Ranga-Billa Case: How a Crime Reporter’s Lead Changed the Case: १९७० चा तो काळ… त्यावेळी पत्रकारांकडे आजच्यासारखे मोबाईल, इंटरनेट किंवा सोशल मीडियाचे कोणतेही शॉर्टकट नव्हते. बातमीचा माग काढायचा तर पत्रकारांना फक्त दोनच गोष्टींवर विश्वास ठेवावा लागायचा. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचे पाय आणि दुसरी म्हणजे खात्रीशीर गुप्त सूत्रे! अशाच एका आव्हानात्मक काळात, मुंबई आणि दिल्ली या दोन्ही मोठ्या शहरांचा थरकाप उडवणार्‍या एका काळ्या अध्यायाची सुरुवात झाली. हा लेख केवळ भारताच्या गुन्हेगारी इतिहासातील ‘रंगा-बिल्ला’ या अत्यंत क्रूर जोडीच्या शोधाची थरारक कथा सांगत नाही, तर त्या संपूर्ण तपासाचा रोख बदलणाऱ्या एका पत्रकाराची ‘आय-विटनेस’ स्टोरी आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे त्यावेळीचे तरुण क्राईम रिपोर्टर राजू संथानम यांनी आपल्या वैयक्तिक डायऱ्या, जुनी टिपणे आणि पोलीस सूत्रांच्या मदतीने या संपूर्ण शोधमोहिमेचा पडद्यामागील अंगावर काटा आणणारा प्रवास उलगडला आहे.

Billa-Ranga: A Nation Ambushed

मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या हातावर तुरी देऊन झालेली बिल्लाची नाट्यमय सुटका, त्यानंतर दिल्लीत घडलेले काळजाचा थरकाप उडवणारे ‘संजय-गीता चोप्रा अपहरण व हत्याकांड’, आणि पोलिसांच्या चुकांच्या पाढ्यानंतर… शेवटी वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका साध्या छायाचित्राने या संपूर्ण तपासाचा रोख कसा बदलला याचे हुबेहूब वर्णन संजय सिंग आणि राजू संथानम यांच्या आगामी ‘Billa-Ranga: A Nation Ambushed’ (हार्परकॉलिन्स प्रकाशक) या पुस्तकात आहे.

मी पहिल्यांदा ‘बिल्ला’चे नाव ऐकले…

राजू संथानम लिहितात, त्या काळच्या मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या धुराने भरलेल्या खोलीत मी पहिल्यांदा ‘बिल्ला’चे नाव ऐकले. सायन कोळीवाडा भागातील या तरुणाने धारावीच्या काही भागांत दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. बिल्ला घरांमध्ये चोऱ्या करायचा, पवई तलावाच्या निर्जन परिसरात तरुण जोडप्यांना लुटायचा. तो शहरातील काही भागांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरला होता.

राक्षसाला सतत अन्न पुरवावे, तसेच ते काम होते…

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात, नरिमन पॉईंटच्या द इंडियन एक्स्प्रेस कार्यालयात माझे पत्रकारितेचे करिअर आकाराला येत होते. मुंबईतील सुरुवातीच्या गगनचुंबी इमारतींपैकी ती एक होती. त्या दिवसांत आम्ही एका बातमीमागून दुसऱ्या बातमीसाठी सतत धावत असायचो. कधीही तृप्त न होणाऱ्या एखाद्या राक्षसाला सतत अन्न पुरवावे, तसेच ते काम होते. त्यातल्या त्यात मी सांभाळत असलेलं ‘क्राईम बीट’ म्हणजे व्यावसायिक स्पर्धेचे खरे रणांगण होते.

Billa being taken away in a police van after he was sentenced to death
in Delhi on 7.4.1979. Express Photo by RL Chopra

तो अज्ञात पोलिस अधिकारी….

पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रेस रूममध्ये अधिकृत निवेदने वाटली जात आणि प्रत्येक बातमीची ‘अधिकृत’ बाजू पत्रकारांना सांगितली जात असे. माझ्यासारखे इतर उत्साही पत्रकारही एखादा ‘डीप थ्रोट’ सापडेल आणि मोठी बातमी आपल्या हातात येईल, या प्रतीक्षेत असायचे; कारण शेवटी तो वॉटरगेटचा काळ होता. तो पोलिस अधिकारी माझ्या नियमित संपर्कात होता; त्याचे नाव मात्र गोपनीयच राहील. तो मला अनेकदा चहासाठी बोलवायचा आणि शहरात सुरू असलेल्या चर्चा, अफवा तसेच गुप्त माहिती मला सांगायचा. द इंडियन एक्स्प्रेससाठी कुख्यात पण दंतकथेसारखा ठरलेल्या तस्कर हाजी मस्तानची मुलाखत मिळवून देण्यातही याच अधिकाऱ्याचा मोठा वाटा होता.

१ मे दिनी तो पळाला आणि पोलिसांची चांगलीच नामुष्की झाली

अशाच एका भेटीत त्या अधिकाऱ्याकडे एक मोठी बातमी होती. १९७८ साली एप्रिल महिन्यात घरफोडीच्या प्रकरणात अटक झालेला बिल्ला क्राइम ब्रांचच्या कोठडीतून पळून गेला होता. ही सुटका अत्यंत नाट्यमय होती. क्राइम ब्रांचच्या इमारतीचा प्रत्येक मजला लोखंडी गजांनी बंदिस्त पिंजऱ्यासारखा बांधलेला होता. अट्टल गुन्हेगारांना तिथे बेड्या घालून ठेवले जात असे. तरीही बिल्ला नाहीसा झाला होता. त्याने यासाठी १ मे १९७८ हा दिवस जाणीवपूर्वक निवडला असावा. १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. त्या दिवशी बहुतेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्ताच्या कामात आणि सार्वजनिक सभांच्या व्यवस्थेत व्यग्र होते. बिल्लाच्या पलायनाची बातमी मी सर्वप्रथम प्रसिद्ध केली आणि ती मोठी बातमी ठरली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच नामुष्की झाली. कारण पोलीस आयुक्तांचे कार्यालय घटनास्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर होते.

आणि… संपूर्ण देश हादरला

मात्र या बातमीचा रोमांच फार काळ टिकला नाही. लवकरच मी द स्टेट्समनमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून नव्या नियुक्तीसाठी भोपाळला जाण्याची तयारी करू लागलो. दरम्यान, दिल्लीत एक वेगळीच भीषण घटना आकार घेत होती. नौदलातील कॅप्टन मदन मोहन चोप्रा यांची मुले १६ वर्षांची गीता आणि १४ वर्षांचा संजय चोप्रा यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना चालत्या कारमध्ये जबरदस्तीने ओढून नेण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. या गुन्ह्याने संपूर्ण देश हादरला.

Sanjay Chopra, who was kidnapped and killed by Ranga and Billa. Express Photo

या वळणासाठी मी तयार नव्हतो…

क्राइम बीटवर दोन वर्षे काम करूनही पुढे येणाऱ्या वळणासाठी मी तयार नव्हतो. त्या वळणामुळे या प्रकरणाची पुढची बातमी करणे अपरिहार्य ठरणार होते. चार महिन्यांनी बिल्ला आणि त्याचा साथीदार रंगा यांना गीता आणि संजय चोप्रा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. २६ ऑगस्ट १९७८ रोजी गीता आणि संजय ही दोन्ही मुले संसद मार्गावरील ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयात एका रेडिओ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाली होती. त्यांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत AIR कार्यालयात पोहोचायचे होते आणि रात्री ९ वाजता त्यांचे वडील त्यांना तेथून घेऊन जाणार होते. मात्र, ती मुले कधीच AIR कार्यालयात पोहोचली नाहीत. दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह रिज परिसरात आढळले. ३१ ऑगस्ट १९७८ रोजी पोलिसांना मोहरीच्या रंगाची फियाट कार सापडली; मात्र सुरुवातीला ती या गुन्ह्याशी संबंधित असल्याबद्दल पोलिसांना खात्री नव्हती. काही वृत्तांतांमध्ये वेगळे सांगितले गेले असले, तरी ही कार मृतदेह सापडलेल्या बुद्ध जयंती रिज परिसरात नव्हे, तर मजलिस पार्क भागात आढळली होती.

राजकीय पटलावरची अस्थिरता

या प्रकरणाच्या भयावह स्वरूपामुळे राष्ट्रीय पातळीवर त्याचे महत्त्व वाढले होते. अपेक्षेप्रमाणे, द इंडियन एक्स्प्रेसच्या टीमने या प्रकरणाचे आणि त्यातील पुढील घडामोडींचे बारकाईने वार्तांकन केले. आता मागे वळून पाहताना त्या सगळ्या घटनांचा काळ विलक्षण वाटतो. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील वर्षभर जुने सरकार आघाडीतील ताणतणाव आणि अंतर्गत स्पर्धांशी झुंज देत असताना दिवसेंदिवस अधिकच कमकुवत दिसू लागले होते. श्रीमती गांधींना आधीच्याच वर्षी सत्तेतून बाहेर व्हावे लागले होते; तरीही काँग्रेस सत्ताधारी जनता पक्षाच्या मागावर होती आणि पुनरागमनाची संधी शोधत होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती आणि पोलीस प्रशासन प्रचंड दबावाखाली होते. आणीबाणीच्या काळात झालेल्या अतिरेकांची चौकशी शाह आयोगाकडून सुरू होती.

अशा वेळी या भावंडांचे अपहरण आणि हत्या ही आधीच अनेक आघाड्यांवर संकटांचा सामना करत असलेल्या सरकारसाठी अत्यंत अडचणीची घटना ठरली. याच्या काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्री जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश राम याचे नाव कथित लैंगिक गैरप्रकाराच्या प्रकरणात आले होते. त्याशिवाय, डाकू सुंदरच्या कथित चकमकीतील मृत्यूमुळेही अनेक पोलीस अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात सापडले होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नाकाला दगड लागला

संजय-गीता प्रकरण उघडकीस आले, तेव्हा दिल्ली पोलीस दलातच मतभेद होते. काही अधिकाऱ्यांना हे अपहरणाचे प्रकरण वाटत होते, तर काही जण त्याचा संबंध सुरेश रामभोवती निर्माण झालेल्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करत होते. काहींना तर यामागे काँग्रेसचे कारस्थानही दिसत होते; विशेषतः काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने या प्रकरणात उत्तरांची मागणी करत मोर्चे आयोजित केले होते. अशाच एका मोर्चात तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी पोहोचले असता, त्यांच्यावर फेकलेला दगड त्यांच्या नाकाला लागला. अखेर जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला.

बिल्लाचा शोध …

दरम्यान, मुंबईमध्ये पोलीस बिल्लाचा शोध घेत होते. तोपर्यंत बिल्लाला रंगाच्या रूपाने नवा साथीदार मिळाला होता. पोलीस आणि न्यायालयीन कागदपत्रांनुसार, बिल्लाच्या साथीदारांपैकी श्याम सिंह यानेच त्याची रंगाशी ओळख करून दिली होती. श्याम सिंह बिल्लाच्या हिंसक स्वभावाला आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अनिश्चित मनःस्थितीला कंटाळला होता. दोन अरब पर्यटकांच्या हत्येचा तो यापूर्वी प्रत्यक्ष साक्षीदार राहिला होता आणि बिल्ला दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालला आहे, याची त्याला जाणीव झाली होती.
बिल्लाला कामासाठी स्वतःपेक्षा तरुण साथीदाराची गरज आहे, असे मानून श्यामने त्याची रंगाशी ओळख करून दिली. उंच, मजबूत बांधा आणि जवळपास सहा फूट उंची असलेला रंगा पाहताच बिल्ला प्रभावित झाला. लवकरच दोघांची जोडी जमली. दोघांनी मिळून केलेल्या पहिल्या गुन्ह्यांपैकी एक म्हणजे खंडणीसाठी एका मुलाचे अपहरण. मात्र, ही योजना फसली आणि अखेर त्या मुलाला कोणतीही इजा न करता सोडून देण्यात आले. या अपयशी कारवाईनंतर दोघेही या गोंधळासाठी एकमेकांनाच जबाबदार धरू लागले.

वॉन्टेड ..

तोपर्यंत मुंबई पोलीस त्यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अरब पर्यटकांच्या हत्येव्यतिरिक्त बिल्ला अनेक दरोड्यांच्या मालिकेतही वॉन्टेड होता. मुंबईच्या विविध भागांतून, विशेषतः पवई परिसरातील निर्जन ठिकाणी तरुण जोडप्यांना बिल्ला अडवत असल्याच्या तक्रारीही येत होत्या. तसेच, तो महिलांना लिफ्ट देत असे आणि कारच्या मागील दरवाज्यांचे हँडल आधीच तुटलेले ठेवत असे, जेणेकरून पळून जाणे जवळपास अशक्य व्हावे, असेही सांगितले जात होते. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच बिल्ला आणि रंगा यांनी शहर सोडून उत्तरेकडे, दिल्लीकडे निघण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला जाण्याची ही त्या दोघांची पहिलीच वेळ होती. त्यांना शहराची ओळख नव्हती आणि गर्दीत मिसळून कोणाच्याही लक्षात न येता राहता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती.

मुंबई पोलिस दिल्लीकडे रवाना…

दरम्यान, बिल्ला आणि रंगा दिल्लीमध्येच असल्याची खात्री पटलेल्या मुंबई पोलिसांनी संजय-गीता चोप्रा हत्याकांड घडण्यापूर्वीच राजधानीत दोन फेऱ्या मारल्या होत्या. मात्र, दिल्ली पोलिसांना याबाबत पूर्ण खात्री नव्हती. दिल्लीमध्ये शोधमोहीम राबवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एक जीप आणि काही कॉन्स्टेबल मदतीसाठी देण्यात आले; पण त्यातून फारसं काही हाताला लागलं नाही.

बिल्ला आणि रंगा दिल्लीमध्येच असल्याची खात्री पटली

या तपासाला खरा कलाटणीबिंदू मिळाला तो जुगलमुळे. बिल्ला आणि रंगाचा पूर्वीचा साथीदार असलेला जुगल त्यांच्यापासून वेगळा झाला आणि त्याने पोलिसांशी संपर्क साधला. त्याने उघड केले की, ते दोघे खरोखरच दिल्लीत आहेत. ते चोरलेल्या गाड्यांमधून फिरत होते आणि ओळख पटू नये म्हणून वारंवार नंबर प्लेट बदलत होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले. त्यांनी बनावट नंबर प्लेट तयार करणाऱ्या रंगाऱ्याचा माग काढला. त्या रंगाऱ्याने दिलेले दोघांचे वर्णन तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीशी जुळत होते. यावरून बिल्ला आणि रंगा दिल्लीमध्येच असल्याची खात्री अधिकच पक्की झाली.

This photograph of Billa (Jasbir Singh) that was published in all editions of The Indian Express and finally led to his arrest. (Express Photo)

तो पोलिस अधिकारी, बिल्लाचे छायाचित्र आणि द इंडियन एक्स्प्रेस

अशातच एके दिवशी मला माझ्या पोलीस सूत्राचा फोन आला. त्या वेळी मला या कथेत फारसा रस उरला नव्हता. भोपाळमध्ये नव्या कामात स्थिरावण्याची माझी धडपड सुरू होती. त्यामुळे मी थोड्या अनिच्छेनेच त्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांना या शोधमोहीमेचा आवाका वाढवायचा होता. अधिक मनुष्यबळ हवे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिल्ला आणि रंगा यांची छायाचित्रे सर्वत्र प्रसारित करणे आवश्यक होते. त्याने मला बिल्लाचे छायाचित्र दिले आणि ते द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध करता येईल का, अशी विचारणा केली. एक्स्प्रेसने ते छायाचित्र आपल्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध केले. काही दिवसांनी कालका मेलने प्रवास करणाऱ्या लष्करातील जवानांच्या एका गटाने त्या दोघांना ओळखले. बिल्लाचा फोटो त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्रात, नवयुगमध्ये पाहिला होता; तो फोटो एक्स्प्रेसमधूनच घेतला गेला होता. जवानांनी तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ८ सप्टेंबर १९७८ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बिल्ला आणि रंगा यांना अटक करण्यात आली. यासह भारतातील सर्वाधिक कुप्रसिद्ध शोधमोहीमांपैकी एकाचा शेवट झाला.

The Indian Express front page the day
the bodies of Sanjay and Geeta Chopra were found

दिल्लीला ‘क्राइम कॅपिटल’ अशी ओळख चिकटली

ते छायाचित्र प्रसिद्ध होणे हा त्यांच्या अटकेकडे नेणारा निर्णायक क्षण ठरला. संपादकांकडून आलेला अभिनंदनाचा टेलेक्स ही प्रत्येक पत्रकाराची स्वप्नवत गोष्ट असते. मला तसा एक टेलेक्स मिळाला. त्या वेळी एक्स्प्रेस न्यूज सर्व्हिसचे संपादक असलेले कुलदीप नय्यर चांगल्या बातमीची दखल घेणाऱ्यांमध्ये नेहमीच सर्वांत पहिले असायचे. या प्रकरणामुळे पुढे दिल्लीला ‘क्राइम कॅपिटल’ अशी ओळख चिकटली. ही प्रतिमा आजतागायत शहराला पूर्णपणे झटकता आलेली नाही. चालत्या कारमध्ये ओढून नेले जाण्याच्या भीतीने त्या काळातील संपूर्ण पिढीतील मुले आणि त्यांचे पालक हादरून गेले. बिल्ला-रंगा प्रकरण आता एका ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिकेचा विषय ठरले आहे. त्यात दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या कथित ‘शौर्यपूर्ण’ भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. पण चांगल्या कथेला सत्याचा अडथळा ठरू नये, असेच जणू मानले गेले आहे.

The reporter, Raju Santhanam, then and now

या केवळ चुका नव्हत्या…

गीता आणि संजय यांच्या वडिलांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर सुमारे २४० पोलिसांच्या तुकडीने बुद्ध जयंती पार्कचा कोपरा न् कोपरा शोधून काढला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सकाळी एका गुराख्याला मृतदेह आढळले. विशेष म्हणजे, पोलिसांनी ज्या ठिकाणी शोधमोहीम राबवली होती, त्यापासून अवघ्या २०० यार्ड अंतरावर ते मृतदेह पडलेले होते. नंतर बिल्ला आणि रंगा अटकेत आल्यानंतर आणि फियाट कारमधील बोटांचे ठसे त्यांच्या ठशांशी जुळल्यानंतरच दिल्ली पोलिसांनी हे मान्य केले की, बॉम्बे पोलीस ज्या दोन संशयितांच्या मागावर होते, ते हेच दोघे होते. या खटल्याचा निकाल लागण्यास साधारण चार वर्षे लागली. अखेरीस बिल्ला आणि रंगा यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेला पुढे उच्च न्यायालयांमध्ये आव्हान देण्यात आले. मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवताना दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या वर्तनाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. पोलिसांनी उपलब्ध माहितीवर वेळीच कारवाई केली असती, तर त्या मुलांचे प्राण वाचू शकले असते, असे न्यायालयाने नमूद केले.

Geeta and Sanjay’s photos were published
in The Indian Express on August 28, 1978

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, पोलीस कंट्रोल रूमला संध्याकाळी ६.४४ वाजता माहिती मिळाली होती. तरीही स्थानिक पोलीस ठाण्याने तपासासाठी अधिकारी पाठवला तो संध्याकाळी ७.०५ वाजता. न्यायालयाने म्हटले, “गुन्हेगार गोल डाक खाना येथे आपल्या कारमध्ये बसून पोलिसांची वाट पाहत राहतील, अशी अपेक्षा पोलिसांनी नक्कीच ठेवली नसावी. फ्लाइंग स्क्वॉडच्या गाड्या तात्काळ कार्यान्वित केल्या असत्या, तर हत्यांना रोखण्याची चांगली शक्यता होती. आरोपींना पकडण्यासाठी सर्वसाधारण सतर्कतेचा इशारा दिला जायला हवा होता.”

Billa outside the Chief Metropolitan Magistrate’s Court in Delhi (left) and Ranga

बातमीतील प्रत्येक तथ्य अचूक असले पाहिजे याची जिद्द आमच्याकडे होती

२१ एप्रिल १९८१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रंगा आणि बिल्ला यांची मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. ३१ जानेवारी १९८२ रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगात दोघांनाही फाशी देण्यात आली. यासह देशाच्या गुन्हेगारी इतिहासातील एक काळाकुट्ट आणि घृणास्पद अध्याय अखेर संपुष्टात आला. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील पत्रकारिता आजच्या पत्रकारितेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात आमच्याकडे साधने मर्यादित होती; मोबाइल फोन नव्हते, इंटरनेट नव्हते आणि सोशल मीडियाचा तर मागमूसही नव्हता. पण एक गोष्ट मात्र ठाम होती. बातमीतील प्रत्येक तथ्य अचूक असले पाहिजे, याबद्दलची जिद्द. त्या काळी बातम्या क्षणात तयार होत नसत; त्या हळूहळू आकार घेत. एका सूत्राकडून मिळालेली माहिती दुसऱ्या सूत्राकडून पडताळली जायची, एका कागदपत्राला दुसऱ्या कागदपत्राची जोड मिळायची आणि अशा रीतीने प्रत्येक बातमीचा पाया मजबूत केला जायचा.