ज्यांच्या चित्रांनी १९ व्या शतकात भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात क्रांती घडवली, ते आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक म्हणजे राजा रविवर्मा. राजा रविवर्मांनी काढलेलं ‘कृष्ण-यशोदा’ हे चित्र सॅफ्रन आर्ट या संस्थेच्या लिलावात त्याच्या किमतीमुळे सध्या चर्चेत आलंय. लिलावात हे चित्र तब्बल १६७.२० कोटी रुपयांना विकलं गेलं. सर्वाधिक किमतीत विकल्या गेलेल्या चित्रांच्या यादीत हा नवीन विक्रम आता प्रस्थापित झाला आहे. भारतीय देवी-देवतांना मानवी रूप देणारे राजा रविवर्मा हे पहिले भारतीय चित्रकार. त्यांनी भारतातील राजघराण्यांसाठी अनेक चित्रं काढली. इतकेच नव्हे, तर स्वतःची चित्रं सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावीत यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. जाणून घेऊयात याच राजा रविवर्मांची गोष्ट.

राजा रविवर्मांचा जन्म एप्रिल १८४८ मध्ये केरळमधील किलिमनूरस्थित त्रावणकोरच्या राजघराण्याशी संबंधित एका कुटुंबात झाला. बालवयातच ते झाडाच्या पानांचा वापर करून बनवलेल्या नैसर्गिक रंगांनी प्राण्यांची, माणसांची चित्रं काढायचे.

ही बाब त्यांचे काका राजा राजवर्मा यांच्या पहिल्यांदा लक्षात आली. त्रावणकोरचे राजा अयिलयम थिरूना यांच्या आश्रयाखालील रामस्वामी नायडू या राजचित्रकाराकडे त्यांनी जलरंगांचा वापर करून चित्र काढण्याचे प्रशिक्षण घेतले. नंतर डच चित्रकार थिओडोर जेन्सन यांच्याकडून त्यांनी तैलचित्राचे प्रशिक्षण घेतले.

शाही चित्रकार – राजा रविवर्मा

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात वर्मांच्या चित्रांची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या काळातील अमीर-उमरावांची बरीचशी चित्रं काढण्याची कामं वर्मांवर सोपवण्यात आली. वर्मांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या चित्रांची मागणीही वाढली. त्यामुळे किलीमनूरच्या राजवाड्यात चक्क एक पोस्ट ऑफिसच उघडावं लागलं होतं. चित्रं काढण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी संपूर्ण भारत पिंजून काढला.

त्यांच्या अनेक आश्रयदात्यांपैकी एक होते बडोदा संस्थानचे राजें महाराज सयाजीराव गायकवाड. सयाजीरावांच्या मागणीवरून बडोद्यातील न्यू लक्ष्मी-विलास पॅलेसच्या दरबार हॉलसाठी पौराणिक कथानकांवर आधारित १४ चित्रं त्यांनी काढली. वर्मांनी यात महाभारत व रामायणातील प्रसंगांवर आधारलेली चित्रं काढली आहेत. त्याचसोबत यात सयाजीरावांच्याही एका पोर्ट्रेटचा समावेश आहे. म्हैसूर संस्थान, उदयपूर संस्थान अशा अनेक संस्थानांचा आश्रय त्यांना मिळाला.

१८७३ साली व्हिएन्नातील प्रदर्शनात सादर केलेल्या चित्रासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. १८९३ शिकागोतील वर्ल्ड कोलंबियन एक्सपोझिशनमध्येही त्यांना तीन सुवर्णपदकेही मिळाली.

रविवर्मांच्या चित्रातील नायक कोण?

वर्मांचे निधन वयाच्या ५८ व्या वर्षी १९०६ मध्ये झाले. त्यापूर्वी त्यांनी सात हजारहून अधिक चित्रं काढली, असं मानलं जातं. भारतीय तत्कालीन राजे-महाराजे, सरदार आणि राजघराण्यांमधून, भारतीय साहित्यापासून ते नृत्य, नाट्य या विषयांमधून वर्मांना त्यांच्या चित्रांसाठी प्रेरणा मिळाली. त्यांनी भारतीय जाणिवांची युरोपीय वास्तववादाशी सांगड घातली.

त्यांच्या प्रसिद्ध चित्रांपैकी बहुतेक चित्रं भारतीय पौराणिक मिथकांमधून येतात. देवी-देवता कसे दिसू शकतात, ते पहिल्यांदा स्वतःच्या कुंचल्यातून राजा रविवर्मांनी दाखवले. अगदी हुबेहूब माणसांसारखे दिसणारे, जिवंत माणसं वाटतील अशा देवी-देवतांना पटावर आणण्याचं श्रेय वर्मांनाच जातं. त्यात समृद्धीची देवता लक्ष्मी आहे, ज्ञान व बुद्धीची देवता सरस्वती आहे आणि विष्णूच्या सहवासातील माया व लक्ष्मी, अशी काही चित्रं आपल्याला पाहायला मिळतात.

भारतीय कलेचा सर्वसामान्यांमध्ये प्रसार

आपली चित्रं लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून वर्मांनी मुंबईमध्ये १८९४ साली लिथोग्राफिक (शिळाप्रेस)ची स्थापना केली. ही कल्पना सर्वप्रथम टी. माधवराव यांना सुचली. ते त्रावणकोरच्या संस्थानाचे दिवाण होते आणि पुढे बडोद्यात रुजू झाले. वर्मांच्या चित्रांच्या मागणीला हवा तितका प्रतिसाद मिळत नव्हता हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी वर्मांना त्यांची काही चित्रं युरोपात पाठवून, तैलचित्रांची मुद्रित रूपांतरे तयार करून घेण्यासाठी सांगितले.

त्याऐवजी वर्मांनी स्वतःच छापखाना उघडला. या छापखान्यात छापलेले पहिले चित्र हे ‘शकुंतलेचा जन्म’ हे होते. पुढे अनेक पौराणिक देवी-देवतांची, आदि शंकराचार्यांसारख्या संतांची चित्रंदेखील याच छापखान्यात छापण्यात आली.

१९०१ मध्ये रविवर्मांनी त्यांचा हा छापखाना एका जर्मन मुद्रकाला, फ्रिट्झ श्लिचरला विकला. पुढे श्लिचरने या प्रेसवर बरेच काम केले. आजच्या आधुनिक काळातही रविवर्मांच्या प्रिंट्स अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्रोत आहेत. अमर चित्र कथेसारख्या पुस्तक मालिकांसाठी आजही रविवर्मांची शैली ही मार्गदर्शक राहिलेली आहे.