Rahul Gandhi Detention During Jantar Mantar Protest : मंगळवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आज पुन्हा विरोधकांच्या आंदोलनामुळे दिल्ली दणाणली. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी खासदारांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनादरम्यान विरोधकांनी एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरुन आवाज उठवला आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले होते.
राहुल गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारीही त्यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात सुमारे साडेसहा तास आंदोलन केले होते. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या बळाला न जुमानता आकाशवाणी भवनच्या परिसरात प्रवेश केला. याप्रकरणी त्यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही राहुल गांधींनी आज पुन्हा ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
२ ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतरमंतर परिसरात तरुण विद्यार्थ्यांसह विरोधी नेत्यांचे आंदोलन सुरु आहे. ॲडव्होकेट प्रशांत भूषण आणि AISAच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांच्यासह विरोधी खासदारांनीही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या पार्श्वभूमीवर ‘ताब्यात घेणे’ आणि ‘अटक’ या दोन्ही कारवायांमध्ये नेमका काय फरक आहे? एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे पोलिसांना कोणते अधिकार असतात तसेच अटकेतील व्यक्तींनाही कायद्यार्तंगत काही अधिकार असतात का? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
ताब्यात घेणे आणि अटक करणे यात नेमका फरक काय?
आंदोलन किंवा निदर्शनांच्या वेळी पोलिसांकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. त्यासाठी परिस्थितीनुसार पोलीस एखाद्या व्यक्तीला काही काळासाठी ताब्यात घेऊ शकतात. प्रत्यक्ष व्यवहारात ‘डिटेन्शन’ आणि ‘अटक’ हे शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात. मात्र, कायद्याच्या दृष्टीने दोन्ही कारवायांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.
एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास पोलिसांनी तिला औपचारिकपणे ताब्यात घेतले ती ‘अटक’ असते. अटक झाल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात फौजदारी कार्यवाही सुरू होते. एखाद्या व्यक्तीला एकदा अटक केली की, तिला संविधानाने आणि कायद्याने दिलेली सर्व हक्क आणि संरक्षण तात्काळ लागू होतात.
BNSSमध्ये ‘डिटेन्शन’साठी स्वतंत्र अशी कायदेशीर व्याख्या केलेली नाही. मात्र, विशिष्ट परिस्थितीत पोलिसांना लोकांना रोखणे, आंदोलनाच्या ठिकाणाहून हटवणे किंवा काही काळ ताब्यात ठेवण्याचे अधिकार असतात. विशेषतः कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असेल, तर पोलीस या प्रतिबंधात्मक अधिकारांचा वापर करू शकतात.
आंदोलनांच्या वेळी याच मुद्द्यावरून अनेकदा वाद निर्माण होतो. पोलीस एखाद्या आंदोलकाला ताब्यात घेतात, त्याला काही तास पोलीस कोठडीत किंवा अन्य ठिकाणी ठेवतात आणि नंतर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देतात. अशावेळी संबंधित व्यक्तीला आपल्याला अटक झाल्यासारखे वाटणे साहजिक आहे. मात्र, पोलीस या कारवाईकडे एखाद्या गुन्ह्यातील अटक म्हणून नाही तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पाहतात.
म्हणूनच एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे म्हणजे तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे किंवा तिला अटक झाली आहे, असा सरळ अर्थ काढता येत नाही. पुढे काय कारवाई काय झाली, यावर त्याचे स्वरूप ठरते.
ॲडव्होकेट सौतिक बॅनर्जी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना डिटेन्शनसंदर्भातील कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले, अटकेनंतरच्या कायदेशीर प्रक्रियेतील किचकटपणा टाळण्यासाठी पोलीस अनेकदा ‘अटके’ ऐवजी आंदोलकांना तात्पुरते ताब्यात घेतात. त्यांच्या मते, जेव्हा आंदोलकांकडून सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असणारा कोणताही गंभीर किंवा दखलपात्र गुन्हा घडलेला नसतो, तेव्हा त्यांना सहजासहजी अटक करता येत नाही, याची पोलिसांना पूर्ण कल्पना असते. जर पोलिसांनी त्यांना थेट अटक केली, तर न्यायालय पोलिसांना जाब विचारु शकते. म्हणूनच पोलीस आंदोलकांना अटक करण्याऐवजी त्यांना काही तासांसाठी ताब्यात घेतात आणि नंतर सोडून देतात. ‘दखलपात्र गुन्हा’ म्हणजे असा गुन्हा, ज्यामध्ये पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.
बीएनएसएसमधील कलम १७०
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १७० अंतर्गत पोलिसांना कोणताही दखलपात्र गुन्हा घडण्याआधी तो रोखण्यासाठी थेट कारवाई करण्याचा अधिकार असतो.
जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या कटाची माहिती मिळते तेव्हा किंवा त्याला तात्काळ ताब्यात घेतल्याशिवाय तो गुन्हा रोखणे शक्यच नाही, तर जेव्हा पोलिसांना वाटते तेव्हा ते कट रचणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतात. यासाठी अधिकारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (Magistrate) आदेशाची किंवा वॉरंटची गरज नसते, ते त्यांना थेट ताब्यात घेऊ शकतात.
बीएनएसएसमधील कलम १७२
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १७२ नुसार, कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, त्याला विरोध करणाऱ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पोलीस ताब्यात घेऊ शकतात (Detain) किंवा तेथून हटवू शकतात.
त्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर (Magistrate) हजर करणे आवश्यक असते. जर प्रकरण किरकोळ स्वरूपाचे असेल, तर त्या व्यक्तीला २४ तासांच्या आत सोडणे पोलिसांना बंधनकारक असते.
कलम १७२ ची कारवाई ही प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारख्या (NSA) विशेष कायद्यांअंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. याअंंतर्गत कोणत्याही खटल्याशिवाय व्यक्तीला दीर्घकाळासाठी कोठडीत ठेवण्याला कायदेशीर मान्यता आहे. मात्र, कलम १७२ अंतर्गत येणारी डिटेन्शनच्या कारवाईत कायदेशीर प्रक्रिया पाळणे बंधनकारक असते.
