शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. सेनेने दुसऱ्या उमेदवाराच्या घोषणा आणि आज थेट अर्ज दाखल केल्यामुळे संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभेवर पुन्हा जाण्याची आशा मावळल्याचे चिन्हं दिसत आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. संभाजीराजे हे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यास १० जूनला प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र असं असतानाच या निवडणुकीमध्ये नेमकं मतांचं गणित कसं आहे याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. त्यावरच टाकलेली नजर…

नक्की वाचा >> Rajya Sabha Election: शिवरायांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसहीत संभाजीराजेंची पोस्ट; म्हणाले, “महाराज, तुमच्या…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमका गोंधळ काय?
राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने संभाजीराजे यांना सूचक इशारा दिलेला. कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची दुसरी उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दोन दिवसांपूर्वीच सुरू केली. संभाजीराजे हे कोल्हापूरचे आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याची रणनीती शिवसेनेने आखली. मराठा समाजातील सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची संधी दिल्याचा संदेश संजय पवार यांच्या उमेदवारीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

शिवसेनेनं फसवल्याचा आरोप आणि सेनेनं दिलेलं उत्तर
शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या उमेदवारीवरून फसवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला  असला तरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी तो फेटाळून लावला. शिवसेना संभाजीराजे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि  ४२ मते  देण्यास तयार होती; पण संभाजीराजे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यास नकार दिला. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीतर्फे २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपकडून २०१६ मध्ये खासदारकी घेतली. मग त्यांना पक्षप्रवेशाचे वावडे असण्याचे काही कारण नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांनी केला फसवणुकीचा आरोप
छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभा उमेदवारी देण्याबाबतचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला. त्यानंतर हा विषय वेगळय़ा दिशेने गेला. यातून संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपाचे तिसरी जागा लढवण्याचे संकेत
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (२६ मे २०२२ रोजी) मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.”भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल,” असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकत असताना तो पक्ष सहाव्या जागेसाठी दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत असल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

पाटील यांचा शिवसेनेला इशारा
“शिवसेनेने या निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे,” असे पाटील यांनी म्हटलंय.

मतदानाची टक्केवारी कशी?
मराठा समाजातील सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची संधी दिल्याचा संदेश संजय पवार यांच्या उमेदवारीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  राज्यसभेत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे ५५ आमदार असून, राष्ट्रवादी व काँग्रेसकडील अतिरिक्त मते तसेच अपक्ष आणि छोटया पक्षांच्या मतांच्या आधारे दुसरी जागा जिंकण्याची शिवसेनेची योजना आहे.

भाजपाकडे किती अतिरिक्त मते?
भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असून, काही अपक्षांची भाजपाला साथ आहे. ही मते संभाजीराजे यांना दिली जाऊ शकतात. अपक्ष व छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळविण्यात संभाजीराजे किंवा भाजपाला यश आले तरच भाजपाला ४१.०१ मतांचा टप्पा गाठता येऊ शकतो. सध्या तरी ही शक्यता कमी दिसते.

संभाजीराजे यांचा भाजपा वापर करून घेईल अशी चिन्हं
महाविकास आघाडीने संभाजीराजे यांचा पराभव केला, असा बाहेर प्रचार करून मराठा समाजात  महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यावर भाजपाचा भर असेल. यातूनच संभाजीराजे यांचा भाजपा वापर करून घेईल, अशी चिन्हे आहेत. 

मतं फुटण्याची शक्यता किती?
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. म्हणजेच पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवूनच मतपत्रिका मतपेटीत टाकावी लागते. एखाद्या आमदाराने पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास आमदार म्हणून तो अपात्र ठरू शकतो. यातूनच मतांची फाटाफूट होण्याची शक्यता कमी असते. यापूर्वी राज्यात २००८ मध्ये राज्यसभेसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. तेव्हा नारायण राणे यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेच्या चार बंडखोर आमदारांना आपली आमदारकी वाचविण्यासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करावे लागले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha election 2022 voting shivsena bjp ncp have and chances of sambhajiraje chhatrapati winning scsg
First published on: 26-05-2022 at 21:00 IST