दहा राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात सात जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेसाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो. तेवढी मते मिळविणारा पहिल्या फेरीत निवडून येतो.
राज्यसभेसाठी मतदान पद्धती कशी असते ?
राज्यसभेसाठी विधानसभेचे आमदार मतदान करू शकतात. विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन्ही सभागृहे असलेल्या राज्यांमध्येही फक्त विधानसभेच्या आमदारांनाच मतदानाचा अधिकार असतो. मतदान हे पसंतीक्रमानुसार केले जाते. जेवढ्या जागा तेवढी मते देण्याचा आमदारांना अधिकार असतो. यानुसार सात जागांसाठी मतदान होत असल्याने प्रत्येक आमदारला पहिल्या पसंतीचे. दुसऱ्या, तिसऱ्या अशा पद्धतीने सात पसंतीक्रमानुसार मते देता येतात. राज्यसभेसाठी मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला किंवा पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवून मतदान करणे बंधनकारक असते.
अपक्षांना मात्र हे बंधन नसते. पक्षाच्या व्हिपनुसार (पक्षादेश) आमदारांना मतदान करणे आवश्यक असते. पक्षादेशाचा भंग केल्यास संबंधित आमदाराच्या विरोधात घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार कारवाई होऊ शकते. कुलदीप नायर विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट २००६ मध्ये दिलेल्या निकालात एखाद्या आमदाराने पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास तो लगेचच अपात्र ठरू शकणार नाही, असा निर्वाळा दिला होता.
मतांचा कोटा कसा निश्चित केला जातो?
राज्यसभेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो. एकूण सदस्यसंख्या व त्याला निवडणूक होणाऱ्या जागांमध्ये एकाची वाढ करून भागायचे असते. महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळ २८८ आहे. मतदान होत असलेल्या जागा सात आहेत. २८८ भागीले ८ = ३६. त्यात एकची भर घालायची असते. म्हणजेच निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता असेल. ही मते १००च्या संख्येत मोजली जातात. सध्या दोन जागा रिक्त असल्याने मतांचा कोटा आणखी थोडा कमी होईल. याचाच अर्थ राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता असेल.
पहिल्या पसंतीची मते मिळाली नाही तर…
सात जागांसाठी समजा दहा उमेदवार रिंगणात आहेत. मतदान झालेच व फक्त तिघांनाच पहिल्या पसंतीची आवश्यक मते मिळाल्यास ते विजयी घोषित केले जातात. मग उर्वरित सात उमेदवारांसाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. विजयी झालेल्या तीन उमेदवारांची अतिरिक्त मते अन्य उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. ही मते हस्तांतरित होताना मतांचे मूल्य ठरते. उदा. अ ला ३७०० कोटा असताना ४१०० मते मिळाली तर त्याची चार मते ब कडे हस्तांतरित होतील. पण ही मते हस्तांतरित होताना त्याचे मूल्य चार नसेल तर ते कमी झालेले असेल. क्ष ला ३३५० मते मिळाली व त्याला विजयासाठी अजून ३५० मतांची आवश्यकता असेल तर अ ची दुसऱ्या पसंतीची मते मोजून तेवढे मूल्य असलेली मते क्षकडे हस्तांतरित होतात. क्ष ने ३७००चा कोटा पूर्ण केला तर तो निवडून येतो. तरीही त्याने मतांचा कोटा पूर्ण केला नाही तर कोटा पूर्ण केलेल्या अन्य उमेदवारांची मते मोजली जातात. ही सारी प्रक्रिया किचकट असते. शेवटी दोनच उमेदवार रिंगणात उरले आणि कोणीही मतांचा कोटा पूर्ण केला नाही तर त्यातील जास्त मते मिळविणारा विजयी घोषित केला जातो.
सुनेत्रा पवार यांना खासदारकीची राजीनामा द्यावा लागेल का?
नाही. त्यांची विधानसभेवर निवड झाल्यास त्यांची खासदारकी आपोआप रद्द होईल. राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य लोकसभा अथवा विधानसभेवर निवडून आल्यास त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यापासून त्यांचे राज्यसभा अथवा विधान परिषदेचे सदस्यत्व आपोआप रद्द होते.
santosh.pradhan@expressindia.com
