इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे. बुधवारी, २४ मे रोजी झालेल्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्याने या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पहिला क्वॉलिफायर सामना जिंकून गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर, आज लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर लढत होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळणार असल्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची कसून तयारी सुरू आहे. शिवाय दोन्ही संघांचे चाहतेही हा सामना बघण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, खेळाडूंची तयारी आणि चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

क्वॉलिफायर १ आणि एलिमिनेटर सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. पश्चिम बंगालमधील सध्याचे हवामान या सामन्यांमध्ये खलनायकाची भूमिका पार पाडू शकते. हवामान विभागाचे अहवाल क्रीडाप्रेमींसाठी चांगले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये ‘कालबैशाख’ काळ सुरू आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलकात्यात होणाऱ्या सामन्यांवर पावसाचे सावट आहे. कोलकात्यामध्ये होणाऱ्या प्ले ऑफमधील दोन सामन्यांपैकी पहिला सामना काल निर्विघ्न पार पडला. मात्र, आज होणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर लढतीवर पावसाचे सावट कायम आहे.

जर लखनऊ आणि बंगळुरूच्या समान्यात पाऊस आला तर दोन्ही संघाच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. कारण, प्ले ऑफमधील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पूर्ण २०-२० षटकांचा सामना होण्याची शक्यता नसल्यास, षटकांची संख्या कमी करण्यात येईल. अशा वेळी दोन्ही संघाच्या फलंदाजीतील जास्तीतजास्त पाच-पाच षटके कमी करता येतील. तरीही परिस्थिती अनुकुल नसेल तर मग सुपर ओव्हर खेळूनच विजेता ठरवला जाईल. सामन्यात सुपर ओव्हर होणे शक्य नसेल, तर ज्या संघाचे साखळी सामन्यांतील गुण जास्त आहेत तो संघ पुढे जाईल. असे झाल्यास बंगळुरूच्या संघाला फटका बसेल. हा नियम क्वॉलिफायर १, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर २ या तीन्ही सामन्यांसाठी लागू आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी मात्र एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २९ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात पाऊस आल्यास खेळ थांबवला जाईल आणि राहिलेला खेळ दुसऱ्या दिवशी सुरू होईल. म्हणजेच जर अंतिम सामन्यात पाऊस आलाच तर ३० मे रोजी सामना होईल.