लाओस पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक (लाओस पीडीआर) या देशाने अयोध्येच्या राममंदिरातील रामलल्लाची प्रतिमा असलेले एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारे हिंदू देवतेची प्रतिमा टपाल तिकिटावर प्रसिद्ध करणारा लाओस पीडीआर हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या देशाला अलीकडेच दिलेल्या भेटीदरम्यान हे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. डॉ. जयशंकर आणि लाओस पीडीआरचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री सलेमक्से कोमासिथ यांच्या हस्ते लाओसची राजधानी व्हिएन्टिन येथे आयोजित केलेल्या समारंभात हे टपाल तिकिट संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्यात आले. लाओसमधील भारताचे राजदूत प्रशांत अग्रवाल हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आसियान बैठकीसाठी डॉ. जयशंकर यांनी या आग्नेय आशियाई राष्ट्राला दिलेल्या भेटीदरम्यान हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या दिवशी एकूण दोन टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. ही दोन्ही तिकिटे भारत आणि लाओस यांमधील अनुबंध स्पष्ट करणारी आहेत. एका तिकिटावर लाओसची प्राचीन राजधानी लुआंग प्रबांग येथील गौतम बुद्ध आणि बौद्धधर्माशी निगडित प्राचीन स्थळाचे चित्रण आहे, तर दुसऱ्या तिकिटावर अयोध्येतील रामलल्लाचे चित्रण आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

भारत आणि लाओस पीडीआर यांच्यातील दुवा

बौद्ध धर्माने ऐतिहासिकदृष्ट्या भारत आणि लाओस पीडीआर यांच्यात एक सखोल दुवा निर्माण केला आहे. भारत हे बौद्ध धर्माचे जन्मस्थान आहे आणि बौद्ध धर्माशी संबंधित असंख्य महत्त्वाच्या स्थळांचे माहेरघर आहे, तर आग्नेय आशियामध्ये बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी आहेत. शिवाय ‘रामायण’ हे भारत आणि आग्नेय आशियायी देशांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे या दोन्ही टपाल तिकिटांच्या प्रकाशनाच्या या कार्यक्रमाकडे भारत आणि लाओस पीडीआर यांच्यातील सांस्कृतिक ऋणानुबंध घट्ट करण्याचा प्रयत्न म्हणून पाहले जात आहे. अयोध्येतील राम मंदिरात स्थापना केलेली ५१ इंच उंच प्रभू रामाची मूर्ती पाच वर्षांच्या मुलाच्या (रामलल्ला) रूपात असून गडद रंगाचा दगड वापरून शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली होती. रामायण हे भारतातील महत्त्वाचे महाकाव्य आहे आणि लाओशियन संस्कृतीतही या महाकाव्याला विशेष स्थान आहे. थायलंड, म्यानमार आणि कंबोडिया यांच्याप्रमाणे, लाओसमध्ये देखील मूळ भारतीय महाकाव्य रामायणाच्या ख्वे थुरापी आणि प्रसिद्ध फ्रा लॅक फ्रा लाम अशा दोन आवृत्त्या आहेत. या रामकथांचे वाचन शुभप्रसंगी केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर ‘फ्रा लक फ्रा राम’ या राम कथेविषयी जाणून घेणं समयोचित ठरणारे आहे.

लाओसचा आणि भारतीय संस्कृतीचा ऐतिहासिक अनुबंध

लाओस म्हणजेच लाओस पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक (LPDR) हा आग्नेय आशियातील दोन मार्क्सवादी- लेनिनवादी देशांपैकी एक आहे. हा देश इंडो- चायनीज द्वीपकल्पाच्या मध्यभागी असून लाओसच्या वायव्येला म्यानमार आणि चीन, पूर्वेला व्हिएतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हिएन्टिन हे राजधानीचे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत. या देशात ६६ टक्के जनता बौद्ध धम्माचे पालन करते. तर उरलेले स्थानिक ताई धर्माचे, ख्रिश्चन, आणि इतर धर्मांचे पालन करतात. त्यामुळे या देशाचा आणि भारतीय संस्कृतीचा ऐतिहासिक संबंध स्पष्ट होतो. या देशातील जनतेला बुद्ध आणि राम कथा प्रिय आहेत. लाओसमध्ये रामायण किंवा रामकथा ही ‘फ्रा लक फ्रा राम’ किंवा ‘फा लक फा लाम’ या नावाने ओळखली जाते.

अधिक वाचा: राम कथा अनेक तरी राम नामाचे गारुड सारखेच; काय आहे कारबि रामायण?

‘फ्रा लक फ्रा राम’ लाओसचे महाकाव्य

‘फ्रा लक फ्रा राम’ हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे. ‘फ्रा लक फ्रा राम’ हे प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणाचेच रूपांतर आहे. लाओसच्या आजूबाजूस असलेल्या कंबोडिया आणि थायलंडच्या तुलनेत लाओसमध्ये रामायण हे उशिरा पोहोचले. या रामायणावर बौद्ध धम्माचा प्रभाव अधिक आहे. हिकायत सेरी रामाच्या काही मलय आवृत्त्यांप्रमाणेच या रामायणावर दशरथ जातक या जातक कथेचा प्रभाव आहे. या रामायणाची कथा बुद्धाच्या पूर्वीच्या आयुष्याशी संबंधित आहे. ‘फ्रा लक फ्रा राम’ या नावातील फ्रा लक म्हणजे लक्ष्मण तर फ्रा राम म्हणजे राम. फ्रा राम हा कथेचा नायक असला तरी फ्रा लक म्हणजेच लक्ष्मणच्या नावाने या रामायणाची सुरुवात होते. लक्ष्मणाचे नाव नंतरच्या काळात जोडले गेले असावे असे काही अभ्यासक मानतात. या कथेचे मूळ जातक कथेत असल्याने तिला फ्रा राम सदोक म्हणजेच राम जातक असेही संबोधले जाते. या शिवाय थायलंडप्रमाणे याही देशात ही रामकथा रामकियेन  म्हणून प्रसिद्ध आहे.

लाओसमध्ये रामकथा कशी पोहोचली?

लाओसमध्ये रामकथा आणल्याचे श्रेय लॅन झांगचा पहिला राजा चाओ फा न्गौम याला दिले जाते. यानेच फ्रा राम सदोकचा परिचय या देशाला करून दिल्याचे मानले जाते. हा राजा अंगकोरमधील रेमकरशी परिचय असलेले सैनिक, कलाकार, नर्तक, कवी, संगीतकारांसह येथे आला असे मानले जाते. भारतीय संस्कृतीने प्रभावित असलेली मोन आणि ख्मेर यांच्या राज्यांच्या सीमावर्ती भागात ताई जमातीच्या लोकांची वस्ती होती. ताई/ लाओ लोकांनी त्यांच्याकडून बरेचसे भारतीय शिक्षण आणि ज्ञान मिळवले. जसजशी ती राज्ये कमी होत गेली, तसतसे लाओसमधील लोक पूर्वीच्या हिंदू मंदिरांची पूजा करू लागले असा सिद्धांत काही अभ्यासक मांडतात. या मंदिरांच्या शिल्पांमध्ये रामायण, महाभारतातील कथांचे अंकन केले जात होते. चंपासाकमधील वट फू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या भागात असलेल्या रामकथेच्या पूर्वीच्या आवृत्त्या या इतर देशांप्रमाणेच मूळ रामायणाशी मोठ्या प्रमाणात साधर्म्य दर्शवणाऱ्या होत्या. परंतु १८ व्या शतकापर्यंत त्यांचे स्थानिक आवृत्त्यांमध्ये पूर्णतः रूपांतर झाल्याचे आढळून येते.

धार्मिक महत्त्व

लाओसमध्ये रामायण महाकाव्याचे हिंदू स्वरूप नष्ट झालेले असले तरी ते पूर्णपणे पुसले गेले नाही. इंद्र, शिव आणि ब्रह्मा हे फ्रा राम सदोकमध्येही आहेत. लाओस संस्कृती नेहमीच मौखिक आणि दृश्यमान म्हणून ओळखली गेली आहे. मौखिक कथांना शाही दरबारांनी विस्तृत नृत्य-नाटकांमध्ये संहिताबद्ध केले होते. लाओस मधील नृत्य आणि नाट्यकलेवर ख्मेर, थाई आणि जावानीज संस्कृतीचा प्रभाव आहे. खोने आणि लाखोने नृत्य-नाटकांमधील प्रतिकात्मकता, वेशभूषा आणि कथा या ख्मेर, थाई आणि जावानीज परंपरांशी मिळत्या जुळत्या आहेत. एकूणच लाओसमध्ये राम कथेचे किंवा जातक कथेचे नाट्य आणि नृत्याच्या स्वरूपात सादरीकरण केले जाते. अनेक ठिकाणी सादरीकरणाच्या वेळी ही जातक कथा असल्याचेही स्पष्ट केले जाते. या कथेतील फ्रा लक आणि फ्रा राम हे नैतिक नेतृत्व, नैतिकता, नि:स्वार्थीपणा आणि धर्माप्रती सत्य जीवन जगण्याचे प्रतीक आहेत.

अधिक वाचा: अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?

बौद्ध संबंध

या कथेतील फ्रा राम हा सिद्धार्थ गौतमाच्या मागील जीवनाशी संबंधित आहे, तर त्याचा चुलत भाऊ हपमनसौनेची/ राफनासुआनची (Hapmanasouane/रावण्णा/रावण) तुलना अनेकदा बुद्धाचा चुलत भाऊ फ्रा थेवाथट किंवा बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीसाठी विरोधक ठरलेल्या फ्रा मानशी- माराशी केली जाते. या लाओस रामकथेच्या आवृत्तीत रावणाची तसेच हनुमानाची भूमिका मुख्य नायक राम किंवा फ्राम यांच्या भूमिकांपेक्षा अधिक रंगवण्यात आलेली आहे. माराने ध्यानादरम्यान बुद्धांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करून त्यांचे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला होता. या रामकथेतील काही प्रसंग हे त्रिपिटकांमधून घेतलेले आहेत. एकूणच ही कथा जातक कथा आणि सिद्धार्थ गौतमाच्या जीवनकालाच्या इतिहासाच्या अधीन आहे. भारतातील गंगा नदी प्रमाणे या लाओसच्या राम कथेत मेकाँग नदीला महत्त्व आहे. शिवाय या रामकथेत सर्पपूजेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. भारतात हिंदू तसेच बौद्ध धर्मात सर्पपूजेला महत्त्व असल्याने हे लाओसच्या रामकथेतही आल्याचे काही अभ्यासक मानतात. परंतु, येथील स्थानिक जाती आदिम काळापासून सर्पपूजेला महत्त्व देत आल्या आहेत.

सांस्कृतिक परिणाम

लाओ संस्कृतीसाठी फ्रा लक, फ्रा राम कथेचे महत्त्व सर्वव्यापी आहे. ही कथा पारंपरिक नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला, शिल्पकला, धार्मिक ग्रंथ आणि हस्तलिखितांचा मुख्य आधार आहे. शास्त्रीय मोर्लम लोककथा आणि ग्रामनृत्य यासारख्या सामान्य कलांमध्ये देखील दिसून येते. लाओसमध्ये नवीन वर्ष तसेच महत्त्वाच्या धार्मिक सणांच्या दिवशी या कथेचे सादरीकरण करण्यात येते. शुभ प्रसंगी या कथेची पोथी वाचण्याचीही परंपराही लाओस मध्ये आहे. स्थानिक लोककथा, पौराणिक कथा आणि दंतकथा यांवर रामकथेचा खोलवर असलेला परिणाम आढळतो. लाखेची भांडी, मंदिरे आणि राजवाडे इत्यादींवर या रामकथेचे चित्रण आणि शिल्पकाम केलेले आढळते.

एकूणच रामकथेचा किंवा जातक कथेचा लाओसच्या संस्कृतीवर खोल परिणाम आहे. हाच दुवा सध्या प्रसिद्ध झालेल्या टपाल तिकिटाच्या स्वरूपात दिसून येतो आहे.