Rajshri Deshpande Breast Cancer Health Update: ‘ब्लॅक वॉरंट’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या मालिकांमधून झळकलेली मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे ग्रेड-१ ब्रेस्ट कॅन्सरशी यशस्वी झुंज देते आहे. अलीकडेच तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. राजश्री देशपांडे हिने स्वतः इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीविषयीची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. राजश्री हे एकच उदाहरण नाही, तर भारतात ब्रेस्ट कॅन्सरची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर Lancet Oncology मध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन नेमकं काय सांगते याचाच घेतलेला हा आढावा.
The Lancet Oncology हे जगातील प्रतिष्ठित वैद्यकीय संशोधन नियतकालिकांपैकी एक आहे. अलीकडेच या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातून स्तन कर्करोगाच्या (ब्रेस्ट कॅन्सर) वाढत्या जागतिक समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत जगभरातील स्तन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सुमारे ३.५ दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच नाही तर भारतातही मृत्यूदर वाढला आहे. तरुण महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण वाढत आहे.
Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरमुळे दरवर्षी सुमारे ७.६४ लाख महिलांचा मृत्यू
स्तन कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती झालेली असली तरी या आजाराचे प्रमाण जगभर वाढतच जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी-ब्रेस्ट कॅन्सर कोलॅबोरेटर्स यांच्या अलीकडील विश्लेषणानुसार, २०२३ साली जगभरात सुमारे २.३ दशलक्ष (२३ लाख) नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र २०५० पर्यंत ही संख्या एक तृतीयांशाने वाढून ३.५ दशलक्षांपेक्षा (३५ लाखांपेक्षा) अधिक होण्याचा अंदाज आहे. याचबरोबर मृत्यूंचे प्रमाणही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या दरवर्षी सुमारे ७.६४ लाख महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो; परंतु २०५० पर्यंत ही संख्या सुमारे ४४ टक्क्यांनी वाढून जवळपास १४ लाखांपर्यंत पोहोचू शकते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरची वाढती आकडेवारी नेमकं काय सांगते?
अभ्यासातील आकडेवारीनुसार, १९९० नंतर स्तन कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जगातील अनेक देशांमध्ये सातत्याने वाढत आहे. या कालावधीत मृत्यूदरात सर्वाधिक वाढ लाओस येथे नोंदवली गेली असून ती तब्बल २१४ टक्के आहे. याशिवाय बांगलादेश (९१ टक्के), व्हिएतनाम (८० टक्के), इंडोनेशिया (७८ टक्के), भारत (७४ टक्के), जपान (५२ टक्के) आणि फिलिपिन्स (४१ टक्के) या देशांमध्येही मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र याउलट चित्र चीनमध्ये पाहायला मिळते. तिथे स्तन कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दरात सुमारे ३७ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.

Breast Cancer: लोकसंख्येवर आधारित कर्करुग्ण नोंदणी
‘लॅन्सेट ऑन्कोलॉजी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या विश्लेषणात स्तन कर्करोगाच्या जागतिक परिस्थितीचे अद्ययावत चित्र सादर करण्यात आले आहे. यासाठी लोकसंख्येवर आधारित कर्करोग नोंदणी (population-based cancer registries), मृत्यूची नोंद करणारी व्यवस्था (vital registration systems) तसेच स्तन कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीय किंवा काळजीवाहूंशी घेतलेल्या मुलाखतींचा आधार घेण्यात आला.
२०४ देशांचा अभ्यास
या अहवालात १९९० ते २०२३ या कालावधीत जगातील २०४ देशांमध्ये स्तन कर्करोगाचा एकूण परिणाम किती आहे आणि त्यामागे कोणते जोखीम घटक कारणीभूत आहेत, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या प्रवृत्ती आणि उपलब्ध आकडेवारीच्या आधारे २०५० पर्यंत स्तन कर्करोगाचे प्रमाण कसे बदलू शकते, याचेही संभाव्य अंदाज या विश्लेषणात मांडण्यात आले आहेत.
निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रमाण अधिक
अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) मधील प्रमुख संशोधक केली बांगडिया यांनी सांगितले की, स्तन कर्करोगाचा महिलांच्या आयुष्यावर तसेच त्यांच्या कुटुंबांवर आजही मोठा परिणाम होत आहे. त्यांच्या मते, उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये महिलांना नियमित तपासणी, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचारपद्धतींचा तुलनेने अधिक लाभ मिळतो. मात्र, स्तन कर्करोगाच प्रमाण आता कमी आणि निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. या देशांमध्ये अनेक महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान उशिरा होते, तसेच दर्जेदार उपचारांची उपलब्धता मर्यादित असते. परिणामी, या भागांमध्ये मृत्यूदर तुलनेने अधिक असल्याचे बांगडिया यांनी स्पष्ट केले.
Breast Cancer: भारतातील आकडेवारी काय सांगते?
भारतात स्तन कर्करोगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दशकांत लक्षणीय वाढ झाली आहे. १९९० मध्ये Age Standardised Incidence Rate (ASIR) प्रति एक लाख लोकसंख्येमागे १३.० होता, तो २०२३ मध्ये वाढून २९.४ प्रति लाख झाला आहे. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये मृत्यूदरदेखील १९९० मधील ८.९ प्रति लाखांवरून १५.५ प्रति लाखांपर्यंत वाढला. देशनिहाय २०५० पर्यंतचा अंदाज देण्यात आलेला नसला तरी अभ्यासकांनी दक्षिण आशियासाठी ASIR सुमारे ३८.५ प्रति लाख आणि ASMR सुमारे १८.९ प्रति लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारतासह निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान
सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील सहयोगी प्राध्यापक तसेच इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनशी (IHME) संलग्न असलेल्या डॉ. मेरी एनजी यांच्या मते, भारतासह निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बदलती लोकसंख्या रचना (demographic) आणि आरोग्यविषयक प्रवाह (epidemiological trends) यांमुळे स्तन कर्करोगाच्या घटनांमध्ये पुढील काळात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वाढीबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. भारतात मृत्युदर वाढत असला तरी तो नवीन रुग्णसंख्येच्या वाढीपेक्षा तुलनेने कमी आहे. यावरून निदान आणि उपचार व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळतात. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात रोगाचे निदान वाढवणे आणि वाढत्या रुग्णसंख्येला सामोरे जाण्यासाठी उपचार क्षमता अधिक मजबूत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. मेरी एनजी यांनी भारतातील कर्करोग नोंदणी व्यवस्थेतील त्रुटींकडेही लक्ष वेधले आहे. सध्या देशातील कर्करोग नोंदणी (cancer registry) मर्यादित क्षेत्रातच होते आणि साधारणपणे देशाच्या केवळ १० ते १५ टक्के लोकसंख्येपर्यंतच तिचे कव्हरेज असल्याचा अंदाज आहे. “आमच्या सध्याच्या अभ्यासात भारतातील राज्यनिहाय किंवा प्रादेशिक फरक (subnational heterogeneity) पूर्णपणे दिसून येत नाहीत. स्तन कर्करोगविषयक उपचारांची योग्य धोरणे तयार करण्यासाठी प्रादेशिक फरकानुसार नोंदणी होण आवश्यक आहे. त्यामुळे लोकसंख्या-आधारित कर्करोग नोंदणीचे कव्हरेज आणि अचूकता वाढवणे महत्त्वाचे ठरते,” असे डॉ. मेरी एनजी यांनी सांगितले.
रजोनिवृत्तीपूर्व वयोगटात स्तन कर्करोगाची झपाट्याने वाढ
संशोधनातून असे दिसून आले आहे की, १९९० पासून २० ते ५४ वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाच्या नव्या प्रकरणांमध्ये सुमारे २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, तुलनेने वयोवृद्ध महिलांमध्ये या आजाराच्या प्रमाणात फारसा बदल झालेला दिसत नाही.
हैदराबादमधील बसवतारकम इंडो-अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील ब्रेस्ट ऑनको सर्जन डॉ. निशा हरिहरन यांनी संगितले की, ICMR-NCDIR च्या(नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम) अलीकडील आकडेवारीवरून भारतात स्तन कर्करोग हा वाढता सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्न ठरत असल्याचे स्पष्ट होते.
त्या सांगतात की, अनेक कर्करोग नोंदणी केंद्रांच्या आकडेवारीनुसार महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी जवळपास एक चतुर्थांश म्हणजे सुमारे २५ टक्के प्रकरणे स्तन कर्करोगाची असतात, त्यामुळे तो महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग ठरतो. वय वाढल्यानंतर आजाराचे प्रमाण वाढते असे चित्र जागतिक स्तरावर आहे; मात्र भारतामध्ये तुलनेने कमी वयातही त्याचा लक्षणीय परिणाम दिसून येतो. साधारणपणे महिलांच्या तिशीच्या सुरुवातीला या आजाराचे प्रमाण वाढू लागते आणि ५० ते ६९ वयोगटात ते उच्चांक गाठते, असे त्या स्पष्ट करतात.
Breast Cancer: जोखीम घटकांचे व्यवस्थापन
या विश्लेषणानुसार, जगभरातील स्तन कर्करोगाची सुमारे २८ टक्के प्रकरणं बदलता येण्याजोग्या (modifiable) सहा जोखीम घटकांशी संबंधित आहेत. यामध्ये धूम्रपान, रक्तातील साखरेची वाढलेली पातळी, लठ्ठपणा यांसारख्या घटकांचा समावेश होतो. संशोधकांच्या मते, निरोगी जीवनशैलीचा अवलंब उदा. धूम्रपान टाळणे, नियमित शारीरिक हालचाल करणे, लाल मांसाचे सेवन कमी करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे यामुळे स्तन कर्करोगामुळे होणारे आजारपण आणि अकाली मृत्यू यांमुळे गमावल्या जाणाऱ्या निरोगी आयुष्याची सुमारे एक चतुर्थांश वर्षे (सुमारे २४ दशलक्ष वर्षे) वाचवता येऊ शकतात. याशिवाय, जागतिक स्तरावर नोंदवण्यात येणाऱ्या स्तन कर्करोगाच्या नव्या रुग्णांपैकी सुमारे २७ टक्के (अंदाजे ६.२८ लाख) कमी आणि निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळतात. मात्र, या देशांमध्ये या आजारामुळे येणारे आजारपण आणि अकाली मृत्यूचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. हे प्रमाण ४५ टक्क्यांहून अधिक आहे.
Breast Cancer: तरुण रुग्णांवरील आर्थिक बोजा
तरुण वयात स्तन कर्करोगाचे निदान झाल्यास त्याचे परिणाम केवळ आरोग्यापुरते मर्यादित राहत नाहीत; त्याचा आर्थिक आणि सामाजिक पातळीवरही मोठा प्रभाव पडतो. या काळात बहुतेक महिलांवर करिअर घडवण्याचा आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे मोठी आर्थिक बचत नसतानाच उपचारांचा खर्च उचलावा लागतो.
स्तन कर्करोगावरील उपचार अनेक महिन्यांपर्यंत चालतात. यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि त्यानंतरच्या नियमित तपासण्या अशा टप्प्यांतून जावे लागते. परिणामी कुटुंबावर दुहेरी आर्थिक ताण निर्माण होतो. एकीकडे वैद्यकीय खर्च वाढतो, तर दुसरीकडे रुग्ण आणि कुटुंबीयांना कामापासून दूर राहावे लागल्याने उत्पन्नात घट होते. उपचारासाठी प्रवास, उपचार केंद्राजवळ राहण्याचा खर्च आणि घरगुती कामकाजातील अडथळे यामुळे अनेक कुटुंबे दीर्घकालीन आर्थिक तणावाला सामोरी जातात.
हैदराबादमधील ब्रेस्ट ऑनको सर्जन डॉ. निशा हरिहरन सांगतात की, महिलांमध्ये कर्करोगामुळे होणारे मृत्यू समाज आणि कुटुंबांवरही गंभीर परिणाम करतात. आईचा मृत्यू झाल्यास लहान मुलांवर त्याचा खोल परिणाम होतो. International Agency for Research on Cancer च्या अंदाजानुसार, स्तन कर्करोग आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू मिळून नव्याने अनाथ होणाऱ्या मुलांपैकी जवळपास निम्म्या प्रकरणांसाठी जबाबदार असतात. या दोन्ही कर्करोगांचे लवकर निदान झाल्यास प्रभावी उपचार शक्य असतात. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार पूर्ण करणे हे केवळ रुग्णाच्या आयुष्याशी संबंधित नसून कुटुंब आणि समाजाच्या स्थैर्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्या अधोरेखित करतात.
