Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूडमध्ये २००० च्या दशकांत विनोदी भूमिकांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला राजपाल यादव सध्या तिहारच्या तुरुंगात कैद आहे. अता पता लापता हा २०१२ साली आलेल्या चित्रपटासाठी त्याने काही रक्कम कर्जाऊ घेतली होती. या कर्जाची रक्कम परतफेड करण्यास तो असमर्थ ठरल्याने त्याला दोषी ठरवण्यात आलंय. त्यामुळे तो तिहार तुरुंगात कैदेत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत फारसा चर्चेत नसलेला राजपाल यादव अचानक चर्चेत आलाय. त्या चर्चेमागे नकारात्मक किनार असली तरीही विनोदी अभिनेता म्हणून त्याने कमावलेली कारकिर्द विसरता येणार नाही.
राजपाल यादवचे काही कॉमेडी चित्रपट
उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा शहर शाहजहांपूरचे रहिवासी असलेला राजपाल यादव केवळ सिनेसृष्टीत आलाच नाही तर त्याने त्याचं स्वतःचं अस्तित्वही तयार केलं. राजपालने विनोदाचा पोतच बदलला असं अनेक कलाकार म्हणतात. १९९० च्या दशकात बॉलिवूड मसाला मनोरंजनावर जॉनी लीव्हरने अधिराज्य गाजवलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत २००० च्या दशकात राजपाल यादवने विनोदी भूमिकांवर नाव कोरलं. मुझसे शादी करोगी (२००४), अपना सपना मनी मनी आणि पार्टनर (२००७) मधील त्यांच्या भूमिकांनी त्यांना चाहत्यांचे लाडके बनवले. गरम मसाला (२००५), चुप चुप के (२००६), भागम भाग (२००६), ढोल (२००७) आणि भूल भुलैया (२००७) यांसारख्या चित्रपटांमधून राजपालने त्याच्या कामाचा आलेख उंच नेला.
राजपाल यादवने १९९४ ते १ ९९७ दरम्यान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर, तो कामाच्या शोधात असताना अनुराग कश्यपने त्याला शूल (१९९९) साठी शिफारस केली. सुरुवातीला या चित्रपटात त्याच्यासाठी फक्त तीन संवाद होते, परंतु, नंतर चित्रीकरण सुरू झाल्यावर त्याला १५ संवाद देण्यात आले. याच चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी, त्यांनी प्रकाश झा दिग्दर्शित दूरदर्शनवरील कल्ट कॉमेडी मालिका मुंगेरीलाल के हसीन सपनेचा सिक्वेल, मुंगेरीलाल के भाई नौरंगीलाल या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. मूळ मालिकेत रघुबीर यादवने नायकाची भूमिका केली होती.
सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका
दोन्ही शोमध्ये अशा भावांचे चित्रण करण्यात आले होते ज्यांना अतिरंजित दिवास्वप्न पहायला आवडते. त्यानंतर राम गोपाल वर्मांनी त्याला ‘जंगल’ चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटात राजपाल यादवची भूमिका महत्त्वाची होती. तसंच, सिप्पामधील त्याची भूमिकाही लक्षणीय होती. २००० मध्ये ‘सिप्पा’ साठी त्याला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी स्क्रीन अॅवॉर्ड मिळाला होता.
डायलॉगचा बादशाह
चुप चुप के मधील यादवची भूमिका आणि त्याचा कॉमिक टायमिंग सर्वात लोकप्रिय आहे. ‘ मैं कोई बाटली से निकाला हुआ भूत हू की एक के बाद एक काम देत जा राहे हो ?” आजच्या सोशल मीडियाच्या काळात त्याचा हा डायलॉग नेटकऱ्यांसाठी उत्तम मीम मटेरिअल झाला आहे. पार्टनरमध्ये राजपालने १९७८ च्या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या काळ्या रंगाचा ओव्हरकोट घातलेल्या आणि हातात बंदुका धरलेल्या व्यक्तिरेखेची केलेली खिल्लीही खूप लोकप्रिय झाली. तो “ग्यारह मुलको की पोलिस मेरी पीछे परी है” हा लोकप्रिय संवादही त्याच्याच शैलीत त्याने उत्तमरित्या सादर केला. यादवच्या भूमिकांमध्ये अनेकदा त्याच्या कमी उंचीचा संदर्भ असायचा, जसे की ‘पार्टनर’ चित्रपटात त्याचे नाव ‘छोटा डॉन’ किंवा ‘भूल भुलैया’ आणि त्याच्या सिक्वेलमध्ये ‘छोटे पंडित’ असे होते.

विनोदी राजपाल खऱ्या आयुष्यात खूप संवेदनशील
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. सिद्दीकी म्हणाले की, यादव अत्यंत सहकार्य करणारा माणूस आहे. स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना त्याने नेहमीच पाठिंबा दिला आहे. जेव्हा राजपालला चांगले काम मिळत होते, तेव्हा तो अनेक लोकांना जेवू द्यायचा. आम्ही इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना त्याने आम्हाला पाठिंबा दिला. एकदाही तो मदत करण्यापासून मागे हटला नाही. त्याने अनेक संघर्ष करणाऱ्या कलाकारांना मदत केली आहे. त्याचे घर लंगरसारखे होते, कोणीही येऊन जेवू शकत होते. तो खूप विनोद करतो, पण प्रत्यक्षात तो खूप संवेदनशील माणूस आहे.”
‘अता पता लापता’मुळे आला अडचणीत
‘अता पता लापता’ हा चित्रपट यादव यांच्या पत्नीने श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित केला. या चित्रपटाचं संगीत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं होते. या चित्रपटासाठी त्यांनी १२ कोटी घालवले होते, पण त्यातून त्यांनी केवळ ४२ लाख रुपयेच कमावले आणि येथूनच त्यांचं आर्थिक गणित फिसकटण्यास सुरुवात झाली. त्याला चित्रपट दिग्दर्शित करायचा नव्हता. पण त्याने त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
सलमान, सोनू सूद, अजय देवगण, वरुण धवन धावले मदतीला
दरम्यान, अवघ्या देशाला खळखळून हसवणारा राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी बॉलीवूडमधील अनेक मंडळी पुढे सरसावली आहेत. “राजपाल यादवला मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. सोनू सूद, सलमान खान आणि अजय देवगण सारख्या अभिनेत्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मी डेव्हिड धवनसोबत फोनवर बोललो, त्यानेही मदत केली. रतन नैन, वरुण धवन हेही त्याला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत, ज्याचे राजपालने मनापासून कौतुक केले आहे”, अशी माहिती राजपाल यादवचे व्यवस्थापक गोल्डी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

