Rahul Gandhi Manusmriti: गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी तरुणींच्या एका सभेसमोर मनुस्मृतीतल्या नवव्या अध्यायातल्या तिसऱ्या श्लोकाचा उल्लेख केला. या श्लोकात म्हटल्यानुसार, स्त्री प्रौढ झाल्यानंतर तिचा विवाह होतो आणि ती आधी पतीच्या आणि मग मुलाच्या नियंत्रणाखाली राहते. राहुल गांधी यांनी या श्लोकाला स्त्रीविरोधी तसंच स्त्रियांचा अपमान करणारा ठरवत उपस्थित तरुणींना पितृसत्ताक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित स्त्री वर्गाने जोरदार प्रतिसाद दिला. त्यावर उलटसुलट चर्चाही झाली. हे तर खरंच की, हिंदू धर्माचा कोणताही समर्थक स्वतःची नैतिक विश्वासार्हता गमावल्याशिवाय या श्लोकाचं समर्थन करू शकणार नाही. मात्र, या टीकेतली नेमकी अडचणही हीच आहे, की ती योग्य आहे, पण अतिशय वरवरची आहे आणि एका अर्थी उथळही!
पितृसत्ताक व्यवस्था हा मनूचा शोध?
पितृसत्ताक व्यवस्था हा काही एकट्या मनुस्मृतीचा शोध नाही. त्यावर मनूची मक्तेदारीही नाही. जवळपास सर्वच धार्मिक ग्रंथांचं स्वरूपच असं आहे की, हे ग्रंथ पितृसत्ताक व्यवस्थेचं अनुसरण करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर, ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल यांनी लिहिलं आहे की, ज्याप्रमाणे चर्च हे ख्रिस्ताच्या अधीन असतं, त्याचप्रमाणे पत्नीने पतीच्या अधीन राहिलं पाहिजे. इस्लामी कायदेव्यवस्थेत वारसाहक्क आणि साक्षीच्या बाबतीत स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी अधिकार दिले जातात. त्यामुळे लहान मुलींनी हिजाब परिधान करणे ही त्यांची ‘स्वेच्छा’ आहे, असं केवळ डाव्या उदारमतवादी स्त्रीवाद्यांनाच वाटू शकतं. बौद्ध धर्मग्रंथांमधल्या विनयपिटकातही भिक्षुणींसाठी आठ ‘गुरुधम्म’ सांगितले आहेत. या नियमांनुसार सर्वांत ज्येष्ठ भिक्षुणीलाही अगदी नव्याने दीक्षा घेतलेल्या भिक्षूपेक्षा कनिष्ठ स्थान दिलं जातं. भिक्षू आणि भिक्षुणी यांना एकाच दिवशी दीक्षा मिळाली असली, तरीही हा भेद कायम राहतो. पितृसत्ताक व्यवस्थेचं हे सार्वत्रिक वर्चस्व नाही तर काय आहे?
सारेच धर्म एकाच माळेचे मणी?
स्त्रियांचा मुक्त वावर हा पुरुषांच्या शिस्तीला, मनोनिग्रहाला, ब्रम्हचर्य पालनाला इतका मोठा धोका मानला गेला आहे की, भारतीय उपखंडातल्या हिंदू, जैन आणि बौद्ध अशा सर्वच संन्यासी परंपरांनी त्यासंदर्भात कठोर नियम तयार केले आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेचा दुष्प्रभाव सर्वच धर्मग्रंथांवर पडलेला आहे. अशा परिस्थितीत केवळ मनुस्मृतीविरोधात संताप व्यक्त करणं ही काही फार मोठी कौतुक करावी अशी गोष्ट नाही. आधीच मारलेल्या कोंबड्याला आग दाखवण्यासारखा हा प्रकार निरर्थक आहे. एखादा हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी मनूची मूळ शिकवण आणि ‘सनातन लॉबी’ स्वतःच्या फायद्यासाठी मनूच्या नावाने जे नियम लोकांवर लादण्याचा प्रयत्न करते, या दोघांमधील फरकाचा (विरोधाभासाचा) राजकीय फायदा घेऊ शकतो.

समलैंगिकतेबाबत मनुस्मृती काय सांगते?
समलैंगिकता हा आज एका वर्गासाठी तिरस्काराचा आणि एका वर्गासाठी लिजिटिमेट आयडेंटिटीचा विषय ठरलेला आहे. टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मनुस्मृतीत समलैंगिक संबंधांना नियमभंगाच्या वर्गवारीत ढकललेलं असलं तरीही त्यासाठी सांगितलेली शिक्षा अंगावर कपडे घालून एखाद्याने अंघोळ करावी इतकी सौम्य आहे. याउलट, इतर काही धर्मग्रंथांनी अशाच कृत्यासाठी थेट मृत्युदंडाची शिक्षा सांगितली आहे. यात शरियत कायद्यातल्या समलैंगिकताविरोधी कट्टर भूमिकेची चर्चा सर्वत्र होते; मात्र बौद्ध मठांमधल्या नियमावलीत आढळणाऱ्या समलैंगिकताविरोधी तरतुदींकडे फारसं कोणी लक्ष देत नाही आणि इतरांचं लक्ष वेधतही नाही.
सौम्य मनू कठोर कुठे होतो ?
गंमत म्हणजे, इतर अनेक धार्मिक परंपरांशी मनुस्मृतीची तुलना करून पाहिली तर कोणाचे कोणाशी लैंगिक संबंध आहेत याबाबत मनूची भूमिका जवळजवळ उदासीन आहे,असं जाणवल्यावाचून राहात नाही. जोपर्यंत जातीय मर्यादांचं उल्लंघन होत नाही, तोपर्यंत त्याला फारशी चिंताही दिसत नाही. लैंगिक संबंधांपेक्षा जातिव्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन हा मनुस्मृतीच्या दृष्टीने अधिक गंभीर आणि दंडनीय विषय आहे.अशा परिस्थितीत,समलैंगिक आणि इतर लैंगिक अल्पसंख्याकांबद्दल तथाकथित सनातन समर्थकांकडून व्यक्त होणारी घृणा आणि तुच्छता ही मनूच्या शिकवणीशी तरी कितपत सुसंगत आहे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
पितरांना मासे, बकरा, गेंडा… मनुस्मृती काय म्हणते ?
मनुस्मृतीच्या तिसऱ्या अध्यायात पितरांना अर्पण केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या मांसामुळे ते किती काळ तृप्त राहतात याविषयीचं वर्णन आलं आहे.उदाहरणार्थ, मासे अर्पण केल्याने दोन महिने, बकऱ्याचे मांस अर्पण केल्याने सहा महिने आणि गेंड्याचं मांस अर्पण केल्याने बारा वर्षे पितर तृप्त राहतात,असं त्यात सांगितलं आहे. ही संपूर्ण धार्मिक विधि व्यवस्था प्राण्यांच्या बळीवर आधारलेली आहे. तेव्हा सनातन धर्माच्या नावाखाली मांसाहारी नैवेद्याची परंपरा बंद करून त्याऐवजी शाकाहारी नैवेद्य सुरू करणारे मंदिरांचे विश्वस्त आणि दुर्गापूजा समित्या प्रत्यक्षात मूळ परंपरेचंच विकृतीकरण करत नाहीत का, हा इथे अडचणीत टाकणारा मुद्दा आहे.
सात्विकतेची व्याख्या काय ?
अलीकडे शाकाहारी म्हणजे श्रेष्ठ काहीतरी पवित्र आणि सात्विक मानलं जाऊ लागलं आहे. मनूच्या दृष्टिकोनातून ‘सात्त्विक’ या संकल्पनेचा अन्नाशी काहीही संबंध नाही. असलाच तर तिचा संबंध माणसाची मनोवृत्ती आणि पुनर्जन्म यांच्याशी आहे. सात्विकता म्हणजे संयम, ज्ञान, विवेक, पवित्रता, इंद्रियांवर नियंत्रण आणि कर्तव्यांचं पालन यांसारखे गुण आहेत. राजस प्रवृत्ती म्हणजे चंचलता,अस्थैर्य आणि भ्रष्टाचाराने संपत्ती मिळवण्याची लालसा. तर तामसी प्रवृत्तीचा उगम लोभ,अतिनिद्रा,चिकाटीचा अभाव आणि क्रूरता यांतून होतो असं मनूने सांगून ठेवलं आहे. आपल्याकडे नास्तिकता, अस्थिरता, निष्काळजीपणा आणि भीक मागणे यांचाही संबंध तामसी प्रवृत्तीशी जोडला जातो. मुळात, मनूला आपण काय खातो या पेक्षा आपण आयुष्यात कशाचा पाठपुरावा करतो यामध्ये अधिक रस आहे.ते पाहता, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अहोरात्र हपापलेला, निधीचा गैरवापर करणारा, बोलण्यात आणि वागण्यात विसंगती असणारा आणि स्वतःच्या नैतिक श्रेष्ठत्वाचा कायम टेंभा मिरवणारा कोणी तथाकथित सनातन धर्मप्रचारक नरपुंगव मनूने रुजवलेल्या सात्त्विकतेच्या संकल्पनेपासून किती दूर आहे, हे वेगळं सांगण्याची खरंच गरज आहे का ?
वृक्षवल्ली मनू सोयरी ?
मनुस्मृतीतल्या पहिल्या अध्यायातील ४९व्या श्लोकानुसार,वनस्पतींमध्ये चेतना असते आणि त्यांनाही सुख-दुःखाची जाणीव होते. मनूने अकराव्या अध्यायात कोणत्याही योग्य कारणाशिवाय वनस्पतींचा नाश केल्यास त्यासाठी प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता सांगितली आहे. इथे सनातन धर्म काय सांगतो, हे पुरेसं स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत खासगी उद्योगांसाठी राखीव ठेवलं जाणारं प्रत्येक जंगल,खासगी रिसॉर्ट किंवा प्राणिसंग्रहालयासाठी उद्ध्वस्त केलं जाणारं प्रत्येक शांत आणि निसर्गरम्य अभयारण्य हे मनूच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधातच जातं आहे. सनातन धर्माचं रक्षण करण्याचा दावा करणाऱ्या सरकारने अशा प्रकारे निसर्गाचा विध्वंस करणं म्हणजे मनूच्या विचारांचा आधुनिक अर्थ लावणं नव्हे, तर त्या विचारांचं सरळसरळ उल्लंघन करणं आहे.
कोणी वाचलीय मनुस्मृती?
थोडक्यात काय, तर हिंदू धर्माचे तथाकथित रक्षणकर्ते संस्कृती-परंपरेच्या नावाखाली जे मोठमोठे दावे करतात, त्यांना त्यांच्याच भूमिकेच्या आधारे आव्हान देण्यासाठी मनुस्मृतीत भरपूर संदर्भ उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी मनुस्मृतीच्या केवळ नवव्या अध्यायापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण ग्रंथाचं वाचन आणि अध्ययन करणं आवश्यक आहे. राहुल गांधी असोत किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा आणखी कोणी समर्थक-विरोधक यांचे मनुस्मृतीला धरून असलेले दावे-प्रतिदावे, डाव-प्रतिडाव, हल्ले-प्रतिहल्ले पाहता यापैकी कोणीही मनुस्मृती प्रत्यक्षात वाचलेली नाही, हे स्पष्टपणे दिसतंय. यात अर्थपूर्ण चर्चेपेक्षा निरर्थक गलबलाच अधिक होताना दिसतोय.
