रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तीन दिवसात चार वेळा अनेक शहरामध्ये पुराचे पाणी शिरले होते. ज्यामुळे जीवितहानी तर झालीच पण वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली. रस्ते वाहतूक कोलमडली. दरडीही कोसळल्या. सतत पूर येण्यामागची आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाच्या कारणांचा थोडक्यात आढावा.

पुराचा फटका कुठे बसला?

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांना पूर आले. अंबा कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा नद्यांना पूर आला होता. ज्यामुळे नागोठणे, रोहा, महाड, खोपोली, रसायनी, पाली, तसेच पेणच्या ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली. चार दिवसात काही शहरांना तीन वेळा पुराचा तडाखा बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठा आणि सखल भागातील २८० गावातील ४  हजार ९९३ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. ८३८ घरांची पडझड झाली. त्यामुळे व्यापारी आणि रहिवाश्यांचे मोठे नुकसान झाले. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. उच्चदाब वाहिनीचे १११, लघुदाब वाहिनीचे १९५ विजेचे खांबही पडले. ४१ रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बिघडली. जवळपास सव्वा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.

पूर येण्यामागची कारणे कोणती?

जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १ हजार २०६ मिलीमीटर पाऊस पडतो. पण यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांतच सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सलग सहा दिवस १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. तर दोन दिवस २०० मिलीमीटरहून अधिकच्या सरासरीने पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर, पोलादपूर, माथेरान, लोणावळा, मुळशी आणि रायगड खोऱ्यातील घाटमाथ्यावरील परिसरात कमी वेळात अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांची पूरस्थिती उद्भवली. कोकणातील नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे नदी पात्रे उथळ बनली आहेत. या कारणामुळेही कोकणात नद्यांना पूर येण्याचे प्रमाण अधिक आहे. भरतीच्या वेळेत मोठा पाऊस झाला तर नद्यांच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होत नाही. नद्यांना नैसर्गिक फुगवटा तयार होतो आणि पूर येतो.   

 जीवित आणि वित्तहानी किती?

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यात आठ दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला. ३३ जनावरे दगावली. पोल्ट्रीत पाणी शिरल्याने चार हजार कोंबड्या दगावल्या, २३२ सार्वजनिक मालमत्तांची पडझड झाली. महावितरणचे २ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले. महाड, रोहा, पाताळगंगा औद्योगिक वसाहतींनाही पुराचा तडाखा बसला. पाताळगंगा एमआयडीसीतील एचपीसीएल प्रकल्पातून ३ हजार गॅस सिलिंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले. २२ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले.  २८ गावांमधील पावणेदोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे आणि तांबडशेत परिसरातील गणेशमूर्ती व्यवसायाला पुराचा मोठा तडाखा बसला, साडेचारशे गणेशमूर्ती कार्यशाळांतील हजारो गणेशमूर्ती वाहून गेल्या किंवा भिजल्या.  

रस्ते वाहतुकीवर किती परिणाम झाला?

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीवर झाला. त्यामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडल्या होत्या. जिल्ह्यात ५५ ठिकाणी दरडी कोसळल्या, यामुळे रस्ते वाहतूक पूर्णतः कोलमडली होती. मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंड आणि वाकण फाटा दरम्यान पावसाचे पाणी आल्याने, महामार्गावरील वाहतुक तब्बल ४० तास बंद होती. कशेडी घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी आणि रायगड दरम्यानची महामार्गावरील वाहतूक बाधित झाली होती. मुंबई-पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे जुना महामार्ग यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला. दोन्ही महामार्गांवरील वाहतूक पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात महामार्गावर आल्याने काही काळ बंद करावी लागली होती. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करावी लागली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारो तीन मार्ग बंद झाले. अंबेनळी घाट, वरंधा घाट येथे दरड कोसळल्याने, तर ताम्हिणी घाट खचल्याने वाहतुकीसाठी बंद करावा लागला. पाली-खोपोली महामार्गही पूरस्थितीमुळे बंद होता. एकूणच अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. कोकण रेल्वे सुरळीत होती. मात्र खोपोली कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली होती.

दरडी कोसळण्याची कारणे कोणती?

रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात ५५ ठिकाणी दरडी कोसळल्या, सुदैवाने यावर्षी यात मोठी जीवितहानी झाली नाही. कोकणात दरडी कोसळण्याची चार प्रमुख कारणे आहेत. हा प्रदेश पर्वतमय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. येथील खडकांची रचना दरडी कोसळण्यास सहाय्यभूत ठरते. आणि हा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. याशिवाय येथील रेल्वे आणि महामार्ग हे प्रामुख्याने घाट माथ्यावरून जातात. त्यासाठी ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातात. त्यामुळे डोंगर माथ्यावरील सैल झालेली दगडमाती पावसामुळे खाली सरकते. वृक्षतोड आणि जंगलांना लावले जाणारे वणवे हेदेखील दरडी कोसळण्यामागचे कारण असते.

उपाययोजना कोणत्या?

नदी पात्रातील गाळ काढणे, शहरालगतच्या परिसरात नदी पात्रालगत संरक्षक भिंतीची उभारणी करणे, घाट माथ्यावरील रस्त्यांवर गॅबियन वॉल्स आणि संरक्षक भिंतींची उभारणी करणे, डोंगरावरील वनसंपदेचे संरक्षण करून, तिथे वृक्ष लागवड करणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे असे काही उपाय करता येऊ शकतात.

harshad.kashalkar@expressindia.com