नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यसभेचे दोन खासदार तर विधानसभेतील सहा आमदार निवडून आले आहेत. लोकसभेवर निवडून आलेल्या विधानसभेच्या आमदारांना ठराविक मुदतीत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभा खासदार निवडून आल्यास… 

लोकसभा हे लोकांचे सभागृह तर राज्यसभा हे राज्यांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. राज्यसभा किंवा ज्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे त्या राज्यांमध्ये राज्यसभेचा खासदार किंवा विधान परिषदेचा आमदार लोकसभा वा दुसऱ्या सभागृहावर निवडून आल्यास त्याचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. त्यांना राजीनामा द्यावा लागत नाही. लोकसभा किंवा दुसऱ्या सभागृहात निवडून आल्याचे जाहीर झाल्यापासून त्यांची राज्यसभेची खासदारकी वा विधान परिषदेची आमदारकी तात्काळ रद्द होते. एखादा लोकसभेचा खासदार राज्यसभेवर निवडून आल्यास त्याचे लोकसभा सदस्यत्वपद आपोआप रद्द होण्याची कायद्यात तरतूद आहे. लोकसभा निवडणुकीत पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे राज्यातील दोन राज्यसभेचे खासदार अनुक्रमे उत्तर मुंबई आणि सातारा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यामुळे उभयतांची राज्यसभेची खासदारकी आता संपुष्टात आली. दोन्ही जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होईल. पोटनिवडणुकीत प्रत्येक जागा ही स्वतंत्र मानली जाते. यामुळ दोन जागांसाठी वेगवेगळी निवडणूक होईल.

हेही वाचा >>> विश्लेषण : अमेरिकेच्या ‘फर्स्ट सन’ला तुरुंगात जावे लागणार?

एकाच वेळी निवडून आल्यास कोणते सदस्यत्व कायम?

एखादा लोकसभा अथवा राज्यसभेवर एकाच वेळी निवडून आल्यास त्याला दहा दिवसांत कोणत्या सभागृहाचे सदस्यत्व कायम ठेवायचे आहे हे लेखी कळवावे लागते. दहा दिवसांत या सदस्याने लेखी कळविले नाही तर त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. 

दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडून आल्यास?

लोकसभा अथवा विधानसभेच्या दोन मतदारसंघांतून निवडून आल्यास १४ दिवसांच्या मुदतीत त्याला एका मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. या १४ दिवसांत या सदस्याने एका मतदारसंघाचा राजीनामा न दिल्यास त्याचे दोन्ही मतदारसंघातील सदस्यत्व रद्द होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघांतून निवडून आले आहेत. त्यांना पुढील काही दिवसांत कोणत्या मतदारसंघाच्या सदस्यत्वा राजीनामा द्यायचा याचा निर्णय घेऊन राजीनामापत्र सादर करावे लागेल. 

हेही वाचा >>> वहिनीसोबतचे प्रेमसंबंध, त्यातून घोटाळे; जो बायडेन यांच्या मुलाला शिक्षा; पण तो तुरुंगात जाईल का?

विधानसभेचा आमदार लोकसभेवर गेल्यास…

विधानसभेचा आमदार लोकसभेवर निवडून आल्यास राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत या सदस्याला विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. राज्य विधानसभेतील प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, प्रतीभा धानोरकर, संदिपान भूमरे, बळवंत वानखडे आणि रविंद्र वायकर हे सहा आमदार लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांना १४ दिवसांत राजीनामा सादर करावा लागेल. १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये विधानसभा सदस्य असलेले गुरुचरणसिंग तोहरा हे लोकसभेवर निवडून आले होते. १४ दिवसांच्या मुदतीत त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला नाही. परिणामी ते निवडून आलेली लोकसभेची जागा रिक्त असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. 

santosh.pradhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha members and mlas resign after winning lok sabha poll print exp zws