Ayodhya Ram Temple latest news 2025: अयोध्येतील राम मंदिरात याच महिन्यात आणखी एक प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यात राजा रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र, या खेपेस झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अधिक साधा आणि पारंपरिक स्वरूपाचा होता.
गेल्यावर्षी बालरूपातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तर यावेळी रामदरबार म्हणजेच पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांच्या सान्निध्यातील राजा रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
भारतातील अनेक घरांमध्ये रामदरबाराचे पूजन केले जाते, पण संपूर्ण भारतात एकच असे मंदिर आहे जिथे रामाची पूजा राजाच्या रूपात केली जाते. हे मंदिर कोणते? आणि रामाच्या आणखी कोणकोणत्या रूपांची पूजा केली जाते? याचाच घेतलेला हा आढावा.
दुसऱ्या प्राणप्रतिष्ठेचे कारण काय?
- एखाद्या देवतेच्या मूर्तीची विधिपूर्वक स्थापना केली जाते. त्या विधीला प्राणप्रतिष्ठा असे म्हणतात, त्यामुळे ती मूर्ती पूजनासाठी वैध ठरते. भक्त प्राणप्रतिष्ठा झालेल्या त्या मूर्तीचीच पूजा करतात. अयोध्या ही भगवान रामाची जन्मभूमी तर आहेच, पण त्याचे राज्यही होते. म्हणून अयोध्येतील मंदिरात रामाच्या दोन्ही रूपांमध्ये पूजन केले जाते.
- रामलल्ला म्हणजेच बालरूपातील राम, त्याची पूजा वात्सल्य भावनेने केली जाते. बालराम हा निष्कलंक, निरागसता आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो. राजा रामाची पूजा धर्म, न्याय आणि शांतीचे प्रतीक म्हणून केली जाते. रामराज्य हे हिंदू परंपरेत आदर्श राज्यव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते. या राज्यात प्रजा सुखी असते आणि राज्यकारभार न्याय्य व पारदर्शक असतो.
- विशेष म्हणजे, भारतातील ज्या एकमेव मंदिरात रामाची राजाच्या रूपात पूजा केली जाते, तिथे त्याला केवळ अयोध्येचा राजा म्हणून नव्हे, तर त्याहूनही अधिक व्यापक अर्थाने पूजले जाते.
रामराजा मंदिर, ओर्च्छा
मध्यप्रदेशातील ओरछा येथील रामाच्या मंदिरात श्री रामाची पूजा राजाच्या रूपात केली जाते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा विधी काशीचे आचार्य जयप्रकाश त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडला. त्रिपाठी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा ही राम दरबाराची होती. या दरबारात प्रभू रामांबरोबर सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचाही समावेश असतो. रामदरबारातील प्रभूरामाचे स्वरूप हे कुटुंबवत्सल आणि राजा अशी दोन्ही रूपे दर्शविणारे आहे. मात्र, संपूर्ण भारतात रामाचे एकच मंदिर आहे, जिथे प्रभू रामाची केवळ राजाच्या रूपात उपासना केली जाते. ते म्हणजे मध्यप्रदेशमधील ओरछा येथील रामाचे मंदिर.

ओर्च्छा मंदिराचा इतिहास
- हे मंदिर १५५४ ते १५९२ या कालखंडात बुंदेला राजवंशाचे शासक मधुकर शाह यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. या मंदिराशी संबंधित एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
- मधुकर शाह हे भगवान कृष्णाचे भक्त होते, तर त्यांची पत्नी राणी गणेशकुंवारी ही रामाची भक्त होती. एकदा राजाने राणीला आपल्या बरोबर ब्रज- मथुरा येथे येण्याचा आग्रह केला. पण, त्याच वेळी गणेशकुंवारी हीला स्वप्नात रामाने दर्शन दिले आणि अयोध्येत येऊन मंदिर उभारण्याचे आदेश दिले. राणीचा आग्रह पाहून रागावलेल्या मधुकर शाहाने सांगितले की, “तू अयोध्येला जाऊ शकतेस, पण परत यायचं असेल तर तुझ्या रामालाच घेऊन ये.” हीच कथा पुढे ओरछाच्या रामराजा मंदिराच्या निर्मितीचं कारण ठरली…
राणीची अयोध्यायात्रा आणि रामराजा मंदिराची स्थापना
राणी गणेशकुंवारी अयोध्येला गेली आणि अनेक महिने कठोर तप करून प्रभू श्रीरामाची मनोभावे उपासना केली.
मात्र, प्रभू रामाचे दर्शन न झाल्यामुळे राणी निराश होऊन शरयू नदीत उडी घेऊन आत्मसमर्पण करण्यास निघाली. त्याच क्षणी तिच्या हातात रामाची एक मूर्ती प्रकट झाली. प्रभू राम राणीबरोबर ओर्च्छाला जाण्यास तयार झाले, पण त्यांनी काही अटी घातल्या;
- रामाची पूजा ओरछामध्ये “राजा” म्हणूनच होईल, देव म्हणून नाही.
- ते फक्त पुष्य नक्षत्रातच प्रवास करतील.
- ज्या ठिकाणी ती मूर्ती प्रथम ठेवली जाईल, तेच ठिकाण त्यांचे कायमचे निवासस्थान असेल.
राणीने त्या सर्व अटी मान्य केल्या. ही बातमी ऐकून राजा मधुकर शाह आनंदित झाले आणि रामाच्या मूर्तीसाठी चतुर्भुज मंदिर बांधण्याचे आदेश दिले. राणी मूर्ती घेऊन परत आली आणि तीने मूर्ती एका रात्रीसाठी आपल्या महालात ठेवली आणि दुसऱ्या दिवशी चतुर्भुज मंदिरात नेण्याचा विचार केला. परंतु, मूर्ती जागची हललीच नाही! प्रभू रामांनी तिसरी अट पाळली. त्यामुळे ज्या महालात राणी राहत होती, तोच महाल पुढे राजा रामाचे मंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला. चतुर्भुज मंदिर आजही त्याच्या शेजारी उभे आहे. ते मंदिर आता भगवान विष्णूंचे आहे.
रामराजा मंदिराचे वैशिष्ट्य
- राजा रामाच्या मंदिरावर सामान्य मंदिरांप्रमाणे शिखर (गर्भगृहावरील उंच शिखर) नाही. त्याऐवजी येथे महालासारख्या घुमटदार छत्र्या आणि कमानी आहेत. यामुळेच आजही ते मंदिर राजमहालाप्रमाणेच वाटते.
- राम इथे “राजा” म्हणून वास करतो, त्यामुळेच…
- मध्य प्रदेश पोलिसांचे चार जवान मंदिराच्या सुरक्षा दलात नियुक्त असतात, मंदिरात होणाऱ्या आरतीला लष्करी बाज असतो. ढोल, ताशा आणि बंदुकींची सलामी पूजेप्रसंगी दिली जाते.
- मंदिरात येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत बीरा (पान-सुपारी) आणि अत्तराने केले जाते. राजवाड्यातील प्रथा आजही येथे पाळल्या जातात.
- इतर मंदिरांप्रमाणे येथे प्रसाद म्हणून मिठाई दिली जात नाही, कारण येथे देव नव्हे तर राजाला पूजले जाते.
- टिकमगढ जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी अविनाश पाठक यांनी The Indian Express ला सांगितले की, “राम इथे राजा आहे म्हणून त्यांना आजही राजाश्रय आणि दरबारी सन्मान दिला जातो.”
रामाची विविध रूपे
- रामलल्ला – बालराम; निरागसता आणि वात्सल्याचे प्रतीक.
- राजाराम– अयोध्येचा न्यायप्रिय व आदर्श राजा; रामराज्याचे प्रतीक.
- कोदंडधारी राम – धनुष्य आणि बाण घेऊन युद्धासाठी सज्ज योद्धा राम; विशेषतः दक्षिण भारतात पूजला जातो.
प्रत्येक रूपामध्ये भक्तांचा भाव वेगळा असतो. कोठे वात्सल्य, कोठे न्याय, तर कोठे शौर्य आणि वीरता. या विविध रूपांतून प्रभू राम धर्म, कर्तव्य आणि मर्यादा यांचे आदर्श स्वरूप ठरतात.