’ मधल्या पौराणिक कथेच्या साच्यात समकालीन मानवी वृत्ती आणि विचारांचे दर्शन घडते तर ‘अमृतवेल’ या कादंबरीतून मानवी नात्यांमधील ओलावा आणि त्यागाचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे. खांडेकरांच्या साहित्यामध्ये रूपकांचा मुबलक वापर झालेला दिसतो, ही रुपकांची शैली टागोरांच्या ‘लिपिका’ ह्या पुस्तकातून आलेली दिसते, असे समिक्षक मानतात. ‘ययाती’ मध्ये पौराणिक कथेच्या साच्यातून समकालीन मानवी वृत्तींचे जे दर्शन घडते, त्याचे विश्लेषण वैशाली घड्यालजी (के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांनी त्यांच्या ‘Treatment of Myth in Rabindranath Tagore’s Drama’ या प्रबंधात केले आहे.

ना. सी. फडकेंच्या साहित्यावरही टागोरांचा प्रभाव

ना. सी. फडकेंची पहिली कादंबरी ‘दौलत’ यामध्ये निसर्ग आणि मानवी भावनांचा मेळ पाहायला मिळतो तर ‘अल्ला हो अकबर’ या कादंबरीतील ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्रेमभावनांचे चित्रण टागोरांच्या ‘राजर्षी’ किंवा ‘चोखेर बाली’शी काही अंशी साधर्म्य दर्शवते. रवींद्रनाथ हे बंगाल मधील लघुकथांचे जनक मानले जातात तसेच मराठीमध्ये लघुनिबंधांचा प्रवाह फडकेंनी सुरू केला. टागोरांच्या ‘THE GARDNER’ आणि ‘FRUIT GATHERING’ ह्या काव्यसंग्रहांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि त्यामुळे फडकेंच्या प्रारंभीच्या कादंबऱ्यांमधील रोमँटिक, प्रणयप्रसंग आणि निसर्गवर्णने ही टागोरांच्या कवितांमधील प्रतिमांशी मिळतीजुळती आहेत.

मराठी कवितांवर असलेला प्रभाव

कवी ‘बी’ (नारायण मुरलीधर गुप्ते) यांच्या कवितांमध्ये आढळणारा गूढवाद आणि टागोरांच्या ‘गीतांजली’मधील अध्यात्म ह्यामध्ये विलक्षण साम्य आहे. निसर्ग हा केवळ स्थिर घटक म्हणून हे दोन्ही साहित्यिक त्याकडे पाहात नाहीत तर ईश्वराचे चैतन्यमयी जिवंत रूप म्हणून ते त्याकडे पाहातात आणि त्यातील गूढतेचा शोध घेतात. ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ हे गीत या निसर्गतत्वाचे उत्तम उदाहरण आहे. टागोरांच्या कवितेत आत्मा हा ईश्वरभेटीसाठी आसुसलेला असतो, त्याचप्रमाणे विरह आणि भेटीची ओढ ही तत्त्वे कवी ‘बी’ ह्यांच्या ‘पिंगा’ या कवितेतही दिसतात. कुसुमाग्रजांच्या ‘बळी’ आणि ‘कणा’ सारख्या कवितांमागच्या मानवतावादी प्रेरणा या टागोरांच्या साहित्यातून आल्या आहेत, असेही काही समिक्षकांना वाटते.

Tagore's Gitanjali
Gitanjali

भाषांतर युग

१९ व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा शिक्षणाचा प्रसार वेगात झाला आणि अभ्यास यंत्रणा (भाषांतरित पाठ्यपुस्तके) तयार करण्यात आली त्या दरम्यान मराठी साहित्यामध्ये मोठ्या संख्येने प्रामुख्याने इंग्रजी आणि बंगाली साहित्य भाषांतरित करण्यात आले. केवळ व्यवहारापुरते केलेले भाषांतर नंतर साहित्य विकासासाठी किती अमूल्य आहे हे कळल्यानंतर मराठी साहित्यात जणू भाषांतरित वाङ्मयाची लाटच आली. या काळाला भाषांतर युग असेही म्हणतात.

बंगाली भाषांतरित साहित्याचा प्रभाव

टागोरांच्या साहित्यातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे ‘गोरा’ ही कादंबरी, तिचा तेवढ्याच तोडीचा अनुवाद पु. ल. देशपांडेंनी केला आहे. त्याचप्रमाणे, टागोरांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा असलेला ‘साधना’ हा ग्रंथ आणि त्यांच्या अनेक कथा साने गुरुजींनी मराठीत आणल्या.

मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले

‘गीतांजली’मुळे टागोरांना जागतिक कीर्ती मिळाली, तिचे अनेक अनुवाद झाले. निसर्गप्रेम आणि ईश्वरी भक्ती व्यक्त करणारी टागोरांची काव्यशैली मराठी कवींनाही प्रेरणा देणारी ठरली. कथा साहित्यामध्ये ‘काबुलीवाला’, ‘पोस्टमास्तर’ आणि ‘क्षुधित पाषाण’ यांसारख्या कथांनी मराठी कथाविश्वात मानवी नातेसंबंधांचे एक नवीन परिमाण निर्माण केले. त्यांच्या ‘डाकघर’ सारख्या प्रतिकात्मक नाटकाने मराठी नाट्यप्रेमींना एक वेगळ्या तरलतेचा अनुभव दिला. मामा वरेरकर आणि शांता शेळके यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी टागोरांच्या विविध कथा आणि कवितांचे अनुवाद करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.

आजही टागोरांचे साहित्य मराठी वाचकांसाठी प्रेरणादायी

रवींद्रनाथ टागोर हे केवळ एका प्रांताचे किंवा भाषेचे कवी नव्हते, तर ते मानवी भावनेचे जागतिक भाष्यकार होते. मराठी साहित्याने त्यांच्या साहित्याला केवळ अनुवाद म्हणून स्वीकारले नाही, तर त्यातील विचार आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झाला. पु. ल. देशपांडे साने गुरुजी आणि मामा वरेरकर सारख्या दिग्गजांनी हा वैचारिक सेतू इतका भक्कम बांधला आहे की, आजही टागोरांचे साहित्य मराठी वाचकांसाठी तितकेच ताजे आणि प्रेरणादायी ठरावे.