राजा रवी वर्मा यांनी १८९० साली ‘यशोदा आणि कृष्णा’चे रंगवलेले चित्र तब्बल १६७.२ कोटी रूपयांना लिलावात विकले गेले. मागील महिन्यात विकले गेलेले हे चित्र भारतातील आतापर्यंतचे सर्वात महागडे चित्र ठरले. परंतु, राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेले चित्र भारतातील घरांमध्ये त्याआधीच पोहोचले होते. त्यांनी तैलचित्रांच्या माध्यमातून देवी-देवतांना मानवी रुपात साकारले. सामान्यांना परवडेल अशा किंमतीत त्यांनी तैलचित्रांच्या ‘ओलिओग्राफ’ प्रति तयार करून विकल्या. मुंबईतील त्यांच्या एफ.ए.एल प्रेसच्या माध्यमातून त्यांनी त्यांची कलाकृती सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवली. राजा रवी वर्मा यांनी कोणता वारसा आपल्याला दिला? त्यांनी भारतीय कलेत युरोपीय कलेचे मिश्रण कसे केले? त्याद्वारे त्यांनी त्यांच्या चित्रकलेले, तैलचित्रांना समृद्ध कसे केले? त्यांच्यावर टीका का झाली? याबाबत जाणून घेऊयात.
राजा रवी वर्मांचे बालपण आणि चित्रकलेची ओढ
राजा रवी वर्मा यांचा जन्म केरळमधील किलीमनूर येथील एका समृद्ध कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेबद्दल आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी चित्र रंगवण्यास सुरूवात केली होती. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी त्रावणकोर येथील राजदरबारातील कलाकार रामा स्वामी नायडू यांच्याकडून चित्रकलेचे प्रशिक्षण घेणे सुरू केले. ब्रिटिश चित्रकार थेओडोर जेन्सन यांच्या तैलचित्र (ऑइल पेटिंग) काढण्याच्या पद्धतींचे राजा रवी वर्मा निरीक्षण करत असत. त्याद्वारे त्यांनी तैलचित्रे कशी काढायची ते शिकून घेतले. रूपिका चावला यांनी ‘राजा रवी वर्मा: पेंटर ऑफ कोलोनियल इंडिया’ या पुस्तकात नोंद केल्याप्रमाणे राजा रवी वर्मा यांना किलीमनूरमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी वाव होता. किलीमनूर हे एक समृद्ध गाव होते, ज्यामुळे कला आत्मसात होणे, तसेच कलेकडे ओढा निर्माण होणे साहजिक होते.
वीणा वादन करणाऱ्या सरस्वतीचे चित्र कसे सुचले असावे?
किलीमनूर हे कलेने समृद्ध असे शहर होते. त्यामुळे तिथे गायन, संगीत कलांचा प्रभाव होता, आणि विविध प्रकारची वाद्ये तिथे असायची. त्यामुळे एखाद्या संगीत वाद्यावर बोटांनी तारा छेडून मधुर ध्वनी निर्माण करणारे कलाकार रवी वर्मा अर्थात राजा रवी वर्मा यांच्या सहज नजरेत भरले असतील, असे रूपिका चावला यांनी नमूद केले आहे. याच गोष्टींतून वीणा वादन करणाऱ्या सरस्वतीचे चित्र रेखाटावे असे राजा रवी वर्मा यांना सुचले असावे. त्यांनी काढलेले वीणा वादन करणाऱ्या सरस्वतीचे चित्र आज घराघरांत पोहोचले आहे. दरम्यान, त्यांच्यात असलेल्या केवळ प्रतिभेमुळेच त्यांची किर्ती सर्वत्र पसरली असे नव्हे, तर कलेच्या पुढे जाऊन आणखी काहीतरी करता येईल, या त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांचे कार्य सर्वदूर पसरले.

देवी-देवतांची चित्रे घराघरांत कशी पोहोचवली?
१८९४ साली राजा रवी वर्मा यांनी मुंबईत ‘राजा रवी वर्मा फाइन आर्ट लिथोग्राफिक प्रेस’ची स्थापना केली. या प्रेसमध्ये त्यांनी भारतीय देवी-देवतांच्या चित्रांच्या ‘ओलिओग्राफ’ स्वरूपात प्रति छापल्या. इतकेच नव्हे तर त्या परवडणाऱ्या किंमतीत सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भारतीयांना देवी-देवतांना मानवी स्वरूपात चित्रांच्या माध्यमातून पाहता आले. “त्यांची प्रेस आर्थिक संकटातून जात होती. त्यांना नफा कमावण्याची चिंता नव्हती. त्यांचे खरे ध्येय होते ते म्हणजे प्रभाव पाडणे. काहीतरी ठोस करून दाखवणे. देश त्या चित्रांच्या माध्यमातून एकसंध राहावा अशी त्यांची निर्मळ भावना होती”, असे इतिहासकार मनू एस. पिल्लई यांनी म्हटले आहे. ‘फॉल्स अलाइज : इंडियाज महाराजाज इन द एज ऑफ रवी वर्मा’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही छापली
भारतीय देवी-देवतांची तैलचित्रे काढणे तसेच ती छापणे याच बरोबर राजा रवी वर्मा यांनी त्याकाळी राजकीय प्रभाव पाडणाऱ्या प्रसिद्ध नेत्यांचीही चित्र छापली. या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे देशकार्यात भर पाडण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांचीही चित्रे त्यांनी छापून लोकांपर्यंत पोहोचवली होती, असे पिल्लई म्हणाले. वयाच्या ५८ व्या वर्षी राजा रवी वर्मा यांची प्राणज्योत मालवली. जवळपास तीन दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २००० ते ७००० चित्रकलेच्या कलाकृती साकारल्या. तैलचित्रे (ऑइल पेटिंग), पोट्रेट, स्केचेस आणि खासगी चित्रकलांचा संग्रह यात त्यांनी भरीव योगदान दिले.
राजा रवी वर्मांच्या कलेवर टीका का झाली?
राजा रवी वर्मा यांची कला तत्कालीन उच्चभ्रू समाज व्यवस्थेत विकसित होत गेली होती. त्यांच्या कलाकृतींविरोधात नंतरच्या काळात अनेक टीकाही झाल्या. भारतीय पारंपारिक कल्पना तसेच पाश्चात्य संस्कृती यांचे मिश्रण त्यांच्या चित्रांमध्ये दिसून येते. तैलचित्रे काढण्यासाठी राजा रवी वर्मा आयात केलेले तेल वापरत असत. त्यांनी रंगवलेल्या अनेक चित्रांमध्ये स्त्रियांचा रंग गोरा दिसून येतो. तसेच त्या स्त्रियांनी परिधान केलेले ब्लाउज आधुनिक स्वरूपात दिसतात. तर मंदिरातील स्त्रिया या टॉपलेस दर्शवण्यात आल्या आहेत. यावरून राजा रवी वर्मा यांच्यावर टीकाही झाली होती. “राजा रवी वर्मा यांच्या कलेने भारताकडे पाहण्याचा एक उच्चभ्रू दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवला गेला व त्यालाच मुख्य कथानक म्हणून प्रस्थापित केले गेले. महाकाव्यांवर आधारित त्यांच्या कलाकृतींना बडोदा आणि म्हैसूरच्या महाराजांनी पाठबळ दिले होते. चित्रांच्या स्वस्त प्रती तयार करण्याची पहिली सूचनाही त्रावणकोर आणि बडोद्याचे दिवाण सर टी. माधव राव यांनीच त्यांना केली होती”, असे मनू पिल्लई म्हणाले.

स्वदेशी चळवळ सुरू झाल्यानंतर राजा रवी वर्मा यांना रोषाचा सामना करावा लागला. त्यांच्या कलाकृतींवर टीका झाली. ‘वसाहतवादाचे संकरित उत्पादन’ असे म्हणत त्यांनी रंगवलेल्या चित्रांना हिणवण्यात आले. अवनींद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वातील ‘बंगाल स्कूल ऑफ आर्ट’ने पाश्चात्य देशांतील ‘अकॅडमिक नॅचरलिझम’ आणि ‘थ्री-डायमेंशनल इल्युजनिझम’ला नाकारले, त्यामुळे देशाची चित्रशैलीची आवड बदलली आणि पर्यायाने राजा रवी वर्मांच्या चित्रशैलीची मागणी हळूहळू कमी होत गेली.
परंतु, तोपर्यंत भारतीयांच्या कल्पनाशक्तीवर राजा रवी वर्मा यांनी रंगवलेल्या चित्रांचा प्रभाव पडला होता. कला इतिहासकार अतिका अली यांच्या मते, “वर्मांनी ही चित्रे रंगवण्यापूर्वी, देवी-देवतांची प्रचलित चित्रे ही विशिष्ट शैलीत बद्ध होती आणि त्यात वास्तववादाचा अभाव होता.” त्यांनी लोकांना देवी-देवतांची कल्पना करण्यासाठी एक नवीन भाषा दिली. “आजही जेव्हा आपण देवी-देवतांची कल्पना करतो, तेव्हा बहुतांश लोकांच्या डोळ्यांसमोर राजा रवी वर्मांनी साकारलेली तैलचित्रे येतात. त्यांनी साकारलेल्या तैलचित्रांचा पुढे सिनेमात आणि कालांतराने मालिकांमध्येही वापर करण्यात आला”, असे मनू पिल्लई यांनी म्हटले आहे.
भारतीय कलेच्या मुख्य प्रवाहात राजा रवी वर्मांचे पुनरागमन
१९९० च्या दशकापर्यंत राजा रवी वर्मा यांची एक कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने ओळख समोर आलेली नव्हती. आधी ‘बंगाल स्कूल’ने आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळातील कलाकार आणि समीक्षकांनी राजा रवी वर्मा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. ज्या एम.एफ. हुसेन यांचा विक्रम मोडून राजा रवी वर्मा आज अव्वल स्थानी पोहोचले आहेत, त्यांनी देखील राजा रवी वर्मांचा उल्लेख केवळ एक “कॅलेंडर आर्टिस्ट” असा करून त्यांना नाकारले होते. चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी काढलेले चित्र मार्च २०२५ मध्ये ११८ कोटी रूपयांना विकले गेले होते. त्यांचा विक्रम राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्णा’ चित्राने मोडला आहे. हे चित्र १६७.२ कोटी रूपयांना विकले गेले. १९९३ मध्ये चावला आणि कलाकार ए. रामचंद्रन यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात राजा रवी वर्मांच्या मूळ कलाकृतींचे एक प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाने त्यांना एका ‘मास्टर पेंटर’चा दर्जा मिळवून दिला. यामुळेच एक कलाकार म्हणून त्यांच्याबद्दलची ओढ पुन्हा निर्माण झाली आणि भारतीय कलेच्या मुख्य प्रवाहात त्यांचे पुनरागमन झाले.
