scorecardresearch

विश्लेषण: “बलात्काऱ्यांचं टक्कल करून धिंड काढेन” अशोक गेहलोत यांची घोषणा चर्चेत! टक्कल केलं जाणं बेअब्रूशी का जोडलं जातं?

डोक्यावरचे केस काढून टक्कल केलं जाणं हे आजही अपमान किंवा बेअब्रू झाल्याचं मानलं जातं.

विश्लेषण: “बलात्काऱ्यांचं टक्कल करून धिंड काढेन” अशोक गेहलोत यांची घोषणा चर्चेत! टक्कल केलं जाणं बेअब्रूशी का जोडलं जातं?
डोक्यावरचे केस काढून टक्कल करणं अपमानास्पद समजलं जातं

दिल्लीतल्या कंझावाला भागात एका मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला. तिला एका कारने धडक दिली होती. त्यानंतर १२ किलोमीटर फरपटत नेलं. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं एक वक्तव्यही चर्चेत आहे. ते म्हणाले की बलात्काऱ्यांचं टक्कल करून त्यांची धिंड काढली पाहिजे. डोक्यावरचे केस काढून टक्कल करणं हे कायमच बेअब्रू किंवा अपमानाशी जोडलं गेलं आहे. अशोक गेहलोत यांचाच हा समज नाही तर देशातल्या अनेक लोकांचा आहे.

टक्कल करणं बेअब्रू किंवा अपमानाशी का जोडलं गेलं आहे?

आपल्या देशात एक काळ असा होता की त्या काळात पुरूष असो किंवा स्त्रिया यांचे केस चांगले लांबसडक असत. ब्रिटिश, युरोपमधले न्यायाधीश आणि त्यांच्या केसांप्रमाणे केसांची ठेवण हे आपण करत आलो आहोत. अनेक चित्रपट आणि फोटोंमध्ये ते दिसून आलं आहे. लांबसडक, रेशमी केस असणं हे कायमच प्रतिष्ठेशी जोडलं गेलं आहे.

आयर्लंड मध्ये वेडेवाकडे कापले गेलेले केस हे कमी शिकलेल्या लोकांचं प्रतीक मानलं जायचं किंवा ते लोक गरीब आहेत म्हणून असे राहतात असं समजलं जायचं. एवढंच काय केसांच्या रंगावरूनही त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावला जात असे. ज्या व्यक्तीचे केस सोनेरी आहेत ती व्यक्ती श्रीमंत आहे. जर एखाद्या व्यक्तीचे केस काळपट असतील आणि कमी असतील तर त्याला गुलामाची वागणूक दिली जात होती.

लांबसडक केसांच्या महिलांबाबत काय समज?

ज्या महिलेचे केस लांबसडक आहेत ती महिला लग्नासाठी योग्य आहे आणि ती सृदुढ मुलांना जन्म देऊ शकते असाही समज होता. त्यामुळेच जुन्या काळापासून महिला आपल्या केसांची खास निगा राखताना दिसतात.

कोरियाच्या राजासोबत काय घडलं होतं?

पश्चिमेकडील देशांप्रमाणेच आशियाई देशांमध्येही असेच काही नियम किंवा ज्याला समज म्हणता येईल ते होते. कोरियामध्ये लांबसडक केस असलेला पुरूष हा त्याच्या केसांची पोनी बांधत असे. लांब केस असणं हे सन्मानाचं प्रतीक समजलं जात होतं. त्यामुळेच १८९५ मध्ये जेव्हा जपानमध्ये कोरियाचा राजा गोजॉन्ग याचं टक्कल करण्याचा आदेश दिला तेव्हा सगळा देश हळहळला.
कोरियाच्या राजाचं टक्कल करण्यासाठी जपानहून न्हावी बोलवण्यात आला होता. कारण कोरियातला एकही न्हावी राजाचे केस काढण्यास तयार नव्हता. जपानने प्रत्येकाला विचारून पाहिलं की तुम्ही सांगाल तितके पैसे देतो पण कोरियातला एकही न्हावी यासाठी तयार झाला नाही. जेव्हा कोरियाच्या राजाचे केस काढण्यात आले तेव्हा ती शिक्षा भर चौकात देण्यात आली. यावेळी तिथे उपस्थित असलेले सैनिक, लोक सगळे ढसाढसा रडले होते. त्यानंतर कोरियातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांचे केसही काही प्रमाणात कापले गेले.

कोरियातल्या या घटनेविषयी ब्रिटिश लेखिकेने काय म्हटलं आहे?

या सगळ्या कालावधीत कोरियात आलेल्या ब्रिटिश लेखिका इजाबेल बर्थ बिशप यांनी लिहिलं होतं की ज्यांच्यासाठी एरवी महालात येणं हे अभिमानाचं मानलं जात होतं तेच कोरियाचा राजाला केस काढण्याची शिक्षा झाल्यानंतर महालात येण्यासाठी टाळत होते. अनेक लोक भूमिगतही झाले. त्यानंतर जपानने अनेकांना शोधलं आणि त्यांचे केस काढले.

त्यावेळी कोरियात ज्यांचे केस कापले गेले ते आक्रोश करू लागले होते. अनेक जण आपले कापले गेलेले केस असे हातात घेऊ चालले होते जसे की ते एखाद्या अंतयात्रेला जात आहेत. इतकं केस काढणं हे अपमानास्पद मानलं गेलं होतं.

केसांच्या ठेवणीवरून ओळखले जात असत गुलाम

केसांच्या ठेवणीवरून लोकांचा वंश किंवा ते गुलाम आहेत का हे कळावं म्हणून प्रत्येकाला तशी केशरचनाही ठरवून देण्यात आली होती. अँग्लो नॉर्मन इतिहासकार ऑर्डोरिक विटलिस यांनी याबाबत सांगितलं की केस कुणी बांधायचे आहेत किंवा कुणी कमी ठेवायचे आहेत याबाबत नियम आखून दिले होते. गुलामांचे केस कमी ठेवण्याची प्रथा या नियमांमुळेच सुरू झाली.

१५ व्या शतकात अफ्रिकन मूळातल्या लोकांना गुलाम करण्याची प्रथा सुरू झाली. त्यावेळी सर्वात आधी त्यांचे केस काढण्यात आले. अफ्रिकन लोक आपल्या केसांचा अभिमान बाळगत असत. तुमचं समाजातलं वजन काय आहे? त्यानुसारही केसांची रचना ठरली होती. गर्वहरण करण्यासाठी गुलामांचे केस कापले गेले. यानंतर गुलाम झालेल्यांना त्यांच्या कुटुंबातही जाण्याची मुभा देण्यात आली. कारण तुम्ही गुलाम झाला आहात हे तुमच्या काढलेल्या केसांवरून कळावं हा त्यामागचा उद्देश होता.

अफ्रिकेतल्या महिलांसोबतही हीच कृती करण्यात आली. अत्यंत हलाखीत काम करणाऱ्या या पुरूष आणि महिला गुलामांना नीट जेवण मिळत नसे. तसंच त्यांना अंघोळही करता येत नसे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर, अंगावर आजार झाले. त्यानंतर डोक्यावर झालेले व्रण, जखमा लपवण्यासाठी डोक्यावर कापड बांधण्याची पद्धत सुरू झाली. टक्कल झाकता येईल म्हणून ही प्रथा सुरू झाली.

जगातल्या इतिहासात टक्कल करण्याच्या अनेक घटना घडल्या

जगातल्या इतिहासाचा विचार केला तर अशा अनेक घटना घडल्या. एवढंच काय तर सध्याच्या आधुनिक जगातही अशा घटना घडत आहेत. भारतात आजही अनेक ठिकाणी केस काढून टक्कल केलं जातं. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो कथितरित्या उत्तर प्रदेशातल्या जौनपूर गावातला होता. या ठिकाणी आपल्या प्रेयसीला लपून छपून भेटायला आलेल्या प्रियकराचे केस लोकांनी काढले त्याचं टक्कल केलं.

काही दिवसांपूर्वी अशीच एक तक्रार आली होती ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. या घटनेत एका तरूणाने आपल्या पत्नीचे केस आपल्या शेजाऱ्याने काढले असा आरोप केला होता. केस कापल्यावर किंवा वेणी कापल्यावर कोणतं कलम लावायचं? यावरून बरीच डोकेफोड पोलिसांनी केली. त्यानंतर हे लक्षात आलं की या घटनेमुळे त्या महिलेच्या स्त्री असण्याचा अपमान झाला आहे. ज्यानंतर कलम ५०९ अंतर्गत पुढची कारवाई करण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 20:47 IST

संबंधित बातम्या